संजू (२०१८): कुछ तो लोग कहेंगे...

होय, मी संजू पाहिला! 
खरंतर माझ्या मर्यादित विश्वात मी जेव्हा संजू पहाणार आहे अशी घोषणा केली तेव्हा लोकांनी देशद्रोहाविरुद्धचा मोर्चा माझ्यावर त्यांच्या नजरेनेच आणला. त्यांच्या त्या प्रतिक्रियांमुळे तिकिटं मिळायला काहीच त्रास होणार नाही अशी अटकळ मी बांधली. मात्र प्रत्यक्षात खचाखच भरलेले शोज बघून देशात अजूनही उदारमतवाद शाबूत आहे वगैरे गोग्गोड कल्पनांनी गुलाबी होत पुढल्या रांगांतली तिकिटंही काढली. 

"कोणतीही कलाकृती प्रत्यक्ष बघितल्याशिवाय त्याबद्दल भलं-बुरं करणं मला जमत नाही. मग गोडसेवरचं नाटक असो किंवा सिल्क स्मिता, गांधी, सावरकर, संजय दत्त, मेरी कोम किंवा मिल्खासिंग असे कोणाही वरचे चरित्रपट असोत किंवा मग पद्मावत वगैरे सारखा वादग्रस्त सिनेमा असो. आपल्या हव्या त्या विषयावरचा, हव्या त्या भूमिकेचं समर्थन/विरोध करणारा सिनेमा काढणं/न काढणं हा निर्माते-दिग्दर्शकाचा आणि तो बघणे/न-बघणे हा माझा घटनात्मक अधिकार आहे" वगैरे व्हर्च्युअल गर्जना करून (आणि सोबतीला टरफलांचे चित्र डकवून) माझ्या फेसबुकवर अकरा पुरोगामी लाईक्सची आणि पाच अतिपुरोगामी हार्टांची सोय केली आणि खरंतर उदारमतवादाची पताका वाहण्याचा भार माझ्याच खांद्यावर असल्यासारखा थिएटरात पोचलो.

सिनेमा 'राजकुमार हिरानी' यांचा आहे या एकमेव कारणासाठी मी खरंतर गेलो होतो. मुन्नाभाई असो वा पीके, लोकांना खिळवून ठेवण्याचं भारी कसब या दिग्दर्शकाच्या अंगी आहे. 'व्यावसायिक सिनेमा' कोळून प्यायलेला हा दिग्दर्शक जेव्हा चरीत्रपट घेऊन येतो तेव्हा तो कसा असेल याची खूप उत्सुकता असते. मलाही होती. थोडक्यात सांगायचं तर चरीत्रपट म्हणून निराशा झाली, मात्र चित्रीकरण, संवाद, अभिनय वगैरे कसोट्यांना एकेकटं बघितलं तर सिनेमा चांगला आहे. 

आपल्याकडे चरीत्रपट हे 'सिलेक्टिव्ह ट्रुथ' दाखवणारे असतात - आणि दुर्दैवाने हा सिनेमाही त्याला अपवाद नाही. फरक इतकाच की हा सिनेमा नायकाला पूर्ण सफेद रंगात रंगवत नाही. मुळात हा सिनेमा संजय दत्तचं पूर्ण चरित्र मांडत नाही. अर्थात तसं ते हवं हा हट्ट नाहीच. सिनेमाचा पूर्वार्ध स्वत:ची अंमली पदार्थाच्या व्यसनाविरुद्ध चाललेली लढाई तर उत्तरार्ध दंगलींनंतर संजय दत्त वरील लागलेले खरे-खोटे आरोप यावरच लक्ष केंद्रित करतो आणि संजयची प्रतिमा 'बिच्चारा' अशी निर्माण करून संपतो. संजय दत्तच्या करियरमधील कितीतरी महत्त्वाचे सिनेमे, त्याचे सहकलाकारांसोबतचे - विशेषत: नायिकांसोबतचे- संबंध, सुनील दत्त आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये झालेली प्रसिद्ध भेट इत्यादींबद्दल हा सिनेमा पूर्णपणे मौन बाळगतो. 

या सिनेमात संजय दत्तने अनेक मुलींसोबत ठेवलेले शरीरसंबंध किंवा त्याने अंमली पदार्थाच्या विळख्यात पुरते जाणे किंवा त्याने बाळगलेल्या बंदुका या गोष्टी उघडपणे दाखवल्या आहेत म्हणजे हा सिनेमा संजय दत्तला चांगल्या छटेत रंगवत नाही हा युक्तिवाद एका मर्यादेत योग्यच आहे. पण यापैकी कोणत्याही गोष्टीचा दोष संजय दत्तकडे जाणार नाही याची तजवीज मात्र हा सिनेमा करतो. केवळ त्याने ३०८ बायकांशी ठेवलेले संबंध आपल्याच बायकोसमोर हसत हसत सांगण्याचा प्रसंग सोडला तर इतर कोणत्याही कृतीसाठी सिनेमातला संजय दत्त जबाबदारी स्वत:कडे घेत नाही. अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडण्यासाठी तो एका तस्कराला आणि कडक शिस्तीच्या सुनील दत्त यांना दोष देतो तर पुढे बंदुका नि आरडीएक्स बद्दलच्या प्रकरणात दोष मिडीयाला देऊन मोकळा होतो. 

हे झाले प्रासंगिक तपशील. पण माणूस म्हणून व्यक्ती उभ्या करतानाही सिनेमा तोकडा पडतो. अख्खा तीन तासाचा सिनेमा संपल्यावरही संजय दत्त ही व्यक्ती माणूस म्हणून कशी आहे हे गुलदस्त्यात राखण्यात आले आहे हे कोणत्याही चरित्रपटाचे अपयश म्हणायला हवे. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील ठराविक घटनांवर फोकस करून चरित्रपट काढण्याचे अनेक प्रयोग झाले आहेत, पण कित्येक पाश्चात्त्य प्रयोगात ती व्यक्ती आपल्या गुणदोषांसह आपल्या समोर येते. गेल्या काही वर्षात चर्चिल, ॲलन ट्युरिंग, हॅना आरेण्ट, स्टीव्ह जॉब्ज या काही व्यक्तींवर किंवा त्यांच्या आयुष्यांतील ठराविक घटनेवर फोकस करणारे सिनेमे आले. या समकालीन सिनेमांशी तुलना केली तर संजू (किंवा इतर भारतीय चरीत्रपट) फारच एकरेषीय, एकाच प्रतलातून त्या व्यक्तीकडे पहाणारे आणि म्हणूनच कंटाळवाणे ठरतात. 

सुदैवाने रणबीर कपूर, मनीषा कोईराला, विकी कौशल या तिघांनीही उत्तम अभिनयाने सिनेमाला चांगलेच सावरले आहे. परेश रावल त्यांच्यापुढे काही प्रसंगी तोकडा वाटतो इतकं जीव ओतून हे तिघे काम करतात. गाणी आणि सिनेमाची अनावश्यक लांबी ही या सिनेमाची आणखी एक वाईट बाब. कंटाळा येईस्तोवर प्रेक्षकाला संजू कस्सा बै 'टेररिस्ट' नाही हेच वेगवेगळ्या वाक्यांत सांगण्यात उत्तरार्धाचा मोठा भाग खर्च झाला आहे. 

हे सगळं असलं तरी हा सिनेमा बघावा अशी शिफारस करेन. समाजातील चांगल्या प्रेरणादायी कृती करणाऱ्या व्यक्तींचे चित्रण करताना फक्त चुन्याचा वापर करण्याचा प्रघात असणाऱ्या भारतीय सिनेमांपेक्षा हा नक्कीच वेगळा सिनेमा आहे हे एक. त्याहीपेक्षा अश्या व्यक्तींवर सिनेमा काढण्यासारखी अहिंसक आणि कायदेशीर कृती करणाऱ्यांना प्रोत्साहन आणि तो  (किंवा कोणताही) सिनेमा काढणं किंवा बघणं याला विरोध करणाऱ्यांना चपराक देणंही तितकंच आवश्यक आहे, म्हणूनही हा सिनेमा बघून येणं आणि मग त्याची वस्तुनिष्ठ चिकित्सा करणं हे दोन्ही अधिकार अबाधित राखणं आवश्यक आहे.

"आता काय मग कसाबवर काढणार का सिनेमे?" असले प्रश्न विचारणाऱ्यांना "होय, कोणत्याही माणसाची विचारसरणी, तो माणूस, समजून घेऊन त्यावर सिनेमा बनवण्यात काहीच गैर नाही. हिटलर पासून कसाबपर्यंत अशा अनेक क्रूरकर्मा लोकांची विचारसरणी कशी निर्माण होते हे समजणंही आवश्यक आहे. ती होऊ नये म्हणून एक समाज म्हणून, कुटुंब म्हणून किंवा व्यक्ती म्हणून आपण काय केलं पाहिजे हे समजून घेणे आपल्याला गरजेचं आहे. आणि ते अनेकापर्यंत पोचायला सिनेमा हेसुद्धा एक प्रभावी माध्यम आहे. असा सिनेमा फसला/नावडला तर तो बघून मग त्याला तोंडभरून नावं ठेवण्याच्या अधिकाराइतकाच तसा सिनेमा काढण्याच्या अधिकाराचं समर्थन करणंही आवश्यक आहे." अश्या उत्तरासह संजू बघा आणि मग काय ती नावं ठेवा किंवा कौतुक करा अशी शिफारस!

संजू (२०१८) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

संजू (२०१८)
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: राजकुमार हिरानी
  • कलाकार: परेश रावल, मनीषा कोईराला, रणबीर कपूर, विकी कौशल
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१८
  • निर्माता देश: भारत