NH10: समोर आरसा धरणारा वेगवान थरारपट
पुरुषप्रधान संस्कृती, अचानक आलेल्या आर्थिक सुबत्तेतून येत असलेला बेदरकारपणा, आधुनिक काळात एकीकडे तांत्रिक प्रगती वेगात होत असताना तो वेग पचवण्याचा प्रयत्न करत असलेला समाज; या व अशा अनेक घटकांचा परिपाक वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला दिसत-भेटत असतोच. ऐहिक प्रगती होत असली तरी मानसिकता बदलायचा वेग तितका वेगवान कधीच नसतो. परंपरावाद आणि प्रागतिकता म्हणा, आधुनिक आणि पारंपरिक जीवनशैली म्हणा, स्त्रियांच्या बदलत्या सामाजिक स्तराने निर्माण झालेली जाणीव म्हणा, यांमुळे विविध स्तरांवर चालू असलेले द्वंद्व अनेकदा टोकदार व व्यामिश्र असते. अशाच एका पारंपरिक प्रथेबद्दल - 'ऑनर किलिंग'बद्दल -आपण अनेकदा ऐकत असतो, वाचत असतो आणि हळहळ व्यक्त करत सोडून देत असतो. 'एन्-एच१०' हा चित्रपट याच प्रकारामुळे व याच प्रकाराच्या सावटाखाली घडतो, आणि फक्त ऑनर किलिंगच नाही, तर वरवर प्रगती करतोय असे भासणार्या या समाजात काही बाबी किती खोलवर रुजल्या आहेत, काही वर्तमानात कशा रुजत आहेत त्याचे प्रखर चित्रण आपल्यापुढे सादर होते.
सूचना: यापूढे काही प्रमाणात कथावस्तू उघड केली आहे.
चित्रपटाला सुरुवात होते, ती एका चकचकीत शहरातील रात्रीच्या चित्रीकरणाने. एकीकडे नामनिर्देश चालू असताना पडद्यावर कोणतीही पात्रं न दिसता केवळ खेळकर व काहीशा गुलुगुलू संवादांतून एक आनंदात व एकमेकांच्या प्रेमात असलेले जोडपे उभे राहते. अर्थात पडद्यावर कोणतेही पात्र नसले तरी पडद्यावर दिसणारे शहर हे गुरगाव आहे हे हळूहळू स्पष्ट होऊ लागते. विस्तीर्ण रस्ते, ट्रॅफिक, मेट्रो, फ्लायओव्हर्स, चकचकीत ऑफिसेस असा एखाद्या शांत व चांगल्या शहरातून चाललेला फेरफटका संपताच आपल्याला मीरा (अनुष्का शर्मा) आणि अर्जुन (नील भूपालम) हे एकमेकांच्या प्रेमात बुडलेले, आधुनिक कपडे घातलेले, बर्यापैकी चांगल्या गाडीतून येणारे एक उच्चमध्यमवर्गीय नागर जोडपे दिसते. काही कारणाने मीराला ऑफिसात रात्री जावे लागणार असल्याने ती निघते. अतिशय गजबजलेला हायवे सोडून ती काहीशा आतल्या रस्त्याला वळते, जिथे ट्रॅफिक बरेच कमी असते. मीरा एकटीच एका सिग्नलला थांबली असता इतर गाड्या सिग्नल तोडून बेदरकारपणे पुढे जातच असतात. अशातच एका बाइकस्वार दुकलीचे लक्ष मीरा एकटीच गाडीत आहे याच्याकडे जाते. ठिकाण वरवर आधुनिक आणि शांत दिसत असले, तरी बाइकस्वारांची मीराच्या गाडीवर हल्ला करण्याची हिंमत होते. पण शेवटच्या क्षणी मीरा पळ काढते, त्यामुळे त्यांचा प्रयत्न फसतो. एकूणच प्रसंगाने भांबावलेल्या मीराला थोडा बदल मिळावा म्हणून अर्जुनन एक ट्रीप प्लान करतो.
या ट्रीपच्या निमित्ताने मीरा व अर्जुन शहराबाहेर पडतात. वरवर सुरळीत दिसणार्या प्रवासातही काही ठिकाणी पोलिसांची वाजत जाणारी व्हॅन दिसते, तर टोलनाक्यावर 'एक लेन बंद का?' अशी विचारणा केल्यावर "कोई लडके थे, काउंटरपे टोल मांगा तो गोली से उडा दिया" असे सांगण्यात येते. एकूणच बाह्यरूप शांत असले तरी समाजात आतमध्ये बरेच काही चालू आहे आणि त्या सत्यासह एक वेगळी नि समांतर दुनिया तितक्याच जोरकसपणे अस्तित्त्व राखून आहे असा माहौल दिग्दर्शक उभा करतो. पुढे काहीतरी खायला म्हणून दोघे एका ढाब्यावर थांबले असता एक मुलगी मीराकडे येऊन तिला वाचवायची विनंती करते. 'उगाच कशाला दुसर्यांच्या लफड्यात पडा' या विचाराने मीरा तिच्यापासून दूर होते. लवकरच एक गाडी येते, ज्यात ६ व्यक्ती असतात. त्या मुलीला व तिच्या नवर्याला तुडवत, मारत ते त्यांना गाडीत घालू पाहतात. अर्जुनला हे सहन होत नाही. तो मध्ये पडतो. तर त्या मुलीला मारणारा पुरुष सांगतो, "मी तिचा भाऊ आहे. मध्ये पडू नकोस." त्यांच्यात किंचित झटापटही होते. त्या मुलीला ते लोक घेऊन जातात. स्वतः खाल्लेल्या मारामुळे अत्यंत विचलित झालेला तसेच तसेच ग्रामीण लोकांना बंदूक दाखवून घाबरवले तर ते वठणीवर येतील या गैरसमजातून अर्जुन - नि सोबत मीरा- जेव्हा त्यांच्या मागे जातात तेव्हा एका वाळवंटी जंगलासारख्या भागात पोचल्यावर त्यांच्या लक्षात येते की ही 'ऑनर किलिंग'ची केस आहे. मग मात्र भांबावलेल्या अर्जुनच्या हातून काही चुका होतात आणि त्या मुलीला व तिच्या नवर्याला/प्रियकराला मारताना बघणारे अर्जुन व मीरा त्या गावकर्यांच्या तावडीत सापडतात. काही घडामोडींनंतर नाट्यपूर्ण वेगात सुरू होतो एक अविश्रांत पाठलाग. नुसताच अविश्रांत नाही, तर अतिशय थरारकही. त्यात एका झटापटीत अर्जुनच्या पायात चाकू घुसतो आणि त्याला चालणे अशक्य होऊन बसते. तेव्हा त्याला एका सुरक्षित जागी लपवून मीरा एकटीच मदतीच्या शोधात निघते. मग पुढे काय होते? मीराला मदत मिळते का? तिच्या मागे लागलेल्यांच्या तावडीत ती सापडते का? ती नवर्याचा जीव वाचवू शकते का? तिला भेटलेली मंडळी, मग ते पोलिस असोत की गावचे सरपंच, तिला कितपत मदत करतात? या गोष्टी इथे देण्यापेक्षा प्रत्यक्ष बघणेच परिणामकारक ठरेल.
या चित्रपटाची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील, त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे संवाद आणि पटकथा. अनेक दिवसांनी इतका बांधीव आणि जेवढ्यास तेवढे संवाद असणारा हिंदी चित्रपट बघायचा योग आला. 'ऑनर किलिंग' हा या चित्रपटाचा विषय आहे हे त्याबद्दल कोणतीही लेक्चरबाजी न करता प्रेक्षकापर्यंत पोचते. प्रत्यक्षात काही मोजके अपवाद वगळता त्याविषयी कोणीही बोलत नाही. पण त्याची भिती, त्याबद्दल समाजात खोलवर रुजलेली भावना मात्र संपूर्ण चित्रपटावर पसरलेली आहे. तो भाग वगळला तर त्याच व्यक्ती समोरच्याला मदत करायला तत्पर आहेत. पण हा विषय आला की त्यांच्यातली पाषाणहृदयी स्वभाव अमानुषपणे बाहेर येतो. कोणतेही पात्र असले तरी त्याचे संवाद मोजके, प्रभावी आणि वास्तवदर्शी आहेत. अगदी क्लायमॅक्सच्या वेळीसुद्धा शेवटचे एक वाक्य सोडले तर एकही संवाद नाही.
दुसरा आनंददायी भाग म्हणजे ध्वनी आणि प्रकाशयोजना. बहुतांश चित्रपट रात्री घडतो. त्या वेळी सावल्यांचे खेळ तर महत्त्वाची भूमिका बजावतातच, पण तेव्हा येणारे ध्वनी अधिक स्पष्ट व दुरूनही ऐकू येतात याची दिग्दर्शक नुसती जाणीव ठेवत नाही तर त्याचा योग्य वापरही या कथानकात होतो. काही प्रसंगी तर बोलणार्या व्यक्ती न दाखवताही केवळ पार्श्वभूमीवरील संवादातून, प्रकाशयोजनेतून व ध्वनीतून तिथे काय घडतेय हे प्रेक्षकांना समजते. रात्रीच्या वेळी येणारा बंद दार ठोठावल्याचा आवाज असो किंवा ट्रेनचा दुरून येणारा खडखडाट असो, अनेक प्रकारचे ध्वनी या कथेचा आवश्यक भाग बनून येतात. संगीतही जितके आवश्यक तितकेच व कथेला साजेशा पठडीतले आहे. मुळातच भपका वा भडकपणा टाळून प्रेक्षकाशी आणि वास्तवाशी थेट नाळ जोडणारा अनुभव हा चित्रपट देतो.
अभिनयाबद्दल बोलायचं तर अनुष्का शर्माने अतिशय चांगले काम केले आहे. अनुष्काचा गोग्गोड चेहरा आणि काहिशी एकसुरी संवादफेक अशा या कथेला मांडताना येणार्या अंगभूत मर्यादा ठरतात, पण अनेकदा त्या टाळत हा चित्रपट पुढे जातो. खरंतर या चित्रपटाला हीरो असा नाहीच. आहे ती फक्त हिरॉईन आणि याचे भान तिने पुरेपूर राखले आहे. मीराचे पात्र मुळातच नुसते आधुनिक नाही, तर आतूनच स्वतंत्र असलेल्या स्त्रीचे आहे. अन् अश्या परीक्षेच्या वेळी तर ते अधिकच लखाखून निघते. ती घाबरते, 'त्या लोकांपासून' नेहमीच चार हात लांब असते, मात्र वेळ-प्रसंग आल्यावर तिच्यातले सर्व्हायविंग इन्स्टिंक्ट उफाळून येते.
एक दिग्दर्शक म्हणून 'मनोरमा- सिक्स फिट अंडर'नंतर तब्बल ७ वर्षांनी पुढील चित्रपट घेऊन आलेल्या नवदीप सिंगकडून असलेली अपेक्षा तो निश्चितच पूर्ण करतो. अनेक लहान-लहान प्रसंगांतून तो बरेच काही सांगून जातो. जेव्हा मीराला हे टोळकं मारत असतं, तेव्हा त्या झटापटीतही त्यांना मीराचं - एका स्त्रीचं - डोळ्याला डोळा देऊन बघणं पुरुषांना सहन न होणं, आपल्या बहिणीला गोळी घातल्यावर तिच्या भावाने तिच्या प्रियकराला/नवर्याला शिगेने मरेस्तो मारत असताना त्याच्या मामाचं "ये हुई ना मर्दोवाली बात!" असं म्हणणं, पार्श्वभूमीवर जाणार्या वाहनांत दिसणारे, बाहेर लटकणारे लोक, हरियाणात एके ठिकाणी साधा पत्ता विचारायला गेलं तरी सहन करावी लागणारी गुर्मी, स्वाभिमानी आणि चिवट - विशेषतः नागर - बायकांना उद्देशून जागोजागी वापरलं जाणारं "साली रांड" हे संबोधन, प्रत्येक ठिकाणचं अतिशय वास्तवदर्शी चित्रण, बिहारी वगैरे विस्थापितांना गावांमधून मिळणारी किंमत व स्थान, मीरा सुरुवातीला ऑफिसमध्ये जे प्रेझेंटेशन देते त्यातूनही आपल्या गावांतील सॅनिटरी नॅपकिन्सबद्दल तिनं मांडलेलं एक महत्त्वाचं निरीक्षण.. अशा अनेक प्रसंगातून ही कथा निव्वळ त्या स्त्रीची, त्या पात्रांची, समाजापासून विलग असलेली कथा होत नाही, तर एकूणच सद्य समाज या कथेतले एक महत्त्वाचे पात्र म्हणून पुढे आणण्यात दिग्दर्शक यशस्वी होतो.
एकूणच समाज ही फार गुंतागुंतीची गोष्ट आहे. मात्र ती गुंतागुंत पडद्यावर सादर करताना कमालीची 'निरीक्षक' वृत्ती लागते. आणि याच वृत्तीतून हा चित्रपट आपल्यापुढे सादर केला असल्याने तो प्रेक्षकापर्यंत थेट पोचतो. नुसता पोचत नाही तर त्याला पुरेपूर सुन्न करतो, दचकवतो, घाबरवतो, जिवाच्या आकांताने पळायला लावतो, हे गुंतागुंतीचे जाळे आपल्या भोवतीच आहे - नि आपणही त्याचा भाग आहोत - याची अलगद जाणीव करून देतो, थोडक्यात एक 'थरारपट' म्हणून उच्च निर्मितिमूल्ये बाळगत केवळ थरारपटाहून बरेच अधिक काहीतरी देऊन जातो.
एनएच-१० - चित्रपटाची /नाटकाची माहिती
