पिफ २०१५ - पेलो मालो (२०१०) - कुरळ्या केसांची वेल्हाळ कथा
पुणे फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनाच्या "डे झिरो" नंतर पहिल्याच दिवशी सिटीप्राईड कोथरूडला पोचलो आणि प्रत्येक स्क्रीनसमोर लांबच लांब रांगा बघून फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाल्याची खात्री पटू लागली. सुरूवातीलाच "पेलो मालो" हा व्हेनेझुएलाचा "लै भारी" चित्रपटाचा लाभ झाला. प्रत्येक समाजात स्त्रीत्त्व आणि पौरुषत्त्वाशी निगडित काही प्रतीके असतात, सवयी, लकबी जोडलेल्या असतात. मात्र त्या चाकोरीबाहेर कोणी वागू लागलं की लगेच लोक त्या व्यक्तीकडे संशयाने पाहू लागतात. माझी एक मैत्रीण मोठाल्या बाइक्सही सराइतपणे चालवते. आता हे तसे दुर्मिळ नसले, तरी जेव्हा तिने हे सुरू केले तेव्हा तिला "टॉम बॉय" म्हणूनच हिणवले गेले. त्याउलट माझा एक मित्र उत्तम नाचतो. त्याने जेव्हा त्याचा क्लास लावला आणि चेहर्यावर मोहक भाव आणू लागला तेव्हा काही मित्र त्याच्यापासून "तो जरा 'तसला' वाटतो" म्हणून दूर राहू लागले. पण या असल्या गोष्टी फाट्यावर मारून हवं तेच करू शकेल असं त्यांचं वय होतं. मात्र लहानपणी अशा काही सवयी किंवा आवडी असतील तर काय?
'पेलो मालो' अशीच एक कथा याहून अधिक कॉम्प्लेक्स जगात घडताना दाखवतो. ही एका नऊ वर्षाच्या मुलाची कथा आहे. स्वतःची ओळख शोधण्यासाठी झगडणार्या या मुलाचे वय, सवयी त्याच्या वयाला साजेशाच आहेत. त्याच्या आईलाही (पार्टनरची साथ गमावल्याने) मुलांना एकटं सांभाळण्याव्यतिरिक्त, समाजातून व नातेवाइकांकडून विविध प्रकारचा दबाव झेलावा लागतोय. अशात मुलाला आपले केस सरळ करण्याची तीव्र इच्छा, तिला आपलं मूल गे आहे का अशी शंका उत्पन्न करणारे आहे. मुलाची ही इच्छा समजून घेणं तिला शक्य नाहीये व ती उलट त्याची धडपड थंड करू पाहतेय. लेखक-दिग्दर्शक मरिआना रॉन्ड्न या आपापल्याजागी योग्य वाटणार्या तरीही परस्परविरोधी व्यक्तींमध्ये आई-मुलाचे नाते असल्याने होणारी कुतरओढ एकीकडे ताकदीने दाखवत असतानाच, त्यांच्या क्यामेराने एका महानगरातील जीवनमानाला पार्श्वभूमीवर ठेवून येथील प्रश्नांवर परखड भाष्य करण्याची करामत करून दाखवली आहे. या द्वंद्वातून उभा राहणारा नाट्यपूर्ण चित्रपट केवळ लक्षवेधी म्हणून थांबता येत नाही तर तर्क आणि भावना यांच्या "फायर अँड आईस" झटापटीला ताकदीने हाताळणारा चित्रपट म्हणून मनात कोरला जातो.
सूचना: यापुढे कथासूत्रातील काही तपशील प्रकट होऊ शकतील
या कथेतील दोन प्रमुख व्यक्तीपैकी "ज्युनिअर" हा ९ वर्षांचा मुलगा आहे - अतिशय गोड, आणि कुरळ्या केसांचा! व्हेनेझुएलातील निम्न-मध्यमवर्गियांच्या, ब्लॉक्स खेटून असणार्या टोलेजंग बिल्डिंग्जच्या समूहातील, एका बिल्डिंगमधील लहानशा घरात तो, त्याची मध्यमवयीन आई मार्टा आणि लहान बाळ असे तिघे राहत असतात. नवर्याच्या मृत्यूनंतर मार्टा मुलांना एकटीच सांभाळत असते. याबद्दल अधिक सांगायच्या आधी "पेलो मालो" म्हणजे "बॅड हेअर्स" संबंधित किंचित माहिती देणं गरजेचं आहे. अमेरिकेत (एकुणच अमेरिका खंडात) कृष्णवर्णीयांच्या दाट कुरळ्या केसांना 'बॅड हेअर्स' म्हणून हिणवायची पद्धत आहे. नवरा कृष्णवर्णीय होता तर मार्टा गोरी - स्पॅनिश. त्यामुळे आपोआप मिळालेले कुरळे केस व गव्हाळ वर्ण लाभलेला हा ज्युनियर वेगळ्याच लेव्हलवर आपली ओळख शोधायला झगडत असतो.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच ज्युनियर आणि त्याची मैत्रीण समोरच्या बिल्डिंगमधील विविध चौकटीत बंदिस्त आयुष्यांबद्दल अंदाज करतानाचा सीन भन्नाट आहे. मुळात समोरच एकसारखी, टोलेजंग ठोकळेवजा खिडक्यांची पार्श्वभूमीच शहरी आयुष्यातील एकसुरीपणा दाखवून जातेच. मात्र एकीकडे त्यातील प्रत्येक ठोकळ्यातील रंग वेगळा आहे, रंगछटा वेगळी आहे मात्र त्याच वेळी त्यातील व्यक्तींचे आयुष्य इतकेही वेगळे नाही की या दोघा लहानग्यांना त्याची कल्पनाही करणे शक्य नाही. इतरांप्रमाणे या ज्युनियरचेही एक स्वप्न आहे - त्याला शाळेत द्यायला एक फोटो हवा आहे आणि त्यात त्याला एका गोर्या गिटार-सिंगरप्रमाणे आपले केस सरळ करायचे आहेत. त्याच्या सरळ केसांच्या आवडीला एकीकडे पर्सनल आवड म्हणूनही बघता येते तर दुसरीकडे त्यामागे सामाजिक कारणे नाहीत असे म्हणता येत नाही. मात्र लेखक ते अध्याहृत सोडतो. ज्युनियरला सरळ केसांचे ऑब्सेशन आहे हे स्पष्ट करतो. मात्र नेमकी त्याची हिच खोड/इच्छा आईसाठी "गे" होण्याच्या 'भितीचे' कारण असते. ज्युनियरला आईचे प्रेमही हवे आहे त्याच वेळी केसही सरळ करून हवेत. तर आईला मुलाविषयी काळजी आहे मात्र केस सरळ करणारा, वेगळ्या पद्धतीने नाचणारा मुलगा गे होतोय या भ्यगंडाने ती पछाडलेली आहे.
आपल्याकडील, आई-मुलाचं नातं हे नेहमीच अतिशय पाकातल्या पुरीसारखे गोग्गोड दाखवायची खरूज, अजून दक्षिण अमेरिकेत पोचलेली नाही हे बघून फारच बरे वाटले. दोन व्यक्ती -मग ती आई व तिचे लहान मूल का असेना- त्यांच्यात वेगवेगळ्या कारणांनी झगडा/द्वंद्व होणे नेहमीच एक शक्यता असतेच. मात्र या द्वंद्वांसोबत आईवर मुलाची जबाबदारीही असते. त्यामुळे या दोघांमधील द्वंद्वाला एक वेगळी नाजूक किनार असते. त्यात मासला असा नाजूक असेल तर "सांगताही येत नाही, नी सहनही होत नाही" ही मार्टाची व ज्युनियरचीही अवस्था त्या दोन्ही कलाकारांनी आणि दिग्दर्शकांनेही वेगवेगळ्या प्रसंगात उत्तम दाखवली आहे.
तर, आधी म्हटल्याप्रमाणे, मार्टाला ज्युनियरचे केस सरळ करण्याचे वेड हे तो गे "बनत" चाललाय की काय अशी शंका उत्पन्न करणारे असते. आणि त्यातूनच सुरू होते एक अनोखे द्वंद्व! आईचा "होमोफोबिया" मग मुलातील प्रत्येक स्त्रैण समजली जाणारी कृती पाहून धास्तावत असतो. हळूहळू मुलाला असणारी गाण्याची, नाचाची आवडही तिला त्रासदायक ठरू लागते. खरंतर सिक्युरिटी गार्डची स्त्रियांसाठी चाकोरीबाह्य समजली जाणारी नोकरी करणार्या आईला, दुसरीकडे मुलातील काही बदल अतिशयच अस्वस्थ करत असतात हा विरोधाभासही इंटरेस्टिंग आहे. या दरम्यान, ज्युनियरची आजी (वडिलांची आई) 'ज्युनियर'ला केस सरळ करून हवेत, नाचायचंय पण ते तुला आवडत नाही, तेव्हा त्याला मला देऊन टाक, तो माझी काळजी घेईल, त्या बदल्यात मी तुला बर्यापैकी पैसे देईन असा प्रस्ताव मार्टासमोर ठेवते. त्यात मार्टाच्याही स्वतःच्या लैंगिक गरजा आपली भूमिका निभावतच असतातच. हे कमी की काय म्हणून गरिबी, महानगरातील पैशासोबत लोकांना नसणारा वेळ, बंद दारांमुळे एकट्या कमावत्या बाईला येणारे प्रश्न अशा सगळ्या पातळ्यांच्या मंथनातून काय बाहेर पडते? ज्युनियरला केस सरळ करता येतात का? पैसे कमावण्यासाठी ओढाताण व दुसरीकडे मुलगा गे होतोय अशी भिती, आईला कोणत्या टोकाला जायला उद्युक्त करते? वगैरे प्रश्नांची उकल करून चित्रपट लौकिकार्थाने संपतो.
मात्र चित्रपटाची ताकद त्याहूनही अधिक आहे. लहानसहान प्रसंगांतून या चित्रपटाने निर्माण केलेले प्रश्न, माझ्या डोक्यात चित्रपट पाहून आल्यानंतरही घोंगावत राहिलेत. आपली लैंगिकता किंवा आवडच नव्हे तर एकूणच ओळख -आयडेंटिटी - धुंडाळण्याच्या वयातील एका लहान मुलाच्या धडपडीत मी सुद्धा नकळत सामील झालो. त्याचबरोबर महानगरांतील गर्दी व त्यातही असलेलं एकटेपणे, यांत्रिक वागणे, भोवतीचा समाज उपभोगत असलेले "भोगवादी" वास्तव, एकूणच पैसा, नैतिकता आणि वैयक्तिक जाणीवा यांची लढाई वेगळ्या पातळीवर अनुभवू लागलो.
भारतातही आता एकूणच लैंगिकतेबद्दल जागृती होते आहे तसतसे असे प्रश्नही तीव्र होत जाणार आहेत. बर्यापैकी गैरसमज, काहीसे संस्कार, काहीशी अपरिहार्यता, वेगवान जीवनपद्धती, विभक्त होत चाललेली कुटुंबव्यवस्था आणि यातून निर्माण होत असलेली एक सांगता न येणारी "इतरांपासून वेगळे पडण्याची' भिती हा एखाद्या देशातील वा समाजाचा प्रश्न न राहता एकूणच स्थलनिरपेक्ष प्रश्न बनतो. आणि असा चित्रपट पाहिला की तो अधिकच प्रकर्षाने आपल्याही आयुष्याला स्पर्श करतोय असे जाणवू लागते. तेव्हा हा 'पेलो मालो', एक आरसा माझ्यासमोर - खरंतर शहरी समाजासमोर - धरण्यात पूर्ण यशस्वी झाला हे नक्की!
पेलो मालो (२०१३) - चित्रपटाची /नाटकाची माहिती
