इनसाईड आउट (२०१६): आपला आपणाशी संवादू
सिनेमा सुरू होतो तेव्हा एक लहानशी मुलगी जन्म घेते. काही क्षणात आपण तिच्या डोक्यात - मेंदूत - मनात शिरतो. तिथे आणखी एक मुलगी असते. ती त्या मुलीचा एका कंसोलद्वारे 'ताबा' घेते आणि मुलीसाठी आई-वडील अशा पहिल्या महत्त्वाच्या आठवणी साठवते. ही मनातली मुलगी स्वतःची ओळख करून देते 'आनंद' (जॉय). ही जॉय नावाप्रमाणे, स्वच्छंदी असते, चपळ असते, पॉझिटिव्ह असते. तिच्याच शेजारी आपल्याला दिसू लागते दुसरी ठेंगणी, ठुसकी, उदास मुलगी. ती दिसताच चित्र पालटतं. आपली छोटी कन्या (जिच्या डोक्यात/मनात या दोघी आहेत) रडू लागते. कारण ही मनातली दुसरी मुलगी असते 'दु:ख'. लवकरच आपल्याला कळतं की या मुलीच्या आचाराला पाच जण नियंत्रित करत आहेत. आनंद, दु:ख याचबरोबर घृणा, राग आणि भिती हे ते पाच जण! हे पाच जण आणि मेंदूत वाढत्या वयासोबत निर्माण होत असलेली अधिकाधिक क्लिष्ट रचना आपल्याला दिसू लागते. या सगळ्याचा वापर करून हे पाच जण त्या मुलीला अधिकाधिक आनंदी ठेवायचा प्रयत्न करतात. पण एके दिवशी आपले जुने घर बदलून मुलीला दुसरीकडे जावे लागते. मग तिच्या मनोविश्वात मोठी खळबळ माजते. त्यातून नक्की काय बाहेर निघते. तिच्यात काय बदल होतात. त्या बाह्यबदलांमागे तिच्या मनात काय काय बदल झाले असतात हे सगळं प्रत्यक्ष पडद्यावर 'बघायची' संधी म्हणजे 'इनसाईड आउट' हा अॅनिमेशनपट!
बहिणाबाईंच्या मन वढाय वढाय मधील पुढील कडवं मला नेहमी सगळ्यात नेमकं वाटतं
मन एवढं एवढं
जसं खसखसंचं दानं
मन केवढं केवढं
आभायात बी मावेन
मन म्हणा किंवा मेंदू म्हणा त्याची रचना अतिशय क्लिष्ट अशीच. अशा वेळी हे मनाचं गणिताच्या आवश्यक तितक्या भागाचं असं काही सादरीकरण हा सिनेमा करतो की आपण त्या दुनियेत गुंगून जातो.
पिक्सारच्या सिनेमांपैकी 'वॉल-ई' (२००८) आणि 'अप' (२००९) नंतर इतक्या सफाईने आणि रंजकतेने काही म्हणू पाहणारा एक सिनेमा 'पाहिलाच पाहिजे' या प्रकारात मोडतो. वॉल-ई किंवा अप शी सर्वार्थाने वेगळा असला तरी रंजनासोबत काहीतरी मूलभूत म्हणू पाहणार्या आणि प्रेक्षकाला विचारांत पाडणार्या या मोजक्या सिनेमांच्या मालिकेत हा सिनेमा पुढील मैलाचा दगड ठरणार आहे इतके नक्की. (वेळ मिळाला नि मूड लागला तर अन्य दोन सिनेमांबद्दलही लिहेन कधीतरी)
एका अर्थाने हा एक युटोपियन सिनेमा आहे. मात्र जिथे कथानक घडते तो प्रदेश पुर्णतः काल्पनिक नाही आणि आपल्या अगदी परिचयाचा आहे. आनंद, दु:ख, राग, भीती आणि घृणा यांनी आपला ताबा घेतल्यावर काय होत असतं हे ही आपण रोजच्या रोज अनुभवत असतो. अशावेळी त्या परिचित परंतु न बघितलेल्या प्रदेशाला अतिशय वेगळ्या आणि मनोरंजक पद्धतीने सादर करून हा सिनेमा जिंकतो. एकदा का प्रेक्षक या मनाच्या अंतरंगाच्या विश्वाला सरावले की मग पटकथा लेखक त्यातील क्लिष्टपणा वाढवत जातो. केवळ भावनांवर केंद्रित व नियंत्रित असणारं मन मग हळूहळू चिरस्थायी स्मरण साठवू लागते तसेच त्या स्मरणाला वापरून दिवास्वप्ने बघू शकते, स्मरणरंजनही करू शकते किंवा रात्रीची स्वप्नेही बघू शकते. मनाला मग भास होऊ लागतात. वस्तुस्थितीचा विपर्यासही करणारे केंद्र आपल्याला भेटते. इतकेच नाही तर विस्मरणाची गर्ता, आपल्या अमूर्त कल्पनांनाही आपण पडद्यावर बघतो. इतकंच नाही तर अशीच एक जिव्हाळ्याची अमूर्त कल्पना त्या विश्वात मूर्त असल्याने एक महत्त्वाचे पात्र म्हणून आपल्याला भेटतेही.
मुळात या काल्पनिक प्रदेशाचे मूर्त चित्रणच इतके कल्पक आणि लोभस आहे की त्यापुढे सादर केलेली तुलनेने कमी ताकदीची गोष्टही रंजक वाटली असती कदाचित. अनेकदा अशा कमालीची रंजक कल्पना असणार्या लेखनाची मोठी मर्यादा असते तिचा तोचतोपणा. एकदा का अशा कल्पनेचं अंगभूत नावीन्य संपलं की, वेगवेगळे प्रसंग त्या कल्पनेला केवळ पूरक होतात; पण त्यातील मजा कमी होत जाते. या सिनेमात मात्र त्या कल्पनेचा विस्तार जवळजवळ ९०% वेळ होत असतो. आणि जेव्हा पुरेसा विस्तार होतो आणि यापुढे मजा कमी होईल असे वाटू शकते, त्याच वेळी सिनेमाचा तद्दन रंजक आणि फिल्मी क्लायमॅक्स येतो आणि सिनेमा संपतो. अतिशय उच्च दर्जाचे अॅनिमेशन ही या सिनेमाची आणखी एक ताकद. युटोपियन सिनेमांसाठी अॅनिमेशन जरी काहींना सोपे वाटत (कारण प्रत्यक्षाशी तुलना होत नाही ) तरी ते खरेतर अतिशय अवघड असते कारण तेच की इथे प्रत्यक्षाशी हरेकवेळी अन्योन्यसंबंध जोडता येत नाही. मात्र प्रेक्षकांसाठी ते एक परिपूर्ण विश्व असते. त्यात एखादी लहानशी विसंगती त्या विश्वाच्या फोलपणाची जाणीव करून देऊ शकते. अशावेळी डिटेलिंगचे महत्त्व प्रत्यक्ष दुनियेतील चित्रीकरणाइतकंच (किंबहुना अधिकच) असते. हा सिनेमा ते आव्हान सहज वाटेल इतक्या ताकदीने पेलतो
'आतल्या आवाजा'च्या सादरीकरणाची ही कल्पना बाजूला काढून या सिनेमाबद्दल बोलता येणार नाही. खरंतर ही चित्रणाची कल्पनाही काही परिपूर्ण नाही किंवा शास्त्रीय दृष्ट्या अचूकही नाही. 'कंटाळ्या'सारख्या भावनेचा विचारही हा सिनेमा करत नाही किंवा शेवट फिल्मी केल्याने सुरुवातीला लाभलेले कोंदण शेवटापर्यंत उरत नाही, अशा सारखे फुटकळ समीक्षकी आक्षेप घेता येतीलही पण त्यात काही दम नाही कारण ते आक्षेप असे नसून अपेक्षा आहेत . तेवढे वगळले तर संगीत, पात्र-उभारणी पासून ते संवादापर्यंत हा सिनेमा, सुरू झाल्यापासून प्रेक्षकाची पकड जी मिळवतो ती सिनेमा संपून काही दिवस लोटल्यावरही कमी होत नाही. आपल्याच मनाच्या भावभावनांच्या, स्वप्न-आकांक्षांच्या, समजुती-कल्पनांच्या खेळाकडे आपणच एका नव्या दृष्टीने बघू लागतो.
स्वतःकडे आरशात पाहताना आपल्याला बाह्यरूप दिसते. पण मनाच्या अमूर्त प्रदेशात डोकावून 'आपला आपणाशी संवादू' करायचा असेल तर हा सिनेमा टाळणे शक्य नाही.
इनसाईड आउट (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
