बेगडी मुखवट्यांचा बेरंगी जथा - भाई (२०१९)

    पुलंवर सिनेमा बनवणं ही तशी धाडसाची गोष्ट आहे. मराठी माणसानं या लेखकावर-खेळियावर भरभरून प्रेम केलं आहे. केवळ सिनेमा पुलंवरचा आहे म्हणून तो बरा-वाईट कसाही असला, तरी पाहायला जाणारे अनेक असतील; तसेच आपलं टीनेजर पोरगं हा सिनेमा बघून आलं म्हणून अकारण मूठभर मांस चढणारेही अनेक जण असतील. पुलं हे निव्वळ लेखक नाहीत, निव्वळ खेळिया नाहीत. पुल माहीत असणं, आवडणं, आपल्या संचिताचा भाग असणं म्हणजेच आपण मराठी असणं, अशी काहीतरी समजूत हाडीमाशी खिळावी असं हे अजब समीकरण आहे. ते तसं का आहे, चूक आहे की बरोबर आहे, पुलंना किती न्याय देणारं वा अन्यायाचं आहे, हे स-ग-ळं अलाहिदा. हे असंच आहे. त्यामुळे पुलंवरचा सिनेमा हे चित्रपटनिर्मात्यांच्या दृष्टीनं दुधारी पातं आहे. व्यावसायिक गणित म्हणून ते चालण्याची खातरी आहे, पण त्यातलं बरंवाईट अनेक जण डोळ्यात तेल घालून तपासणार, त्याबद्दल कॉलर धरणार हेही आहेच. तो लोकांचा हक्कच आहे. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर 'भाई - व्यक्ती की वल्ली’ हा महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि मतकरी पितापुत्र लिखित सिनेमा - भाग १ आणि भाग २ - पाहिला. इथून पुढे या दोन्ही भागांना मिळून एक सिनेमा असं मी उल्लेखणार आहे. कारण दोन भाग केवळ लांबीसाठी केले असावेत, हे सिनेमे पाहिल्यावर स्पष्टच दिसतं. 

सिनेमा कसा आहे? भिकार आहे. 

निराशा झाली. खंत वाटली. संताप आला. 

या संतापाचं पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं कारण म्हणजे हा सिनेमा पुलंचा न भूतो न भविष्यति असा अपमान करतो. 'मैफिलीचा सम्राट', 'आनंदनिधान', 'बैठकीची जान', 'कोट्यधीश' अशा अनेकानेक विशेषणांनी गौरवला गेलेला हा निर्विष प्रतिभावंत कलाकार. आपल्या टीकाकारांचाही त्यानं कधी दुस्वास केलेला नाही. हा सिनेमा पाहिल्यानंतर त्याचं काय चित्र प्रेक्षकाच्या डोळ्यांपुढे उभं राहतं? एखाद्या कावलेल्या कारकुनाप्रमाणे सदैव चिरचिर्‍या सुरात बोलणार्‍या, कोणत्याही बर्‍यावाईट प्रसंगी - वेळी अस्थानी वाटतील अशा - भिकार कोट्या करून त्यावर स्वतःच हॅहॅहॅ करून हसणार्‍या, भोट, कंटाळवाण्या, आळशी, खुशालचेंडू आणि बावळट माणसाचं चित्र हा सिनेमा प्रेक्षकासमोर उभं करतो. हे अपयश पुलंची भूमिका करणार्‍या सागर देशमुखचं तर आहेच, पण तितकंच ते संवादलेखकाचंही आहे. 'मी इतिहासात असतो, तर शाहिस्तेखान नसतो काही. त्याची बोटं कापल्यावर तो लिहिणार कसा?' हा विनोद पुलंच्या तोंडी सिनेमात आहे. यावर ते स्वतःच हसताना दिसतात. हा पुलंचा विनोद आहे? तो खरोखरच पुलंचा आहे की नाही, हे उत्तर बाजूला ठेवून आपण स्तिमित होऊन स्वतःला विचारतो, हा पुलंना शोभणारा विनोद आहे? हे फक्त एक उदाहरण आहे. अशा अनेक वेळा सिनेमात येतात. संवादलेखकाच्या कोटीलेखनावर वा पुलंच्या असंख्य कोट्यांपैकी योग्य त्या निवडायच्या लेखक-दिग्दर्शकांच्या कुवतीवर आणि त्यातल्या असल्या-नसल्या विनोदाला ठार करणार्‍या सागर देशमुखच्या रडक्या संवादफेकीवर संतापून आपण खुर्चीतल्या खुर्चीत खचत जातो. हा माणूस सदैव हसतमुख होता, हे खरं. पण तो पाचकळ नव्हता. तुम्ही त्याचं हे असं माकड का करता आहात असा प्रश्न पडत राहतो. त्याचं सिनेमाकडे काहीही उत्तर नाही. पुलंची जडणघडण कशी झाली, त्यांची निर्मितिप्रक्रिया किती सुंदर-किती अवघड होती, त्यांच्यासमोर आयुष्याने कोणते पेच टाकले, त्यांवर त्यांनी मात कशी केली, त्यात सुनीताबाईंखेरीज कोणकोणत्या लोकांचा काय वाटा होता, अफाट आणि दृष्ट लागेलशी लोकप्रियता मिळत जाण्याचा पुलंचा प्रवास कसा होता, ही लोकप्रियता त्यांनी कशी वागवली, त्यातून त्यांचं व्यक्तिमत्त्व कसं उजळत गेलं, त्यातून काय साधलं-काय बिनसलं, त्यांच्या साहित्याची वैशिष्ट्यं काय म्हणता येतील, त्यांनी केलेले अभूतपूर्व प्रयोग कोणते, त्यामुळे लोकांच्या अभिरुचीवर कोणते बरेवाईट परिणाम झाले, कलावंत म्हणून पुलंच्या मर्यादा आणि बलस्थानं कोणती, त्यांनी आपल्या काळावर कोणत्या प्रकारचा ठसा उमटवला… यांपैकी काही प्रश्नांना तरी सिनेमात स्पर्श केला जाईल, या अपेक्षेने थेटरात आलेले आपण हतबुद्ध होतो. यांतले बहुतांश प्रश्न सिनेमात डोकावतही नाहीत. या सगळ्या प्रश्नांचं राहू द्या, खुद्द सिनेमाच्या शीर्षकात विचारलेला ‘भाई - व्यक्ती की वल्ली’ हा प्रश्न तरी? अहं. 
 
आपल्याला दिसते ती एक कचकड्याची शोभायात्रा. तत्कालीन मराठी सारस्वतातली शक्य ती सगळी व्यक्तिमत्त्वं एकेकदा तरी तोंड रंगवून पडद्यावर आलीच पाहिजेत अशा अहमहमिकेनं खचाखच भरलेली. ती व्यक्तिमत्त्वं जिवंत करण्याचा, त्यांचा पुलंच्या यशापयशातला वाटा उलगडून सांगण्याचा, पुलंचं त्यांच्याशी असलेलं नातं रंगवण्याचा कोणताही प्रयत्न हा बेगडी मुखवट्यांचा बेरंगी जथा करत नाही. 'हम साथ साथ हैं' या सिनेमामध्ये काही पात्रांसारखे कपडे घालून त्या पात्रांची नक्कलच केली जाते आहे अशी आचरट समजूत करून देणारं एक हिडीस गाणं आहे. तद्वत हिडीस आणि हास्यास्पद नकलांनी सिनेमा ठासून भरलेला आहे, इतकंच या बाबतीत म्हणणं शक्य आहे. पात्रांच्या बाह्यरूपांची हुबेहूब नक्कल करण्यापलीकडे ही सोंगं सिनेमात कोणतीही अर्थपूर्ण भर घालत नाहीत. याला कु-णा-चा-ही अपवाद नाही. एकेका दृश्यात दिसून जाणारे बाबा पुरंदरे, विजया मेहता, सतीश दुभाषी, भक्ती बर्वे, ग. दि. माडगूळकर, बा. सी. मर्ढेकर, रामूभय्या दाते, अनिल अवचट, विजय तेंडुलकर, बाबा आमटे, साधनाताई आमटे, रुग्णालयाचं दार सांभाळण्याहून अधिक काम वाट्याला न आलेले जब्बार पटेल... नावं घ्यावीत तितकी कमी आहेत. त्यांच्या वयांचे आणि रूपांचेही हिशेब अनेकदा गंडलेले आहेत, हे तर झालंच; पण भूमिकेबद्दल बोलायचं झालं, तर ही सगळी मंडळी पडद्यावर हजेरी लावतात, प्रेक्षकांना आपल्या सोंगाचं नावं ओळखता यावं इतपत रेंगाळतात आणि अंतर्धान पावतात. पुल, सुनीताबाई, माई, आणि जब्बार पटेल यांच्या खालोखाल दिसणारी व्यक्ती आहे बाळ ठाकरे. पुलंच्या आयुष्यात बाळ ठाकरे इतके महत्त्वाचे होते का, असा प्रश्न प्रेक्षकाला पडण्याइतके ते दिसतात. पण सिनेमानं केलेली तथ्यांची मोडतोड हा एक स्वतंत्रच मुद्दा आहे. 

दुसरी संतापजनक बाब म्हणजे सिनेमातून दिसणारं सुनीताबाई आणि पुल यांचं नातं. या जोडप्याच्या आयुष्यातले अनेक निर्णय सुनीताबाईंनी घेतले. वेळी पुलंशी वाद घालून, आपलं म्हणणं पुलंवर लादून घेतले. सुनीताबाईंनी स्वतःच त्याची कबुली दिली आहे, स्वतःच्या निर्णयांबद्दल शंका व्यक्त केली आहे. पुलंच्या स्वभावामधल्या पुरुषसत्ताकपणाच्या खुणा त्यांनी रोखठोक मोकळेपणानं टिपल्या आहेत. पण हे सगळं असूनही, आमचं वैवाहिक आयुष्य ही एक आनंदयात्रा होती, असंही स्वतः सुनीताबाईंनीच म्हटलं आहे. पुलंच्या दोषांकडे स्पष्टपणे बोट दाखवणार्‍या त्यांच्या लेखनातूनही त्यांच्या आणि पुलंच्या आयुष्यातले काही कोवळे-सुंदर क्षण सहज दर्शन देऊन जातात. पहाटेच्या प्रकाशात पारिजातकाचं झाड गदगदा हलवून सुनीताबाईंना प्राजक्तफुलांच्या वर्षावात न्हाऊ घालणारे पुलं त्यात आहेत, तसेच पुणेरी पावसात सुनीताबाईंना पेटी ऐकवणारे, 'माझिया माहेरा जा’ हे त्यांचं आवडतं गाणं ऐकवणारेही आहेत. या जोडप्यामधल्या विसंवादी सुरांच्या जागा स्वतः सुनीताबाईंनीच ठळकपणे दाखवून देऊनही त्यांचं वैवाहिक आयुष्य एका मेळानं चालणारं, एका तालासुरालयीत गाणारं, एकमेकांत गुंफलेलं, सुरेल झालं आहे. पण सिनेमात आपल्याला या जोडप्याचं कोणतं चित्र दिसतं? तर सुनीताबाईंच्या रूढ प्रतिमेच्या आधाराने उभ्या केलेल्या संसाराचं. ज्यात सुनीताबाई म्हणजे सदैव परीटघडीच्या कलकत्ता साडीत आणि हातात अदृश्य पट्टी घेऊन कडक चेहर्‍याने, पण पोटात आईची माया घेऊन वावरणार्‍या मास्तरीणबाई आहेत; तर पुल म्हणजे कोणत्याही प्रकारच्या जबाबदारीची जाणीव-शिस्त-औचित्य नसणारं; सतत केवळ टवाळक्या करणारं आणि शिक्षिकेच्या पट्टीला कमालीचं भिऊन थरथर कापणारं एक वांड-उडाणटप्पू मूल आहेत. तपशिलांची तीव्रता अकारण वाढवून, बटबटीतपणा करून, काही गोष्टी पदरच्या घुसडून... सिनेमा केवळ इतकंच दाखवतो. बेळगावच्या वास्तव्यात सुनीताबाईंनी स्वतः ते घर शेणानं सारवल्याचे उल्लेख आहेत. गोमयाच्या गंधाची आणि पत्नीच्या रूपाची सांगड मनात घट्ट रुतून बसल्याचा उल्लेख पुलंच्या लेखनात  आहे. बेळगावमधल्या मैफिली आणि गाव सोडून निघावं लागलं तेव्हाच्या दुःखाची वर्णनं आहेत. पण आपल्याला बेळगावात दिसतात ते 'इथे कंटाळा आला बुवा सुनीता' असं कुरकुरणारे बावळट पुल. 'महाराष्ट्राचं जणू फर्स्ट कपल' (शब्दश्रेय : मंगला गोडबोले) असणार्‍या या कलासक्त, समाजप्रेमी, लोभसवाण्या जोडप्याचं हे असं हास्यास्पद व्यंगचित्र रेखाटलं जावं असं काय पाप त्यांनी केलं आहे? 

हे चित्रपटकर्त्यांच्या कमालीच्या बाळबोध आकलनाचं पाप आहे. 

सिनेमा - अगदी चरित्रपटही - म्हणजे यथातथ्य माहितीपट नव्हे. चरित्रपटांमध्ये विशिष्ट परिणाम साधण्यासाठी तथ्यं वाकवली जातात, हे गृहीतकच. चरित्रनायकाच्या मनातलं द्वंद्व उभं करण्यासाठी काही संवाद कल्पावे लागतात. सत्यघटना आणि त्यांचे कितीही तपशील उपलब्ध असले, तरी चरित्रनायकाचं आपल्याला अभिप्रेत असलेलं चित्र रेखाटायला मदत करणारे तेवढेच तपशील निवडून वापरावे लागतात. चरित्रनायक लेखक असेल, तर त्याच्या पात्रांना पटकथेत स्थान देण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. या सगळ्या तडजोडींना, क्वचित तथ्याच्या मोडतोडीला, बाहेरची जोड देण्याला हरकत असण्याचं काही कारण नाही. चरित्रनायकाचं समर्थ आणि जिवंत रेखाटन करण्यासाठी या सगळ्या बाबी उपयोगी पडत असतील, तर त्यात काहीही गैर नाही. 

पण तसं होत नसेल तर? मग मात्र अनेक प्रश्न उभे राहतात. 

भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, हिराबाई बडोदेकर, वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, पुल हे एकाच काळात संगीतक्षेत्रात वावरलेले थोर लोक. एकमेकांच्या गुणांचं कौतुक असलेले. यांना एखाद्या दृश्यामध्ये एकत्र दाखवण्याचा मोह पडणं आणि तितकं कलात्मक स्वातंत्र्य घेणं अगदी समजण्याजोगं आहे. पण ही मंडळी कायमच एखाद्या रिकामटवळ्या टोळीप्रमाणे कुटाळक्या करत फिरत असावीत, अशी समजूत होण्याइतकं स्वातंत्र्य नक्की कशासाठी? बरं, या मंडळींच्या मैफिलींमध्ये पुलंची भूमिका आणि पुलंचं कर्तृत्व नक्की काय होतं म्हणून आपल्याला या मैफिली सिनेमात दोनदा ऐकायला मिळतात? मैफिली बघताना प्रेक्षक सुखावतात म्हणून? 
 
बाळ ठाकरे आणि सुनीताबाई यांचं जन्मसाल एक आहे, हे तथ्य झालं. पुल शाळेत शिक्षक असताना बाळ ठाकरे त्याच शाळेत विद्यार्थी होते हे दुसरं तथ्य. सुनीताबाईंच्या वर्गात सातवी-आठवीतला बाळ 'देखण्या ठाकूरबाईंचं चित्र' रेखाटताना दाखवला आहे हे सिनेमातलं तथ्य! ही तोडमोड नक्की कशासाठी? पुल मरणाच्या दारात असताना ठाकरे त्यांना भेटायला आले, हे तथ्य. तत्पूर्वी याच ठाकर्‍यांनी पुलंची जाहीर संभावना 'मोडके पूल' अशी केली होती, हेही एक तथ्य. मग 'भाई, तुमचा लाडका विद्यार्थी तुम्हांला भेटायला आला आहे.' या संवादातून काय साधलं? 'जवळच्या माणसांना आता कळवायला हवं' असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर जब्बार पटेलांनी लगोलग ठाकऱ्यांना फोन केला, हे कदाचित तथ्य असेलही. पण ते दाखवण्याची निवड करून नक्की कुणाची रंगसफेदी साधली जाते आहे? 'ठाकरे माझा उपदेश ऐकताहेत हे त्यांच्या अनुयायांना कसं पटेल?' ही सारवासारवी पुलंच्या तोंडून नक्की कुणाच्या आशीर्वादाने होते आहे? आणि मुख्य म्हणजे का? त्यातून नक्की काय साधलं जातं आहे? 

अंतू बर्वा, सखाराम गटणे, नाथा कामत, बबडू ही पुलंची अजरामर व्यक्तिचित्रं. पण ही व्यक्तिचित्रं रूढ व्यक्तिचित्रांपेक्षा निराळी आहेत. ती वास्तवातल्या माणसांची चित्रं रेखाटत नाहीत. व्यक्तिचित्रणाचा घाट वापरून एक स्वतंत्र कथाच रंगवतात. फिक्शनला जन्म देतात. ती पुलंची नवनिर्मिती आहे आणि तिची उंची विलक्षण आहे. सिनेमानं याही बाबतीत माती खाल्ली आहे. ही पात्रं वास्तवातल्या कुठल्या ना कुठल्या पात्रावर बेतलेली असावीत असं गृहीत धरून, 'मूळची पण पटकथाकाराच्या कल्पनेतून जन्मलेली' पात्रं सिनेमात कसलाही शेंडाबुडखा नसताना घुसडून दिली आहेत. त्यांचा सिनेमाच्या ओघाशी काही संबंध आहे की नाही, याचा काहीही विचार केलेला नाही. यानं नक्की कोणती परिणामकारकता साधली गेली? सखाराम गटणेचं मूळ पात्र कल्पून ते आणायचं आणि भीमण्णा-वसंतराव-पुल या टोळीकडून त्याची क्रूर टवाळी करवून घ्यायची? त्यातनं पुलंच्या निर्विष विनोदाबद्दल आपल्याला नेमकं काय कळतं? 

बटबटीत पार्श्वसंगीत, अत्यंत अव्यावसायिक-बाळबोध पात्रहालचाली, रांगेनं फोटोसाठी उभ्या राहिलेल्या माणसांसारखी वा सिमेट्रिकल नक्षी साधून मांडल्याप्रमाणे दिसणारी दृश्यमांडणी, तत्कालीन वातावरण उभं करण्यासाठी नेपथ्यावर अजिबात न घेतलेले कष्ट आणि त्यातही केलेली तथ्यांची वारेमाप मोडतोड... या सगळ्या तांत्रिक भागाबद्दल बोलण्यात तर काही अर्थच नाही, इतकी दयनीय परिस्थिती आहे. 

संवादलेखनातल्या लक्तरांबद्दल बोलण्याची लाज वाटते, पण गरजही वाटते. कारण संवाद रत्नाकर मतकरींचे आहेत. ‘महाराष्ट्रभूषण पुरस्कार माझ्या शिक्षकांना देऊ. पण मी आधी सुचवलंय, त्यामुळे क्रेडिट मलाच,’ हा बाळ ठाकर्‍यांच्या तोंडी असलेला संवाद. महारोग्यांनी आणलेली भाजी, म्हणून लोकांनी आनंदवनाजवळ भाजीची नासधूस केल्याचा प्रसंग. त्यातला बाळबोधपणा वा तांत्रिक चुका तर अलाहिदाच, पण सुनीताबाईंशी बोलताना 'लोकांनी भाजी उद्ध्वस्त केली गं.' हा भाषाप्रभू पुलंच्या तोंडचा संवाद. या पातळीबद्दल काय बोलावं? हे रत्नाकर मतकरींनी केलं आहे, हे कळल्यावर आपलीच मान शरमेनं खाली जाते. 

एकुणातच पुलंची ही विटंबना पाहताना निर्मात्याची, दिग्दर्शकाची, लेखकांची, नटांची, पुल-सुनीताबाईंची आणि सर्वांत जास्त आपली दया-दया येते. लाज वाटते. संताप येतो. सुनीताबाई हयात असताना हा सिनेमा प्रदर्शित झाला असता, तर काय झालं असतं असा प्रश्न मनाशी येऊन किंचित हसू येतं, खंतही वाटते. 

किमान एका तरी प्रेक्षकाकडून इतकी तीव्र आणि बहुरंगी प्रतिक्रिया मिळवल्याबद्दल चित्रकर्त्यांचं अभिनंदन करावं तितकं कमीच आहे.

-मेघना भुस्कुटे
meghana.bhuskute@gmail.com

भाई - व्यक्ती की वल्ली - भाग १ आणि भाग २ (२०१९) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

भाई - व्यक्ती की वल्ली - भाग १ आणि भाग २ (२०१९)
  • Official Sites:

    imdb
  • दिग्दर्शक: महेश मांजरेकर
  • कलाकार: अश्विनी गिरी, इरावती हर्षे, सागर देशमुख
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१९
  • निर्माता देश: भारत