बकेट लिस्ट (२०१८): एकदम 'डब्बा'!
मी माधुरीच्या एक्सप्रेशन्सचा, नाचाचा मोठा फॅन आहे. तरीही माझ्या 'बकेट लिस्ट' कडून फार काही अपेक्षा नव्हत्याच. त्या सिनेमाचा ट्रेलर आणि त्यात माधुरीचं विचित्र ॲक्सेंटमध्ये बोलणं, तिचा अगदी चकचकीत लुक वगैरे बघून सिनेमा 'बेतास बात' आहे हे समजत होतं. पण तसा तर तसा, किमान माधुरीचा नाच तर पाहता येईल या अपेक्षेने सिनेमाघर गाठले (चूक कबूल! पण अहो वेळ काय सांगून येते का? ). खरंतर अनेक मैतरांनी सिनेमा नको बघूस असा स्पष्ट सल्ला दिला होता, पण माधुरीचा नुसता फोटोही छान वाटतो, इथे ती सतत दोन तास दिसेल वगैरे मुक्ताफळे उधळत आणखी चार मित्रांना त्या स्क्रीनमध्ये डांबले (विनाशकाले... ) .
आधीच सांगतो की सिनेमा भयंकर भिकार आहे. कोणत्याही सिनेमात नुसतं कथासुत्र ठीकठाक असून अजिबात भागता नाही तर कोणताही सिनेमा अनेक गोष्टींचा मेळ असतो. सिनेमा सुरू होता क्षणी पहिल्या एका मिनिटात डबिंगनंतर दिसणारं 'लिप-सिंक' काही प्रसंगांत गंडलेलं आहे हे ध्यानात आलं. त्यात डबिंग आर्टिस्टची चूक की मुळात डायलॉग डिलीव्हरी इतकी भीषण होती की ते डबिंगमुळे इतपत सुधारलं हे त्याचं कसब असा प्रश्न पूर्ण सिनेमाभर व्यापून राहिला होता. सिनेमात माधुरीचा अभिनय इतका कृत्रिम आहे की रेशम टिपणीस भयंकर व्हर्सटाईल वगैरे वाटू लागते. एकूणच संवादलेखन तर आतून कच्च्या राहिलेल्या भरताच्या वांग्याइतके लिबलिबीत आणि गिळगिळीत आहे. शेवटी शेवटी या संवादलेखक इतका वाहवतो की एका (म्हणे) भावोत्कट वगैरे प्रसंगात बायकोला नवरा विचारतो की "मी तुझ्या बकेटलिस्टमध्य आहे का?" तर ती म्हणे "तूच तर माझी बकेट आहेस"! हे ऐकताच माझ्यासारख्या नवऱ्यांचाच 'डब्बा' केल्याने, मी अचानक आ करून बसलोय आणि पोटावर 'माझा खाऊ मला द्या' अशी पाटी आहे (त्यात बायको लिस्ट टाकते आहे) असाच भास झाला.
संवाद, डबिंग याद्वारे कानावर अत्याचार होत असताना डोळ्यांनाही सुखावलेले नाही बरं! माधुरी असली म्हणून काय झाले, एकतर तिला साजेसा नाच तिच्या वाट्याला नाहीच. त्यात तिला मध्यमवयीन दाखवलं तर नक्की काय बिनसेल कळत नाही. थेटरच्या पडद्यालाही थोडं फाउंडेशन चिकटून बसेल इतके थर तिच्या हरेक क्लोज अपमध्ये दिसतात. बरं श्रीदेवीने इंग्लिश विंग्लिश मध्ये पाचवारी घालून लगबग केली तर तो फॉर्म्युला बराय असं समजत "चला आता टिपीकल गृहिणीची तारांबळ दाखवूया" असं ठरताच माधुरीअक्का वेगेवेगे चालण्याचा अभिनय करत जीवाचा आटापिटा करते खरा, पण प्रत्यक्षात तिने पदार्थ वाढण्यापासून, गरम वस्तू उचलण्यापर्यंत अनेक क्रियांचे अनुभव बापजन्मात घेतलेले नाहीत हेच अधोरेखीत करत जाते. तिची वेषभूषा, केशभूषा यादेखील कधीही न विस्कटलेल्या (किंवा बेतशुद्ध विस्कटलेल्या) घडीच्या आहेत. एकुणच माधुरी ही माणूस न वाटता सिनेमा सजवायला वापरलेली बार्बी वाटू लागते.
बाकी पटकथेबद्दल आणि दिग्दर्शनाबद्दल काही लिहायचे तर साक्षात सरस्वतीला भांगडा करावा लागेल. "अरे यांचा प्रॉब्लेम काय आहे" हे वाक्य दर ३ मिनिटात किमान एकदा म्हणावंस वाटतं. कशाचीच कशाला संगती नाही. संडासाच्या पाइपमधून पिंपळ फुटावा तसे एकरेषीय कथेवर प्रसंग फुटले आहेत - अल्पजीवी, असुंदर आणि उगाच! त्यात माधुरीला नाच या नावाखाली जे काही करायला लावलं आहे ते बघून सरोज खान छाती बडवत रडेल!
सिनेमा बघून खरंतर दोन आठवडे झाले नि वेळीच तुम्हाला सावध करायची इच्छा होती पण नाही जमलं. मात्र, ज्यांचा बळी जाणं अजून शिल्लक आहे त्यांनी तरी वेळीच सावध व्हा!
बकेट लिस्ट (२०१८) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
