अग्ली - अनुराग कश्यप - २०१४

थोडक्यात:

भरदिवसा गाडीतून बेपत्ता झालेल्या १० वर्षीय कलीला पळवणारा गुन्हेगार आहे तरी कोण, हा भंजाळून टाकणारा एक प्रश्न. आणि एक सोडून दोन-दोन समर्थ आणि बर्‍यापैकी प्रेमळ बाप असणारं एक लहान मूल - सुखी जाऊ द्या - सुरक्षित तरी आहे इथल्या व्यवस्थेत? हा खोलवर जाणारा, दुसरा कळीचा प्रश्न. अनुराग कश्यपचा ’अग्ली’ नेहमीप्रमाणेच व्यवस्थेला आणि तिचा भाग असणार्‍या आपल्यालाही निरुत्तर करणारा खणखणीत सवाल करतो. कसलीही काळी-पांढरी-कप्पेबंद उत्तरं न पुरवता रंगीबेरंगी-बरड धाग्यांचा एक गुंतागुंतीचा पट संथपणे विणत जातो.

पूर्वसूचना: गोष्टीचे तपशील नको असतील, तर पुढे वाचू नका.

 

पुढे:

अशा प्रकारच्या रहस्यपटांमध्ये आपल्याला सवयीचा झालेला आणि विचार करायला वेळ न देता घटनाक्रमातून बथ्थडपणे खेचडत नेणारा वेग या चित्रपटाला नाही. चित्रपट जाणूनबुजून रेंगाळतो. पोलीस चौकशांमधून चालणारे रटाळ, निर्जीव पंचनामे दाखवतो. पोलीस या बहुचर्चित प्राण्याच्या चित्रात तपशीलवार रंग भरत जातो.  मुलं पळवणार्‍या टोळ्या, गर्दुल्ल्यांचं आणि भिकार्‍यांचं जग, झोपडपट्ट्या आणि तत्सम वस्त्या, कनिष्ठ मध्यमवर्गीय घरांतल्या मोर्‍या, स्वैपाकघरं आणि बेडरुम्स, पोलीस कोठड्यांच्या पलीकडचे क्वार्टर्स-रिमांड रूम्स-कंट्रोल रूम्स, जुने कळाहीन स्टुडिओ, गटारं-नाले-ट्रॅफिक-फेरीवाले आणि लोकल ट्रेन्स. एकाच वेळी अनेक चेहरे वागवणारं एक धडधडणारं महानगर कश्यपच्या इतर चित्रपटांप्रमाणेच याही चित्रपटातलं एक पात्रच आहे. या शहराच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकाला कलीची आई (तेजस्विनी कोल्हापुरे) दिसते. चार भिंतीत बंदिस्त झालेली, टीव्ही-मेकप-फोनपलीकडे आयुष्य न उरलेली, मुलीतही फारसा रस नसलेली ही बाई. तिचा सध्याचा नवरा (रोनित रॉय) पोलिसात मोठ्या पदावर आहे. कलीचा बाप (राहुल भट) तिला दर आठवड्याला भेटायला नेणारा अपयशी होतकरू नट. त्याच्यासोबत गेलेली कली गाडीतून दिवसाढवळ्या बेपत्ता होते. एखाद्या ’सर्वसामान्य’ मूल हरवण्याच्या केसकडे करावं तितपत दुर्लक्ष याही केसकडे करणारे पोलीस जागे होतात, ते तिचा सावत्र बाप कोण आहे ते कळल्यावर. यंत्रणा वेग घेते. यच्चयावत सगळ्या लोकांची डोकी आपापल्या स्वार्थाच्या दिशांनी चालू लागतात. कलीचा सावत्र बाप. कलीचा सख्खा बाप. बापाचा संशयास्पद मित्र (विनीत कुमार सिंग). बापाची मादक प्रेयसी (राखी मल्होत्रा). प्रेयसीचा निकामी नवरा. कलीचा भणंग मामा (सिद्धान्त कपूर). पात्रांचे कडवट भूतकाळ. त्यांच्यातलं नासून बसलेलं नातं. अहंकारांचे तिढे. आणि न सापडणारी कली.

गोष्टीच्या अखेरीस कली सापडते, तेव्हा कलीला पळवणारा गुन्हेगार कोण या प्रश्नाचं उत्तर मिळतं. पण त्या उत्तराच्या अर्थहीनपणानं प्रेक्षकाला सटपटायला होतं.

कश्यपच्या या चित्रपटातून अनेक मराठी चेहरे दिसतात. त्यांतला एक महत्त्वाचा चेहरा म्हणजे तेजस्विनी कोल्हापुरे. टिपिकल आईपण नसलेलं, नकारात्मक छटा असलेलं हे काम तिनं सुरेख केलं आहे. पण ती ’पॉंच’मध्येही होती. त्यामुळे ती कश्यप टीमला तशी नवी म्हणता येणार नाही. खरा सुखद धक्का म्हणजे गिरीश कुलकर्णी. सुरुवातीला या केसकडे निर्विकारपणे बघणारा इन्स्पेक्टर जाधव ते केसमध्ये गुंतत गेलेला इन्स्पेक्टर जाधव त्यानं रंगवला आहे. या पात्राला आणि पर्यायानं गिरीश कुलकर्णीच्या ताकदीला भरपूर फुटेज देत कश्यपनं त्याचे व्यवस्थित लाड केले आहेत! भाषिक लकबी, सहज वावर, प्रसंग बघता बघता कब्जात घेण्याची त्याची ताकद बघता; ’कहानी’, ’गॅंग्स ऑफ वासेपुर’, ’तलाश’, आणि ’बॉम्बे टॉकीज’मधून भारून टाकणारा नवाजुद्दिन सिद्दिकी आठवला. गिरीश कुलकर्णीही तस्साच कुठच्या कुठे गेला, तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही.

सिनेमाशी तसं संबंधित नसलेलं, पण लक्षात आलेलं अजून एक गंमतीदार वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ दर तिसर्‍या फ्रेममधून दाखवलेलं धूम्रपान. पडद्यावर जेव्हा जेव्हा धूम्रपान दिसेल, तेव्हा तेव्हा ’धूम्रपान हे आरोग्यास हानिकारक आहे’ ही पाटी डाव्या कोपर्‍यात दाखवलीच पाहिजे अशा सक्तीवरून कश्यपचा सेन्सॉरशी झालेला वाद तुमच्या लक्षात असेल, तर यांतली गंमत तुमच्या लक्षात येईल. "पाटी हवी आहे? घ्या. प्रत्येक फ्रेममध्ये पाटी लावतो. इतक्यांदा दाखवतो, की ती प्रेक्षकाच्या नजरेला सवयीची होईल आणि तिचं प्रयोजनच संपेल!" अशा हट्टानं सिनेमातल्या बहुतांश फ्रेम्समध्ये कुठलं ना कुठलं पात्र धूम्रपान करताना दिसतं. ते बघताना एकीकडे ’गिधाडे’च्या वेळचा रमेच्या पदरावरचा निळा डाग आठवून गंमत वाटते, तर दुसरीकडे आपल्या एरवीच्या नजरेला इतकं सवयीचं झालेलं धूम्रपान पडद्यावर मात्र ’अनैतिक’ ठरवण्यामधला दांभिकपणा बघून थबकायला होतं. हा खास शालजोडीतला ’कश्यप’ टोला.

कश्यप हे आता तसं स्थिरावलेलं नाव आहे. त्याला त्याचा असा प्रेक्षकवर्ग आहे. तरीही त्याच्या सिनेमांमध्ये बनचुकेपणा वा फॉर्म्युला आलेला नाही, हे बघून फार आश्वासक वाटतं. त्या अर्थानं कश्यप त्याचं कूळ टिकवून आहे. नि तरी त्याची अजून तरी फॅक्टरी झालेली नाही.

  • कलमवाली बाई

(pahawemanache@gmail.com)

 

अग्ली - चित्रपटाची /नाटकाची माहिती

अग्ली
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: अनुराग कश्यप
  • कलाकार: राहुल भट, रोनित रॉय, गिरीश कुलकर्णी, सिद्धान्त कपूर, तेजस्विनी कोल्हापुरे
  • चित्रपटाचा वेळ: १२८ मिनिटे / २ तास ८ मिनिटे
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: http://boxofficemoney.in/ugly-first-1st-day-box-office-collection-income-earning-business-report/
  • प्रदर्शन वर्ष: 2014
  • निर्माता देश: भारत