हिचकी (२०१८): एका व्यावसायिक फॉर्म्युलाचा छान वापर!

'हिचकी' पाहिलात का? नसेल तर जरूर पहा. मुख्य स्त्री भूमिका प्रस्थापित करू पाहणाऱ्या हल्लीच्या काही चित्रपटांच्या रांगेत उठून दिसणारा हा सिनेमा आहे. शिवाय 'बेख्डेल टेस्ट' मध्ये  उत्तीर्ण होणारा हा सिनेमा भावनाप्रधान, नाट्यप्रधान वगैरे असला तरी एकाच प्रकारच्या मेलोड्रामामध्ये अडकून राहत नाही. अशा प्रकारचा सिनेमा भारतात किंवा एकुणातच नवा नाही. हा सिनेमा वेगळ्या प्रकारे हा विषय हाताळू पाहतही नाही. नेहमीसारखा सरळसोट फॉर्म्युला फारशा चुका न करता वापरला आहे. 

आजवर अनेक कथा, कादंबऱ्या आणि सिनेमांमध्ये निम्न आर्थिक स्तरातील व ज्यांना 'वाया गेलेले' नावाचा शिक्का बसला आहे असे विद्यार्थी आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकणारा शिक्षक अश्या प्रकारची कथानके येऊन गेली आहेत. असे सिनेमे वेगवेगळ्या देशांत, भाषेत येऊन गेले आहेत. हा सिनेमासुद्धा त्या सगळ्यांपेक्षा फार वेगळा नाही. मात्र आधी म्हटलं तसं फारसा गोंधळ आणि कंटाळा यायच्या आत मेलोड्रामा आटोपता घेतल्याने सिनेमा छान बनला आहे.

सूचना:  इथपासून कथावस्तू उघड केली आहे. आपल्या जबाबदारीवर वाचावे

सिनेमाची नायिका नैना (राणी मुखर्जी) हिला ट्युरेट सिंड्रोम नावाचा आजार असतो. यात शरीराला क्षणभर झटका बसून वेगवेगळे आवाज किंवा लकबी माणूस करतो. ते करणं/ न करणं त्याच्या नियंत्रणात नसते. तर असा सिंड्रोम असणारी नैना शाळेत शिक्षिका बनण्याची जिद्द आणि स्वप्न बाळगून असते. शेवटी खूप प्रयत्नांनंतर तिला एका प्रथितयश शाळेत नोकरी मिळते खरी मात्र  तिला आरटीईमध्ये प्रवेश देण्यात आलेल्या जवळच्या गावठाणातील मुलांचा वर्ग दिला जातो. ती हे आव्हान स्वीकारते आणि वेगवेगळ्या कॢप्त्या आणि शिकवण्याच्या पद्धती वापरत तसेच त्या मुलांच्या न्यूनगंडावर काम करत ती त्यांना यशस्वी करते असे एकुणात कथासुत्र आहे. नैनाच्या ट्युरेट्समुळे कथानकाला अश्या इतर सिनेमांच्या तुलनेत अधिक गुंतागुंत आणि खोली मिळाली आहे. 

मला या सिनेमात राणी मुखर्जीचा अभिनय आवडला. सिनेमातील मोठा काळ आपल्यावर कॅमेरा आहे. आपल्यासोबत इतर कोणतेही मोठे पात्र , अभिनेता नाही तेव्हा पूर्ण सिनेमा आपला आहे, हे माहीत असूनही अनेक आव्हानात्मक प्रसंगांत तिने शॉटकट घेणे टाळले आहे. अश्या सिंड्रोमचा अतिरिक्त बाऊ किंवा अतिरिक्त ग्लोरिफाईड अभिनय न केल्याने तो तिच्या आयुष्याचा भाग म्हणून आपल्याही समोर येतो आणि काही वेळात तो सिंड्रोम मागे पडून प्रेक्षकही त्या चौदा मुलांच्या वर्गावर आपले लक्ष केंद्रित करू शकतो हे त्या अभिनयाचे यश. त्याशिवाय तिची संवादफेक एकेकाळच्या 'टिपीकल' आणि आपल्या जव्हारीदार आवाजाचं भांडवल करण्याच्या पलीकडे जाऊन संवादाच्या गरजेनुसार खूप छान व्हेरिएशन्स ती देते. एक अभिनेत्री म्हणून तिने स्वत:त चांगले बदल घडवलेले या सिनेमात नक्की दिसतात. चौदा मुलांपैकी मुख्य पात्र उभी राहतात त्या सगळ्या मुला-मुलींचा अभिनयसुद्धा अतिशय नैसर्गिक झाला आहे. यापैकी काही चेहरे अधिक मोठ्या भूमिकांनाही चांगला न्याय देऊ शकतील.

दुसरी गोष्ट चांगली आहे ती म्हणजे संवाद आणि पटकथा. अश्या सिनेमात आत्यंतिक भडक किंवा मेलोड्रामाने ओतप्रोत प्रसंग नि संवाद येण्याची खूप शक्यता असते. नैनाचे लहानपण असो किंवा तिच्या वडिलांसोबतच्या नात्याचा प्रवास असो सिनेमात फार अनावश्यक तपशील/प्रसंग न घातल्याने मूळ सिनेमाचा गंभीरपणा टिकून राहतो आणि सिनेमा फ्यामिली मेलोड्रामा किंवा ट्युरेट विरोधी लढा न होता शिक्षणाबद्दल मूलगामी असं काही बोलू शकतो. पटकथेने अश्या प्रकारे आपला 'फोकस' नक्की केला आणि तो शेवटापर्यंत इमाने इतबारे टिकवला आहे त्यामुळे सिनेमा पाल्हाळीक होत नाही. इतके असूनही काही प्रसंग 'डोळ्यात बोट' रडवणारे होण्याच्या खूप जवळ जातात. मात्र त्यावेळी कमीत कमी संवाद किंवा संवादांचा अभाव सिनेमाला पुन्हा सावरतात. अर्थात काही प्रसंगात संवादातील तर्क पूर्णतः हास्यास्पद आणि सरसकटीकरण करणारे आहेत. पण असे संवाद कमी असल्याने 'हिंदी सिनेमा म्हटलं की असं सरसकटीकरण आलंच' म्हणून सोडून देता येतं. आणखी एक बाब म्हणजे असे सिनेमे 'उपदेशी' होण्याची खूप मोठी शक्यता असते. यातील काही संवादात पुरेपूर फिलॉसॉफी झाडली असली तरी ती प्रेक्षकांना उगाच उठसूट गंड लादणारी नाही.

संवादांची भाषा, त्यातले बंबैय्या बारकावे आणि सिनेमात दाखवली जाणारी मुंबई, पात्रांची खास विचारपूर्वक आलेली वेषभूषा या आणखी काही छान गोष्टी. एकूणच सिनेमाचं चित्रीकरण, रंग यावर बराच विचार केला आहे हे सतत जाणवत असते. 

आधी म्हटलं तसं सिनेमाची कथा अतिशय प्रेडिक्टेबल आहे. तसं असूनही सिनेमा पूर्णवेळ खिळवून ठेवतो. नेहमीचा यशस्वी फॉर्म्युला नीट वापरत एक साधा प्रभावी सिनेमा देतो. त्याच बरोबर आपण भारतात एक पूर्णतः 'व्यावसायिक' सिनेमा बनवतोय त्यामुळे हरेक वेळी फार साटल्य वगैरे न बाळगता भारतीय प्रेक्षकांना किमान जितकं लागतं तितकं(च) हा सिनेमा आड्यन्सला रडवतो आणि जिंकतो.

हिचकी (२०१८) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

हिचकी (२०१८)
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: सिद्धार्थ मल्होत्रा
  • कलाकार: राणी मुखर्जी
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१८
  • निर्माता देश: भारत