कबाली (२०१६): इट इस सो बॅड दॅट इट्स गुड

कबाली (२०१६): इट इस सो बॅड दॅट इट्स गुड

 

कबाली येतोय, रजनी देवाचा पिक्चर, सगळे रेकॉर्ड तुटणार, चेन्नई मध्ये कंपन्यांना सुट्टी, मुंबईमध्ये सुद्धा सकाळी 5 वाजताचा शो!  एवढ्या प्रचंड प्रमाणात हाईप होते. मग कबाली येतो आणि  ही हाईप अगदी शिगेला पोहचते. तुमचे सोशल मीडिया “वॉचिँग कबाली फर्स्ट डे” सारख्या पोस्ट्सने भरून जाते. या सगळ्याला तुम्ही बळी पडता आणि रविवार सकाळचे कबालीचे तिकीट बुक करता..

 

शनिवारी रात्री तुमच्या चांगल्या मित्राचा फोन येतो आणि खालील प्रेमळ संवाद घडून येतो.

मित्र: कबाली चुकूनही पाहू नकोस.

मी: अरे काय झालं? तू पाहिलास का?

मित्र: हो. मी जस्ट शो मधून बाहेर पडलोय. एक नंबरचा थुकरट पिक्चर आहे. कुणी फुकट तिकीट दिले तरी जाऊ नकोस.

मी: फक, मी उद्या सकाळच्या शोचे तिकीट काढलेत राव.

मित्र: आत्ताच्या आत्ता ’बुक माय शो’वर तिकीट कॅन्सल कर, त्यापेक्षा आपण उद्या सकाळी फिरायला जाऊ.

मी: चल ठेव फोन, मी करतो तिकीट कॅन्सल.

 

’बुक माय शो’वर गेल्यानंतर “Tickets Once sold cannot be returned or cancelled” असा गोंडस मेसेज बघायला मिळाला. मग आमचा मित्र मूर्ख आहे, उगाच त्रागा करतो, त्याला सिनेमातले काही कळत नाही, आपण लै भारी अशी आमच्या मनाची समजूत घालत आमची स्वारी थेटरात पोहचली. तर हे होते आमचे घडाभर तेल.

 

तर सिनेमा सुरु होतो तोच कबालीला जेलमधून बाहेर येऊ द्यावे का नाही या  मीटिंगपासून. कबालीला बाहेर येऊ द्यावे असा एकदाचा निर्णय होतो आणि 60 वर्षांचा कबाली स्क्रीनवर येतो. जेलच्या सेलमधून बाहेर पडताना सेलच्या दाराला मस्त पुल-अप्स वगैरे मारतो. इकडे आम्ही एकदम खुश!! रजनीची जोरदार एंट्री होते. कुणीतरी त्याला घ्यायला आलेलं असतं आणि तो मनुष्य कबालीला त्याच्या गैरहजेरीत कशी कौलालंपूर(अवघड आहे राव हे नांव टाईप करणे! तर आमच्या सोयीसाठी आपण के एल सिटी म्हणूयात) आणि इंडियन मलेशियन्सची तैतालिस(४३) गॅंगने कशी वाट लावलीय ते सांगतो.  त्या गॅंगचा एक रँडम गुंड पेटशॉपच्या नावाखाली ड्रग्सचा व्यवसाय कसा चालवतोय वगैरे सांगतो. मग काय? कबाली चांगल्या मनाचा गँगस्टर.  त्याला ड्रग्स आणि प्रॉस्टिट्यूशन कसे चालणार बरे? त्यातून या तैतालिस गॅंगनेच म्हणे त्याच्या गरोदर बायकोला (राधिका आपटे) मारलेले असते म्हणे. जेलमधून बाहेर पडलेला कबाली डायरेक्ट एक मर्सिडीज गाडीच पेटशॉपमध्ये घुसवतो. या सीनला आम्ही आपल्या खुर्चीत सरसावून बसतो आणि मनात “यन्ना रास्कला माईंड इट” म्हणून बघायला लागतो. (लैच पाल्हाळ लावायला लागलोय यार मी. एवढी तर चित्रपटाची स्टोरी पण नाही) मग त्यांनतर सिलसिला सुरु होतो तो रँडम सीन्सचा. एकावर एक कॅरेक्टर्स आपल्यावर आदळत जातात, मध्येच पिक्चर इमोशनल वळणं घेतो,  मध्यंतरानंतर मारधाड, गुड गँगस्टर बॅड गँगस्टरला मारतो आणि मग संपला पिक्चर.

 

( हा असा रिव्ह्यू लिहिला तर या साईटचे नाकाने कांदे सोलणारे संपादक छपणारच नाहीत. थोडं चिंतन करावे आता..)  तर मंडळी ह्या सिनेमाचे मातेरं होतं त्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे विस्कळीत नरेशन. काय घडतंय हे कळायच्या आधी पुढच्या सीनमध्ये तिसरंच काही झालेलं असतं.  डायरेक्टरने एकाही कॅरेक्टरला इस्टॅब्लिश होऊ दिले नाहीय.   उदाहरण म्हणून एक रामप्रसाद नावाचं पात्र पाहू.  ते इस्टेट वर्कर्सच्या बाजूने लढणारे नेते आहेत असे वाटत असतानाच अचानक ते एक गँगस्टर आहेत कळतं. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना गँगस्टर म्हणणं याव्यतिरिक्त   त्याचा दुसरा काही संदर्भ नाही.   डायरेक्टरने अगदी रजनीच्या कॅरेक्टरला पण तयार होऊ दिले नाहीय. त्याहून महत्वाचे कारण म्हणजे मिसिंग रजनी स्वॅग. रजनीच्या सगळ्या पिक्चरमध्ये त्याचे फाईट सीन्स, त्याचे चालणे, बोलणे... एकूणच टोटल स्वॅग असतो. पण या पिक्चरमध्ये तसेही काही घडत नाही.  अगदी काही ठिकाणी मस्त फाईट सीन येईल असे वाटत असताना पुढचा सीन येतो.  

 

एवढे वाईट असूनही आम्ही मात्र हा पिक्चर आम्ही एन्जॉय केला. (गिरे भी तो टांग उपर अजून काय?) त्याचं काय आहे ना, की तुम्ही मानसिक तयारीने गेला असाल तर कोणत्याही पिक्चरने तुमची करमणूक होते. तुम्हाला नको तिथं हसू येते. तैतालिस गॅंग हे नाव तुम्हाला विनोदी वाटते, फ्री लाईफ फाऊंडेशन ही तुम्हाला गुंडांची ट्रेनिंग इंस्टिट्यूट वाटते. ’फ्री लाईफ सॅल्यूट’(गुगल करा लगेचच, एक दोन तीन एक दोन तीन अशा तालात टाळ्या वाजवायचा आणि मग सॅल्यूट करायचा) हा प्रकार तुम्हाला हास्यास्पद वाटतो. योगीच्या एन्ट्रीला तुम्ही “हीच रजनीची मुलगी” असे तुम्ही ओरडता. चायनीजच्या हिंदी सबटायटल्समध्ये तुम्हाला “मिटा देंगे”च्या जागी “मीठा देंगे” सापडते. पण या सगळ्यावर एक प्रसंग कडी करतो. त्यात रजनी आणि राधिका दोघेही गन पॉईंटवर असतात, राधिकाच्या गळ्याला तर सुरी पण लावलेली असते. रजनीला मारण्यापेक्षा गुंडाला त्याच्या सूटाबुटावर जास्त आक्षेप असतो  आणि तसंही त्या गुंडाने या दोघांना मारणार हे त्याने जाहीर केलेलं असतं. अशा प्रसंगी हिरॉईनने काय रिऍक्ट करणे अपेक्षित आहे? आमची बया चक्क नवर्‍याचा सूट काढू नका अशी ओरडत सुटते  हो!!  मग, तुम्ही हसाल की नाही? तर अजून असे बरेच विनोदी प्रसंग या सिनेमात आहेत.

 

चित्रपट संपवून आम्ही बाहेर आलो आणि लगेच आमचा फोन वाजला. अर्थातच तो आमच्या मित्राचा होता.

मित्र :  काय मग आवडला का पिक्चर?

मी: ऑफकोर्स, तुला साल्या सिनेमातले काही कळत नाही. पण त्याहून महत्वाचे म्हणजे तू तैतालिस गॅंगचा मेम्बर आहेस म्हणून तुला नाही आवडला.

मित्र: चूप रे! फालतूची बकबक. काय आवडले रे  तुला?

मी: एका वाक्यात सांगू? अरे मित्रा, इट इस सो बॅड दॅट इट्स गुड.


 

कबाली - चित्रपटाची /नाटकाची माहिती

कबाली
  • Official Sites:

    Wikipedia
  • दिग्दर्शक: पी ए रनजीत
  • कलाकार: धन्सीका, रजनीकांत, राधिका आपटे
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: 2016
  • निर्माता देश: भारत