‘सॅक्रेड गेम्स' सीझन-१ (२०१८): हळूहळू भिनत जाणारं ड्रग
पाहुणा लेखक: संदेश कुडतरकर
विक्रम चंद्रा लिखित 'सॅक्रेड गेम्स' या कादंबरीवर आधारित 'सॅक्रेड गेम्स' ही वेब मालिका म्हणजे पॉपकॉर्न खाता खाता करमणुकीसाठी पाहण्याची सिरीयल नव्हे. या मालिकेशी ‘अनुराग कश्यप’ आणि ‘विक्रमादित्य मोटवाने’ ही नावं दिग्दर्शक म्हणून जोडली जातात, तेव्हाच हा एक खूप वेगळा प्रकार असणार आहे, हे लक्षात येतं. मूळ कादंबरी मी वाचलेली नाही, त्यामुळे कादंबरीचं हे वरुण ग्रोवर, स्मिता सिंग आणि वसंत नाथ यांनी केलेलं रूपांतर कितपत तंतोतंत उतरलंय, हा इथल्या चर्चेचा विषय नाही.
परंतु पहिल्या सीझनच्या आठ भागांना दोन्ही दिग्दर्शकांनी जी ट्रीटमेंट दिली आहे, ती पाहता हे माध्यमांतर उत्तमच झालं असावं, असं मला वाटलं. इन्स्पेक्टर ‘सरताज सिंग’ला (सैफ अली खान) एके दिवशी अचानक एक निनावी फोन येतो. पलीकडचा माणूस सांगतो, "पंचवीस दिवसांत मुंबई संपणार आहे. फक्त त्रिवेदी वाचेल त्यातून. वाचव तुझ्या मुंबई शहराला." या फोनचा माग काढत सरताज ‘गणेश गायतोंडे’ला (नवाजुद्दीन सिद्दिकी) अटक करणार, इतक्यात गणेश स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करतो. मग दोन समांतर कथानकांमधून सरताज सिंग आणि गँगस्टर गणेश गायतोंडेची कहाणी उलगडत जाते.
गणेश गायतोंडेच्या बालपणापासून कचऱ्याच्या ढिगाऱ्यात स्वतःचं साम्राज्य शोधत मुंबईचा गँगस्टर होण्याकडे त्याचा झालेला प्रवास कथन करतानाच पंचवीस दिवसांची उलटगणतीही सुरु होते आणि सरताजचे मुंबईला वाचवण्याचे प्रयत्नही. सरताजच्या कथेत पारूलकर, काटेकर, भोसले, अंजली ही मुख्य पात्रं. गणेश गायतोंडेच्या कथेत इसा, कुकू, कांताबाई, बंटी, सुभद्रा, त्रिवेदी अशा अनेक पात्रांचा भरणा. इसा आणि गणेशच्या शत्रुत्वात दोन्ही बाजूंची माणसं बुद्धिबळाच्या खेळात प्यादी मरावीत, त्याप्रमाणे मरतात. हिंदू-मुस्लिम दंग्याचं राजकारण म्हणून या खेळाला 'सॅक्रेड गेम्स' अर्थात पवित्र खेळी असं नाव. आपण एका धक्क्यातून सावरतो, तोच पुढच्या भागात अधिक थरारक काहीतरी पाहायला मिळतं. त्यामुळे आठही भागांत ही मालिका कुठेही पापणी लवण्याइतकीही उसंत घेऊ देत नाही. साधारण मध्यावर होणाऱ्या कुकूच्या दुर्दैवी आणि चटका लावणाऱ्या अंतातून आपण सावरत नाही, तोच पुढच्या भागात आणखी धक्का देणारे सुरुंग पेरून ठेवलेले आढळतात.
भागांना दिलेली पुराण आणि महाभारताशी संबंधित टायटल्स 'अश्वत्थामा', 'हलाहल', 'अटापी वटापी', 'ब्रह्महत्या', 'सरमा', 'प्रेतकल्प', 'रुद्र', 'ययाति' यामागे किती गहन विचार आहे, हे मालिका पाहताना लक्षात येतं. विशेषतः शेवटच्या भागात होणारा पंकज त्रिपाठीचा प्रवेश पुढच्या सीझनसाठी महत्त्वाचा असणार आहे, हे 'ययाति'च्या रुपकातून अधोरेखित होतं. टोकाची हिंसा, सेक्स, शिव्यांचा वापर, अस्वस्थ करणारी व्हिज्युअल्स या सगळ्यांवर जर सेन्सॉरशिपची कात्री चालली असती, तर कदाचित या मालिकेचा आत्माच हरवून गेला असता.
अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांचं दिग्दर्शन, वसंत नाथ यांचं लेखन, वजनदार संवाद याचबरोबर या मालिकेचे इतर अनेक पैलूही कौतुकास पात्र आहेत. विशेषतः आरती बजाज यांचं क्रिस्प संकलन. दोन्ही कथानकं पडद्यावर एकत्र साकारताना प्रेक्षकाला कुठेही विनाकारण रेंगाळायला वेळ मिळणार नाही आणि दोन दिग्दर्शकांच्या शैलीची सरमिसळ करताना कुठेही मेंटल जर्क जाणवणार नाही, याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली आहे. विक्रम गायकवाड यांनी मेकअप आणि हेअर स्टायलिंगद्वारे जुन्या सत्तरच्या दशकातील मुंबईच्या पात्रांना काळानुसार हुबेहूब रंगवलं आहे. अनेक दृश्यांत येणारा पिवळसर उदास प्रकाश त्या दृश्यांची भावस्थिती उत्तमरीत्या दाखवतो. आलोकनंदा दासगुप्ता यांचा ओरिजिनल स्कोअर आणि अनिस जॉन यांचं साऊंड डिझाईन दाद देण्याजोगं. सिल्वेस्टर फोन्सेका, स्वप्नील सोनावणे, असीम बजाज यांची सिनेमॅटोग्राफी अभ्यास करावी अशी. काही फ्रेम्स तर इतक्या देखण्या आहेत की पेंटिंग्जच जणू. उदाहरणादाखल एका दृश्यात अंजली आणि सरताज गप्पा मारत आहेत, त्या दृश्याचं फ्रेमिंग पाहावं.
मात्र या मालिकेच्या यशाचं गुपित आहे कलाकारांच्या सुयोग्य निवडीत. गणेश गायतोंडेच्या भूमिकेत नवाझुद्दीन सिद्दीकी आणि सरताज सिंगच्या भूमिकेत सैफ अली खान यांनी जीव ओतला आहे. काटेकरच्या भूमिकेतील जितेंद्र जोशीचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्याच्या कारकीर्दीतील 'दोन स्पेशल'नंतरची ही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पारूलकरची भूमिका नीरज काबी या अष्टपैलू अभिनेत्याने नेहमीप्रमाणे उत्तम वठवली आहे. राधिका आपटेचा अंजलीच्या भूमिकेतील अंडरप्लेही लक्षात राहतो. शालिनी वत्स (कांताबाई), राजश्री देशपांडे (सुभद्रा), गिरीश कुलकर्णी (बिपीन भोसले), जसप्रीत सिंग (दिलबाग सिंग) आणि पंकज त्रिपाठी (खन्ना गुरुजी) या सर्वांनीच आपापल्या भूमिकेला चार चाँद लावले आहेत. इतर सर्वांचीही कामे चोख झाली आहेत. त्यामुळे दुसरा सीझन अधिक उत्सुकता वाढवणारा आणि रंजक ठरणार, यात शंका नाही.
पाहुणा लेखक: संदेश कुडतरकर
फोटो जालावरून साभार
सॅक्रेड गेम्स: सीझन १ (२०१८) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

Official Sites:
- दिग्दर्शक: अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाने
- कलाकार: जितेंद्र जोशी, नवाजुद्दीन सिद्दिकी, राधिका आपटे, सैफ अली खान
- चित्रपटाचा वेळ: -
- भाषा: मराठी, हिंदी
- बॉक्स ऑफिसचे आकडे: -
- प्रदर्शन वर्ष: २०१८
- निर्माता देश: -