हंडाभर चांदण्या: हिरॉईक विजयापलीकडील वास्तव!

कुणीतरी एक वास्तव किंवा अवास्तव गोष्ट मिळवून आणायचा घाट घालावा आणि ती गोष्ट मिळाली; तर ती मिळवणार्‍याच्या हिरॉइझमची कथा ठरते आणि ‘कोणे एके काळी एक शूर राजपुत्र होऊन गेला…’ अशा साच्यात अडकते.
'हंडाभर चांदण्या'मध्ये असा घाट तर घातला जातोच. पण ती गोष्ट मिळते; तेव्हा तिचं महत्त्व, तिला लागलेल्या अवास्तव उपमा, अलंकार इत्यादी सोडून खरी आणि फक्त गरज पूर्ण करण्यासाठीच मिळते आणि तिथेच नाटक संपतं. ह्या नाटकात हव्या असलेल्या गोष्टीला वैयक्तिक दु:खाचे संदर्भ किंवा रोमँटीक महत्त्व अजिबात नाही.

हंडाभर चांदण्या ही कथा आहे मावळवाडी नावाच्या एका गावाची. तसं बघायला गेलं तर आपल्या सर्वांचीच. पाणी ह्या मूलभूत गरजेभोवती हा दीर्घांक फिरतो. ही गरज सामूहिक आहे. तिच्यासाठी लढणारा मात्र एकटा संभा आहे. तो गावाचा पुढारी नाही. त्याला तशी महत्त्वाकांक्षाही नाही. पण तो लढतोय. संभा पाणी घेऊन येणारच असा विश्वास गावकऱ्यांनाही आहे. संभाची आणि त्यायोगे पाण्याची वाट बघण्यापलिकडे कुणालाच काहीच काम उरलेलं नाही. सगळ्या गोष्टी पाणी ह्या एकमेव गरजेपाशी येऊन थांबल्या आहेत.

ह्या थांबलेल्या आयुष्यातून नाटकभर दिसत रहातो तो उपहास. काहीच करायला उरलं नाही म्हणून गडी गाणी गात बसतात. त्यातलाच एक मास्तर, प्रत्येक गोष्टीत गीतेचा हवाला देत राहतो. 'निसर्गचित्र काढा' असं मुलांना म्हटलं, की मुलं न आलेल्या टँकरचं चित्र रंगवतात.

उपहास आणि दुःखाचं नातं असावं काहीतरी. नाटकापुरतं पहायला गेलं तर असं लक्षात येतं की हे दुःख म्हणजे एका मुलभूत गोष्टीची उणीव आहे. पाण्याची उणीव. त्यामुळे खूप काही करायचं असूनही काहीही करता येत नाही. अशावेळी आयुष्याच्या नसलेल्या अर्थालाही एक कडवटपणा येत असावा. ह्या कडवटपणापलिकडेही काहीतरी असू शकतं आणि जे असतं ते ही आयुष्यच असतं ह्याची जाणीव व्हायची असेल तर? इथे संभाचा आक्रोश खरा होतो. त्याच्या पाण्यामागच्या धावपळीमागची अपरिहार्यता आणि फोलपण दोन्ही एकाच वेळेस कळून येतं.

संभाप्रमाणेच प्रत्येक गावकर्‍याला त्यांचं एक व्यक्तिमत्त्व आहे आणि दुःखही. आणि त्या दुःखाबाबतीत काहीही न करता येण्याच्या भावनेतून आलेली हताशासुद्धा आहे. एक मास्तर आहे. गावातलं शिकलं-सवरलेलं जुनं जाणतं माणूस म्हणून मास्तर. ह्या मास्तराला भगवत् गीतेचा मोठा आधार आहे. टॅंकर येईलच हेही मास्तर स्वतःला गीतेच्या नावानेच समजावत रहातो. कुणी गातं, कुणी एकतारी-दिमडी वाजवतं. तर कुणी उद्यातरी पाणी मिळेल या आशेवर तारे मोजत राहतं आणि वृश्चिक रास अस्ताला जाऊ लागली की शोधायला बाहेर पडतं. हे इतकंच आयुष्य. नाटकात ठायी ठायी दिसत राहिलेलं रिकामपण, पार्श्वसंगीत आणि नेपथ्यातून वारंवार अधोरेखित होत राहतं. नेपथ्यकारांनी रंगमंच रिकामाच ठेवून दिलेला आहे. मध्यभागीच असलेल्या एका वठलेल्या झाडासकट. पाण्याविना रिकामं झाड आणि पाण्याची वाट बघत माळावर रिकामे बसलेले गावकरी. संभा पूर्वेकडे अथक लक्ष ठेवून आहे. तो मागे तिसर्‍या विंगेत एका उंचवट्यावर बसून आहे. तिथून चढ्या आवाजातच तो इतरांशी बोलत असतो. संभाचं नायकपण त्याच्या एकटेपणासह इथे अधोरेखित होतं. 

पार्श्वसंगीतात मोठा वाटा निर्हेतुक वाहणार्‍या वार्‍याचा, पक्ष्यांच्या आवाजाचा, रातकिड्यांचा आणि शांततेचा आहे. त्यामुळेच संभाचा आक्रोश सरळसोटपणे येऊन भिडतो. प्रकाशयोजना मात्र नाटकाचं नाटकपण आणि वास्तवाच्या आभासाचा समतोल साधणारी आहे. प्रकाशयोजना म्हटली की कोन, रंग आणि तीव्रतेनुसार दृश्याची वेळ आणि मूड पकडायचं अभिप्रेत असलेलं काम पुरं होतंच. त्याहीपुढे जाऊन उगवता लालेलाल सूर्य, निळसर चंद्रप्रकाश आणि स्पॉट्सच्या ठरलेल्या पद्धतींपलीकडे नाटक व्हिज्युअली प्रेक्षकापर्यंत पोचवण्यात प्रकाशयोजना हातभार लावते. सर्वच अभिनेते शहरी असले तरी ग्रामीण माणूसपण आणि त्याच्या दुःखाची नस सगळ्यांनीच व्यवस्थित पकडली आहे. तहसीलदारांपुढे गुंडगिरी करणारा आणि शेवटी त्यांच्याचपुढे हात जोडणार्‍या संभाचं बदलत जाणं अतिशय समर्थपणे पोचवलं जातं. गावाला धीर देणं आणि स्वतःचाही धीर राखून धरणं अशा दोन्ही डगरींवर पाय ठेवून उभा असलेला मास्तर कोसळताना पहाताना मास्तरचं दुःख नाटकातून वास्तवाच्या सीमेवर आणून ठेवतो. चंद्राचं बाईपण नाटकाला वेगळ्याच कक्षेत घेऊन जातं. चंद्राला अडकून रहायचं नाहीये. तीला काय हवंय आणि काय नको ते अगदी स्वच्छपणे माहितीये. चंद्राविना चांदण्यांचं नाटक पूर्ण होऊ शकत नाही असं म्हणता येणं हा ही एक योगायोगच.

नाटकात शेवटी पाणी मिळतंही. तरीही ही कथा संभाच्या हिरॉईक विजयाची नाही. कारण जेव्हा पाणी येतं, तेव्हा वैयक्तिक दुःखातून सावरून सगळ्यांच्या आनंदात सामील व्हावं की नाही ते न कळणारा संभा आपल्याला दिसत राहतो फक्त. जेव्हा पाणी मिळतं, तेव्हा त्या 'हंडाभर चांदण्यांचं' अप्रूप संभाला उरलेलं नसतंच.

हंडाभर चांदण्या (२०१६) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

हंडाभर चांदण्या (२०१६)
  • Official Sites:

  • दिग्दर्शक: सचिन शिंदे
  • कलाकार: गीतांजली घोरपडे, नुपूर सावजी, प्रणव प्रभाकर, प्राजक्त देशमुख
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१६
  • निर्माता देश: भारत