बेबी - नीरज पांडेची उतरती भाजणी

कोणत्याही अपेक्षेविना, कोर्‍या चौकटीत आपला सिनेमा प्रेक्षकांपुढे ठेवणं फक्त एकदाच शक्य असतं – पहिल्या सिनेमाच्या वेळी. दुर्दैवानं नीरज पांडेला ’ए वेनस्डे’च्या वेळी तो फायदा मिळून संपला. ’स्पेशल २६ही ’ए वेनस्डे’च्याच जातकुळीचा सिनेमा होता, त्यामुळे त्याच्या शैलीवर शिक्कामोर्तबच झालं. त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा उंचावल्या. नीरज पांडेच्या नव्या आणि गर्दी खेचणार्‍या ’बेबी’च्या बाबतीत त्याचा तोटा असा की, आपल्याला या गोष्टीत काय बघायला मिळणार आहे आणि काय मिळावं याचं एक निश्चित चित्र ’बेबी’ बघायला जाताना आपल्या मनाशी तयार असतं.

परिणामी ’बेबी’ रटाळ, लांबलेला, प्रेडिक्टेबल सिनेमा ठरतो.

अजय (अक्षय कुमार) हा भारतीय गुप्तसंरक्षकदलातला एक महत्त्वाचा एजंट. शुक्ला (अनुपम खेर) हा त्याचा सहकारी. फिरोज (डॅनी डॅन्झप्पा) त्यांच्या युनिटचा बॉस. इस्तंबूलमधल्या एका फसलेल्या कारवाईदरम्यान अजयला भारतात होऊ घातलेल्या स्फोटमालिकेची कुणकुण लागते. बिलाल (केके), वसिम (सुशांत सिंग) हे अतिरेकी, मौलाना (नाझ) हा पाकिस्तानी मौलवी यांनी आखलेली ही स्फोटमालिका थांबवण्याकरता रचलेले बेत आणि त्यांच्या यशापयशाचा अजयच्या युनिटवर झालेला परिणाम ही सिनेमाची गोष्ट.

दहशतवादाच्या मुसलमान चेहर्‍याबद्दल ’पॉलिटिकल करेक्टनेस’ बाळगण्याचा बोटचेपेपणा न करता रोखठोक प्रतिक्रिया नोंदवणं (’ए वेनस्डे’मध्ये आरिफचे जेलमधल्या कैद्याशी असलेले व्यक्तिगत संबंध); वेगवान, चकचकीत आणि काहीशी हिरॉईक हाताळणी करणं (’स्पेशल २६’मधले घरांवर धाड टाकण्याचे प्रसंग); आत्यंतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर व्यक्तिरेखांची मानवी बाजू दाखवून खसखस पिकवणं (’वेनस्डे’मधला हवालदाराला लाच परत करायला लावण्याचा प्रसंग. ’बेबी’मध्ये मुरली शर्मानं साकारलेली पंतप्रधानांच्या सचिवाची छोटीशीच पण लक्ष्यवेधी भूमिका याच क्याटेगरीतली.)... ही नीरज पांडेची वैशिष्ट्यं इथेही भेटतात.

पण प्रेक्षकाला दिपवून टाकायला ती पुरेशी आहेत का?

एकतर ’ए वेनस्डे’मधलं थरारक वळण विश्वासार्ह करून दाखवण्यासाठी त्यात नसीरुद्दीन शाहसारखा अभिनयाची पुण्याई असलेला कसलेला नट होता. पटकथेतल्या सनसनाटी गोष्टींची वजावट करून गोष्ट प्रेक्षकाच्या गळी उतरवण्याचं महाकठीण काम त्यानं लीलया केलं होतं. त्याच्या सोबत अनुपम खेर होता. कमिशनरच्या भूमिकेतलं त्याचं नुसतं बेअरिंग किती बोलकं होतं! इथे कोण आहे? अक्षय कुमार आणि डॅनी डॅन्झप्पा. एका विशिष्ट चौकटीत (खाकी, ऑंखे किंवा अग्निपथ, घातक) ते त्यांची कामं चोख बजावू शकतात, इतकंच काय ते. त्यांची तुलना नसीरशी कशी काय होईल? त्या बाबतीत ’बेबी’ पार झोपला आहे. डॅनी आणि अक्षय या दोघांचीही एकसुरी संवादफेक कमालीची कंटाळवाणी आणि निष्प्रभ वाटते. उलट सुशांत आणि केकेसारख्या नटांना अगदी कमी लांबीच्या भूमिका देऊन फुकट घालवलं आहे. तेच अनुपम खेरचंही. मुख्य भूमिकांमध्ये अनुपम खेर आणि केके असते, तर काय बहार आली असती, असं वाटल्यावाचून राहत नाही.

दुसरा आक्षेप म्हणजे विनाकारण आलेले विहंगम देखावे. इस्तंबूल म्हणू नका, सौदी म्हणू नका, नेपाळ म्हणू नका. गेला पोलीस दुसर्‍या शहरात, उड हेलिकॉप्टरातून, टाक एक विहंगम दृश्य. अरे, काय आहे काय? हे अब्बास मस्तानच्या सिनेमात दिसलं, तर ठीक. त्यांच्या सिनेमाची जातकुळीच तशी असते. पण मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांचं जिवंत चित्रण करणार्‍या नीरज पांडेच्या सिनेमाकडून अधिक अपेक्षा असतात. त्यात हे असे अकारण देखावे बघून निराशा होतेच.

तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रेडिक्टेबिलिटी.

प्रादेशिक भाषेचा लहेजा दाखवणारा एखादा मध्यमवर्गीय पोलीस दिसला, अत्यंत धोकादायक मिशनच्या वाटेवर असतानाच आज त्याच्या लग्नाचा वाढदिवस असल्याचं आपल्याला कळलं, की त्या पोलिसाचा शेवट कसा होणार आहे  याची आपल्याला कल्पना येते की नाही?

पोलीस ऑफिसर प्रचंड तणावाच्या क्षणी कारवाईत मग्न असताना त्याच्या बायकोचा फोन आला आणि तिनं कमालीच्या ट्रिविअल गोष्टींबद्दल त्याला झापायला सुरुवात केली की आपल्याला पुढच्या घडामोडींचा अंदाज येतो की नाही?

एका मुसलमान नेत्यानं आपल्या धर्मप्रेमाबद्दल घमेंड मारायला सुरुवात केली की पुढ्यातला भारतीय पोलीस आपल्या सर्वधर्मसमभावाला आणि देशप्रेमाला स्मरून त्याला आपल्या मुस्लिमप्रेमी शौर्याची धीरोदात्त ष्टोरी ऐकवणार, हे आपल्या लक्षात येतं की नाही?

उत्तरं तुमची तुम्हांलाच ठाऊक.

ती नकारार्थी असतील, तर तुम्हांला ’बेबी’ इतका रटाळ नाहीही वाटायचा. पण ती होकारार्थी असतील, तर मात्र... ऑल द बेस्ट!

-    कलमवाली बाई (kalamwali.baai@gmail.com)

बेबी - चित्रपटाची /नाटकाची माहिती

बेबी
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: नीरज पांडे
  • कलाकार: अक्षय कुमार, डॅनी डॅन्झप्पा, सुशांत सिंग, के के मेनन, अनुपम खेर, मुरली शर्मा, रशीद नाझ
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: http://boxofficeincome2015.com/baby-5th-day-box-office-collection-baby-tuesday-business-report/
  • प्रदर्शन वर्ष: २ तास ३९ मिनिटे / १५९ मिनिटे
  • निर्माता देश: भारत