आनंदी गोपाळ (२०१९): सिनेमाच्या पुढे नेणारा सिनेमा

प्रत्येक सिनेमा बघितला की त्याबद्दल लिहायला माझ्यातला समीक्षकी मी सरसावतो. पण कधीकधी सिनेमा जरी एक सिनेमा असला तरी त्यातला विषय, आशय हा त्याचं 'सिनेमा'पण  बाजूला राखत वरचढ ठरतो आणि आपल्याला केवळ माणूस म्हणून नव्हे तर समाजातील आजचा एक घटक म्हणून महत्त्वाचं काही देऊन जातो. 'आनंदी गोपाळ' हा त्याच जातकुळीचा सिनेमा. म्हणूनच यावेळी या सिनेमाच्या तांत्रिक अंगाबद्दल काहीही न बोलता तो सिनेमा पाहून मला जे काही वाटलं ते तसंच, पहिल्या धारेचं आणि तितकंच अस्ताव्यस्त तुमच्या समोर मांडणार आहे. त्यावरून हा सिनेमा बघायचा का नाही हे तुम्हीच ठरवा.

(मी नेहमी म्हणतो तसं) समाज हा एक अस्ताव्यस्त पसरलेला, अनेक अवयव असणारा, सगळ्याला व्यापूनही थांग न लागणारा आणि सतत आकार, रंगरूप बदलणारा प्राणी आहे. त्याचं कोणतं अंग आपल्यासमोर येईल तसा तो आपल्याला भासतो आणि आपण तेवढ्याच भागाशी झुंजत राहतो किंवा तेवढाच भाग कवटाळतो. प्रत्यक्षात या प्राण्याबद्दल वर्तमानातल्या रूपाचा थांग लागला नाही तरी त्याचे भूतकाळातले स्वरूप आणि त्यात होत गेलेले बदल यांचा विचार करून माणूस वर्तमान समजून घेत आला आहे.  आनंदी गोपाळ आपल्याला जाणीव करून देतो ते या नेमक्या प्रवासाची आणि या काळाच्या पट्टीवर आपल्या स्थानाची.

-0-

माझी देवाबद्दलची एक धारणा आहे, की माणसाला जे जे जेव्हा ठाऊक नसते ती गोष्ट म्हणजे देव. जसजसे माणसाला ज्ञान प्राप्त होते त्याच्यासाठी त्या गोष्टीतून दैवी प्रभाव/देवत्त्व नष्ट होते आणि ती गोष्टी मानवी होत जाते. पण ज्ञान प्राप्तीचा हा यज्ञ अघोरी खर्चिक आहे, कारण याने आहुती म्हणून नेहमीच माणसाचे रक्त स्वीकारले आहे. केवळ भारतात नाही तर जगभरात या यज्ञाने अनेक बळी घेतले. पण हे माहीत असूनही यात आहुती घालायलाच जणू जन्म व्हावा अशा अनेक व्यक्ती आपल्यातूनच तयार झाल्या आणि आपापल्या परीने त्यात भर घालत गेल्या - घालत आहेत. पण यांच्या आहुतीनंतरही, अजूनही आपल्याला काही आदर्श समाज मिळालेला नाही.  आता एकीकडे काहिंना ज्ञान मिळावायसाठी संघर्ष करावा लागत असताना, त्याचवेळी  उलट नवीन तंत्रज्ञान आणि माहितीच्या त्सुनामी उपलब्धतेमुळे आता आपण एका नव्याच 'पोस्ट ट्रूथ' आव्हानाचा सामना करतोय. पण म्हणून याआधीच्या आहुतींचं महत्त्व अजिबात कमी होत नाही.

-0-

'आनंदी गोपाळ' सिनेमा पाहिल्यावर मला 'क्वीन' सिनेमाचीही आठवण झाली. त्यात आधुनिक स्त्रीपुढे असणारे प्रश्न आनंदीपुढे असणाऱ्या प्रश्नांपेक्षा पूर्ण वेगळे आणि तीव्रतेने कमी वाटतीलही पण ते वेगळे मात्र तितकेच तीव्र आणि तिला कोणत्याही 'गोपाळा'विना सोडवायचे आहेत हेही लक्षात घेणं अगत्याचं आहे. क्वीनमध्ये सिनेमा संपायच्या आधी एक संवाद आहे, जेव्हा नायिका आपली रिंग परत करायला येते तेव्हा तिचा नी तिच्या होणाऱ्या सासूचा तो काहीसा असाय की, "जब हम घरके मर्द ऑफिस जाएंगे तब हम मॉ बेटी बडे मजे करेंगे बाय गॉड. अखबार पढना, पार्लर जाना बडा मजा आयेगा. तुम और एक किटी जॉईन कर लेना बडा मजा आता है". यात ही संभाव्य सासू नि तिचा हा संवाद सिनेमात जरी 'जुन्या काळातले', 'स्त्रियांवरील अन्यायाचं प्रतीक', 'बुरसटलेले' वगैरे वाटत असला तरी, काळाच्या पट्टीवर बायकांनी साधं "अखबार किंवा मॅगझिन पढेंगे" किंवा स्वत:च्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी "पार्लर जायेंगे" असे बेत आखणं हे सुद्धा किती पुढारलेलं आहे याची जाणीव होण्यासाठी या काळाच्या पट्टीचं भान असणं आवश्यक आणि हा सिनेमा ते भान आणून देतो.

प्राचीन काळात जन्मलेलं, आणि हजारो वर्षांपासून समाज या प्राण्याला वाळवीसारखं पोखरणारं "धर्म" नावाचं बांडगूळ आताही इतकं सर्वव्यापी आणि सध्याच्या प्रत्येक स्त्रीपुरुषाला इतकं वेठीला धरून असण्याच्या काळात, त्या काळातील त्या बांडगुळाच्या भयानकतेची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आनंदी गोपाळमध्ये तर विचारांना आणि मेंदूला घट्ट धरणाऱ्या धर्माचा प्रभाव, त्यावर आनंदी-गोपाळ कणाकणाने मिळवत असणारा विजय आणि शेवटी आनंदीवर धर्माने केलेली मात असहायपणे बघणारा गोपाळ सगळंच जीव कुरतडणारं आहे. हे धर्म नावाचं बांडगूळ तर अजूनही समाजाचा आधार वाटावं इतकं भक्कम आणि सर्वव्यापी आहे. धर्म कोणताही असो केवळ आणि केवळ सबळांना फायदा पोचवत दुर्बलांचं तो शोषण करत आला आहे. अशावेळी धर्माचं रक्षण करणाऱ्या समाजाच्याच तीन तोंडी कुत्र्याशी (आठवा हॅरी पॉटर) झुंजणाऱ्या गोपाळरावांनाही जेव्हा बायकोचा वाऱ्यावर उडणारा पदरही डाचतो तेव्हा त्या कुत्र्याची लाळ त्यांच्या अंगावरही पडल्याचं प्रेक्षकाला खुणावत राहतं आणि त्याच्याही नकळत त्याचं लक्ष् स्वतःच्या लाळेने भरलेल्या खांद्याकडे जातं

आताच्या काळातली स्त्री असो वा पुरुष स्वतःच्या वागण्याला, भूमिकांना पडताळण्यासाठी कसोटीचा दगड होण्याचं काम या सिनेमाने चोख केलं आहे. आपल्यापुढे "परंपरा मोडायची" या शक्यतेनेच डोळे विस्फारणाऱ्या लोकांची अजिबात कमी नाही, त्यावर प्रत्येकाने यथाशक्ती यथामती आनंदी गोपाळ होत या निरंतर यज्ञात आहुती घालत रहाणं, ही वाट कितीही उफराटी असली तरी अंतिमतः प्रगतीची आहे याची शाश्वती देणारा हा सिनेमा आहे इतकं मात्र नक्की!

आनंदी गोपाळ (२०१९) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

आनंदी गोपाळ (२०१९)
  • Official Sites:

    imdb
  • दिग्दर्शक: समीर विद्वांस
  • कलाकार: भाग्यश्री मिलिंद, ललित प्रभाकर
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१९
  • निर्माता देश: -