रुद्रम (२०१७): निव्वळ थरारापेक्षा अधिक काही देणारी मालिका
'रुद्रम' नावाची मालिका गेले काही दिवस झी युवा वर लागतेय ती मी (अजूनतरी ) स्वेच्छेने बघतोय. सैराटोत्तर काळात मराठी मालिकांमधील साजूक तुपकट वातावरण ओसरतंय हे दिसत होतंच. 'दिल दोस्ती दुनियादारी'च्या यशाद्वारे - काळ्या पांढऱ्या रंगात रंगवलेल्या बाळबोध नि अनैसर्गिक पात्रांनी व्यापलेल्या; आणि एकत्र मोठाल्या कुटुंबातील व्यक्ती या नावाखाली अनेक कलाकारांना रोजीरोटी देण्यासाठी बनणाऱ्या- तथाकथित कौटुंबिक मालिकांचा लोकांना कंटाळा आला आहे हे दिसलं होतंच. त्या मालिकेनंतर 'झी युवा' सुरू होणं हा योगायोग होता की काय अशी शंका यावी इतकी भीषण परिस्थिती त्याही चॅनेलवर होती. पण आता 'रुद्रम' ने कूस पालटायला सुरुवात केलेली दिसते.
मालिकेतील कथानक किंवा अभिनय या बाबीकडं नंतर येतो. आधी काही इतर तांत्रिक बाबी. कधी नव्हे ते एखाद्या मराठी मालिकेने पात्रांना कॅमेरा समोर अर्धगोलात उभं करणं नि कॅमेरा गरजेनुसार एका ट्रॉलीवरून एकाच दिशेने फिरवणं बंद केलंय. काही प्रसंगात चक्क खांद्यावर कॅमेरा घेऊन प्रसंग चित्रित झालेले बघून आपण मराठीच मालिका बघतोय ना हे मी पुन्हा चाचपून पाहिलं. 'रियल टाइम' प्रकाश नि संगीताच्या नावाखाली साचेबद्ध आवाज या ऐवजी अस्सल ध्वनीचा वापर हा आणखी एक सुखद धक्का. यात कृत्रिम प्रकाश योजना नाही असे नाही पण त्याचा प्रसंगाच्या किंवा फ्रेमच्या नैसर्गिक पोतावर परिणाम होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतलेली जाणवते. तसेच इतर मराठी मालिकांच्या विपरीत कर्कश संगीतही टाळले आहे
वेशभूषा नि रंगभूषा या आणखी दोन जमेच्या बाजू. प्रसंगाला आणि मुख्य म्हणजे पात्राच्या स्वभावाला साजेशा वेशभूषेने आणि आततायी मेकअप किंवा 'स्टाइल स्टेटमेंट'चा किंवा प्रत्येक पात्राच्या "काहीतरी लकब हव्वीच बै" म्हणून ठेवल्या जाणाऱ्या लकबीचा पोरकटपणा टाळल्याने पात्रे खरी वाटू लागतात. त्यामुळे या तांत्रिक अंगांकडून झालेले सुखद बदल मला ही मालिका बघायला भाग पाडत आहेत. त्याव्यतिरिक्त अनेक कलाकारांचे अभिनय जमून आले आहेत.संदीप पाठकचा भाडोत्री मारेकरी क्लास रंगलाय! त्याने आजवर प्रसारित झालेल्या भागांतील खून इतके थंडपणे केलेत की 'कहानी'तल्या मारेकऱ्याची आठवण व्हावी. मुक्ता बर्वेने कित्येक वर्षांपूर्वी घेतलेला टिपिकल "कणखर स्त्री" चा बाज सोडणं सहजशक्य होत नसलं तरी रागिणीची कितीतरी गुंतागुंतीची व्यक्तिरेखा पेलायचा प्रयत्न प्रामाणिक आहे, मात्र ती व्यक्तिरेखाच अशी आहे की तिच्यात अभिनेत्रीला अजून मुरावं लागेल त्यामुळे त्यातील मर्यादांवर आता बोलणे आततायी होईल. बाकी इतर नेहमीचे यशस्वी कलाकार आपापली कामं चोख करताहेत इतकंच म्हणेन.
आता येऊया लेखन नि दिग्दर्शन या अंगांकडे. या पटकथेचा वेग अफाट आहे. अतिशय सुस्त नि रटाळ मालिकांनी कावलेल्या मराठी प्रेक्षकांना इतका वेग काही काळ सुखद वाटला तरी तो झेपेल का अशी शंका वाटते. लोकांना काळाच्या पट्टीवर रांगण्याची सोडा गोगलगायीसारख्या सरपटणाऱ्या मालिकांची सवय असताना, एखादी मालिका थेट उठून धावू लागली तर ते केवळ भांबावतील की त्या मालिकेची ते मजाही घेऊ शकतील असा प्रश्न पडतो. त्यात मालिकेचा दोष नसला तरी अश्या मालिकांचा ट्रेंड सेट करायचा असेल तर कथानकाचा वेग धीमे धीमे वाढवणं अधिक उपयुक्त ठरेल. दुसरं म्हणजे भाषा. काही पात्रांच्या तोंडी असलेले संवाद वेगवेगळ्या बाजांत येतात. उदा. रागिणीला सध्या ट्रेन करणारे मामा आधी बोली मराठी, ट्रेनिंग दरम्यान प्राज्ञ मराठी तर ट्रेनिंग नंतर गल्लीच्या तोंडावर ऍक्सेंटयुक्त इंग्रजी फाडतात. हे नक्कीच खटकतं.
मात्र एकूणच विषयाच्या आणि त्या विषयाच्या सादरीकरणाच्या नाविन्यासमोर हे आक्षेप फिके आहेत. ही मालिका पर्फेक्ट आहे असा दावा नाही. प्रत्येकाला ज्याचे त्याचे सुयोग्य आक्षेप असतीलही. पण प्रत्येक पात्राच्या संवादाला इतर प्रत्येकाचे हावभाव टिपणाऱ्या दिवाणखान्यातील ओशट किळसवाण्या मालिका बंद पडून नव्या प्रकारच्या मालिका हव्या असतील तर अशा मळलेली वाट सोडून इतर वाटेवर केलेल्या या चांगल्या प्रयत्नांना अधिकाधिक टीआरपी देऊन असे प्रयोग करण्याला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी आपल्यासारख्या प्रेक्षकांवरही आहे. तेव्हा ही मालिका बघाच अशी सणसणीत शिफ़ारस!
(चित्रे जालावरून साभार)
रुद्रम (२०१७) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
