हरिद्वार, गंगा, स्मरणरंजन आणि बरंच काही..
कथासूत्रः
अर्धशिक्षित व आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसलेल्या नायकाचं शिकलेल्या लठ्ठ मुलीशी तिच्या भविष्यातल्या पगारावर डोळा ठेऊन लग्न लाऊन दिलं जातं. त्याला ती आवडत नाही, पण नंतर घडणार्या घटनाक्रमामध्ये सूर जुळतात असं ढोबळ कथासूत्र आहे. म्हणावं तर घिसापिटा वाटणार्या या विषयावर आलेला हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरावा.
साधारणतः चित्रपटाची नायिका म्हणजे अगदी रोहिणी मासिकेतल्या स्थळाचं वर्णन जिला बरहुकूम लागू पडावं अशीच असते. सुंदर, नाकी-डोळी नीटस, गोरी, सुडौल, शेलाटी, एक ना दोन. या 'दम लगा के हैशा' ची नायिका याच्या अगदी उलट आहे. यापूर्वी अशा धाटणीचे चित्रपट आलेच नाहीत असं नाही. मराठीतला 'मुंबईचा फौजदार' हे पटकन आठवणारं उदाहरण तर आहेच, पण हिंदीतही अगदी 'लव इन सिमला' सारख्या चित्रपटापासून ते ' जस्सी जैसी कोई नहीं' सारख्या मालिकांपर्यंत अशा उदाहरणांची परंपरा चालूच आहे. आता जस्सी आहे म्हणजे इंग्रजीतही 'अग्ली बेट्टी'छापाची पंरपरा थोडीफार असावी असं मानायला हरकत नाही. बायको/प्रेयसी सुंदर किंवा चारचौघांत न नेण्यासारखी नसल्याने कुणीतरी मग तिचा उद्धार करतं. ती एकदम अशी छान, मॉडर्न, फॅशनेबल बनते आणि मग एकदाची नवरोबांना ती आवडायला लागते. असे सिनेमे पाहताना ती तिला वाटतं म्हणून नाही तर फक्त पुरूषासाठी बदलतेय, तिला सरळ सरळ नाकारलं जाऊन तिचं पूर्ण व्यक्तिमत्व बदललं जातंय या गोष्टीबद्दल कुणाला आक्षेपही असत नाही. मात्र अशा उलट्या गंगेचे चित्रपट आठवायचा खूप प्रयत्न केला तेव्हा शाहरूखचा 'रब ने बना दी जोडी' फक्त आठवला. पण त्यातही नायिकेला शेवटी तो आहे तशाच रूपात त्याला स्वीकारायला भाग पाडलंय.
कोई तुम्हे बदलके प्यार करे..
तो वो प्यार नही, वो सौदा करे..
और सायबा, प्यार मै सौदा नहीं!
असं म्हणणारी फिल्म इंडस्ट्री नायिकेच्या बाबतीत सरळसरळ दांभिकपणा दाखवते. पण या सिनेमात असं काहीही होत नाही. बहेनजीसारखी दिसणारी नायिका शेवटपर्यंत तशीच राहाते. इतकंच नाही तर स्वप्नदृश्यंही नायक-नायिका चोप्रांच्या नेहमीच्या लोकेशनवरचं न पाहता अगदी वास्तववादी पाहतात. यांमुळे हे अगदी आजूबाजूला घडणारे कथानक वाटते. इतकंच नाही, तर चित्रपटात नायक 'प्रेमप्रकाश तिवारी' व नायिका 'संध्या वर्मा' आहेत. लग्न झालं म्हणून तिला गृहित धरून तिचं आडनांव बदलण्याचा आपसूक आगाऊपणा न केल्याचंही खूप आवडलं.
मला या चित्रपटाची नायिका प्रचंड आवडली आहे. ती लठ्ठ असली तरी तिला त्याचा न्यूनगंड नाही. हवा तितकाच आत्मविश्वास आहे, त्या पलिकडे गेलं की त्याचं गर्वात रूपांतर होतं. इथे ते होऊ दिलेलं नाही. ती घरच्यांशी प्रेमाने वागते. नवर्याच्या आत्याच्या प्रत्येक टोमण्याला उत्तर देऊ नये इतकी ती सोशिक आहे. पण नेहमीच ऐकून घेणारी सिरियलछाप मूर्ख बहू न बनता ती एकदोनदा कठोर उत्तर देते आणि तिला हवा तो मानसन्मान मिळत नसल्याचं बोलूनही दाखवते. ज्याला खरंतर हिरो बनायचं होतं पण नियतीनं ज्याचं आयुष्य ३६डी-३४बी इथपर्यंतच मर्यादित ठेवलंय तो नवर्याचा मित्रदेखील तिला अंतर्वस्त्र दाखवताना कसनुसा होतो, पण ही ओशाळं न होता आणि तरीही शक्य तितक्या शालीनतेने त्याला ती दाखवायला सांगते. इतकंच नाही तर अगदी संभोगामध्येही पुढाकार घेते. आणि तेही टिपिकल फिल्मी मादक गाणं किंवा नृत्य न करता. आपल्या चित्रपटांत साटल्य अभावानेच दिसतं. त्यामुळे व्यक्तीरेखांचं चित्रण साधारणतः टोकाचं केलं जातं. त्या वाटेवरून दिग्दर्शक जाता, तर नायिकेला इथं बिंधास्त दाखवलं गेलं असतं आणि चित्रपट पुरता फसला असता. पण इथे नायिकेला मर्यादाशील दाखवतानाच एक स्वतंत्र आचार-विचारांची स्त्री म्हणून दाखवण्यात दिग्दर्शकाला यश आलंय. नवर्याला परमेश्वर मानणार्या संस्कृतीत जन्मून आणि वाढूनही अपमानाचा बदला कानाखाली सणसणीत मारून घेते तशीच ती 'मुझे नहीं जाना, मुझे रोक लो' अशी प्रेमाची विनवणी देखील करते. चिडलेल्या आत्येसासूला आणि नवर्यालाही दोन शहाणपणाचे शब्द सुनवायची संधीही सोडत नाही आणि तरीही ती स्वत:ला शहाणी समजत नाही, यातच सगळं आलंय. एकूणातच, ही सगळी भट्टी व्यवस्थित जमून येणं ही कौतुकाची बाब आहे.
चित्रपटाला १९९५ मधल्या हरिद्वारची पार्श्वभूमी लाभलीय. उत्कृष्ट चित्रण आणि साधलेल्या इतर बारकाव्यांमुळे तो काळ डोळ्यांसमोर अगदी उभा राहातो. काळानुरूप दिसणारे बजाजच्या स्कूटर्सचे आणि जुन्या फियाट कार्सचे नमुने, जुन्या शहरांतले अरूंद गल्ली-बोळ, दुकानावरच्या पाट्या स्मरणरंजनाचा सुखद अनुभव देतात. नायकाचा व्यवसाय लक्षात घेता किमान एकदा कॅसेटची टेप तुटणं, ती त्याने जोडणं आणि मग कॅसेटमधलं रीळ कशाने तरी फिरवून पुन्हा ती बसवणं, कॅसेटमध्ये गाणी भरून घेणं हे सगळं तर यायलाच हवं होतं. पार्श्वभूमीवर 'मिले सूर मेरा तुम्हारा' आणि इतर गाणी हे गृहीतक होतं. प्रेमचं गंगातीरावरचं घर अगदी प्रेमात पडावं असं आहे. घराला पुरेसं अंगण नसलं तरी ऐसपैस गच्ची आणि वाकलं तरी स्पर्श व्हावा इतपत अंतरावरचं नदीचं पात्र!! अगदीच नाही म्हटलं तरी एखादी चूक सापडतेच. नायक-नायिकेचा पलंग करकरताना ऐकून प्रेमचे आईवडील खुश होतात आणि ही बातमी त्याच्या बहिणीलाही कळवतात. नंतर माहेरी गेलेली नायिका आईवडिलांना 'मी जशी गेले तशीच परत आल्येय' हे ऐकवते तेव्हा तिच्या बाबांचं प्रत्युत्तर ऐकून ती तिच्या कुंवार असण्याबद्दल बोलतेय हे कळतं. आणखी अशा एक-दोन चुकार गोष्टी वगळता चित्रपटात खटकण्यासारखं काही सापडत नाही.
चित्रपटातली गाणी एकंदर कुमार शानू आणि अनू मलिक इफेक्ट्मुळे त्या काळात घेऊन जातात. 'मोह मोह के धागे' हा 'दम लगा के..'चा चरमबिंदू म्हणायला हरकत नाही. 'सुंदर सुशील..', गावाताल्या टिपिकल बँडपार्टीसोबत येणार्या गायकमंडळींची आठवण करून देतात. 'दर्द करारा' त्यातली वेशभूषा, संगीत, आणि मागे नाचणारे एक्स्ट्रॉजमुळे अगदी चपखल जमलंय.
तसं पाहता या चित्रपटात काय नाही? मुलाला सदैव लहान समजणारे आणि अगदी त्याचं लग्न झालं तरी 'पायताणानं हाणणारे' वडील, सतत असं कर- तसं कर चा धोषा लावणार्या दोघांच्याही आया, भांडणारा भाऊ, कुजकट बोलणारी पण प्रसंगी मायेचा पाझर फुटणारी कजाग आत्येसासू, सगळेच त्यांच्या जागी चपखल बसलेयत. 'आँखो देखी' नंतर संजय मिश्रा-सीमा पाहावा यांचा पुन्हा एकदा सुंदर अभिनय पाहण्याची संधी इथे मिळते. घरीच असलेली बहीण, मुलाचं खुपणारं नाकर्तेपण, आर्थिक विवंचना, मुलाच्या संसाराची काळजी हे सारं वाहून नेणारा घरचा कर्ता पुरूष संजय मिश्रांनी छान रंगवला आहे. मान मिळाला न मिळाला तरी मुलीची जागा तिच्या सासरी अशा समाजाचे प्रातिनिधित्व करणार्या संध्याच्या आईच्या भूमिकेत सीमा पाहावा ही अगदी फिट्ट. “पहिल्या रात्री सरकारी नोकरी लागेपर्यंत मुलंबाळं होऊ देऊ नका” असा सल्ला देणारी नायकाच्या बापाची व मुलीची बाजू घेण्याऐवजी कोर्टात त्या विहिणीच्या गळ्यात पडून रडण्याची त्या-त्या पात्रांची मानसिकता उभी करण्यात संजय मिश्रा आणि सीमा पाहावा कुठेही कमी पडले नाहीयेत. यापूर्वी आयुष्मान खुराणाने तो एक चांगला अभिनेता आहे हे दाखवून दिलेले आहेच. नायिकेने तो तिला उचलू शकेल का हा प्रश्न विचारल्यावर त्याचं 'इतने साल शाखामें वर्जिश यूँही नहीं की है' म्हणतानाचे त्याचे बेफिकिरीयुक्त पोकळ शब्द संवादफेकीतून दाखवणं एकदम लाजवाब. यशराज चोप्रांच्या मार्केटिंग विभागात नोकरी करणार्या भूमी पेडणेकरने संध्या वर्माच्या मुख्य भूमिकेत नवखेपणा अजिबात जाणवू दिला नाही, हे आणखी एक विशेष.
या चित्रपटात दिसलेली गंगा हाही एक लक्षणीय भाग आहे. रोजच दिसणार्या गंगेचं काही अप्रूप न राहता सगळेजण सरळ नदीच्या पात्राकडे पाठ फिरवून गप्पा मारत असतात. त्या गप्पांतही ’गंगामैया की सौगंध’, महाआरती किंवा पाण्यात दिवे सोडण्याचे सोहळे असलं काही न येता ती फक्त चित्रपटभर सगळीकडे तिचं अस्तित्व दाखवत राहाते. अध्यात्मिक वारसा सांगणार्या शहरातील आदीभौतिकात तितकीच फिट्ट बसलेली माणसे, शाखा-शाखाबाबू आणि तिथे चालणार्या गोष्टींचं यथार्थ चित्रण, नव्वदीच्या दशकातल्या स्थित्यंतरादरम्यानच्या बदलत्या आर्थिक रचनेसोबत लोकांच्या जीवनामानातल्या बदलाचे सुरूवातीचे वारे हे सगळं अगदी तपशीलात दिसून येतं.
असा 'Beauty lies in the eyes of beholder' या उक्तीचा प्रत्यय देणारा सिनेमा एकदा पाहायला काहीच हरकत नाही.
दम लगा के हैशा - चित्रपटाची /नाटकाची माहिती
