हायवे (२०१५): एका वेगवान रॅटरेसचा सेल्फी!

अनेकदा शालेय आयुष्यात काही प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतात, त्यांची उत्तरे तेव्हा कोणी नीटशी देत नाहीत. पुढे रस व गती असल्यास आपणच ती शोधतो. "पृथ्वी फिरायची थांबली तर!" या प्रश्नाने मला आठवी-नववीत असताना पुरते घेरले होते. शाळेतल्या तसेच मुंबईच्या नेहरू तारांगणातल्या लायब्ररीत मी काही पुस्तकेही धुंडाळली होती. शेवटी आमच्या एका लाडक्या सरांकडे हा प्रश्न घेऊन गेलो. त्यांनी सांगितलं होतं "हा वेग अतिशय आवश्यक आहे. या विश्वात स्थिर असे काही नाही. जे काही स्थिर दिसते तो नुसता आभास असतो म्हणा किंवा आपल्या सापेक्ष ते स्थिर भासते म्हणा. एका अणूमध्येही इलेक्ट्रॉन्स कसे फिरत असतात हे आपण पाहिलेय की नाही. तसंच पृथ्वी फिरणेही गरजेचे आहे. जर ती पूर्णपणे अचानक थांबली तर आपण सगळे म्हणजे झाडे, पाणी, जीव सगळेच पृथ्वी बाहेर फेकले जाऊ. मात्र त्याच वेळी पृथ्वीची गती वाढली तरी मोठ्या प्रमाणात हाहा:कार उडेल, पाण्याची पातळी वाढेल आणि मोठ मोठ्या लाटा येऊन जमिनीवरील जीवसृष्टी संपेल. तेव्हा गती असते, ती महत्त्वाचीही असते पण ती सुयोग्य गती हवी. इतक्या ग्रहांमध्ये केवळ पृथ्वीला ती गती लाभण्याने इथे जीवसृष्टी फुलली, बहरली"
आता तुम्ही म्हणाल की हे आम्हाला का सांगतोय. तर निमित्त आहे "हाय वे"चे. आयुष्याच्या, आपल्या जगण्याच्या गतीवर आणि त्या गतीचं रूपांतरित झालेल्या भन्नाट वेगावर मार्मिक भाष्य करणारा चित्रपट 'हाय वे - एक सेल्फी आरपार' पाहण्यात आला आणि बर्‍याच अंगांनी तो आवडून गेला.

या चित्रपटाची कथा म्हणावी तर ती एक कथा नाही. तो अनेक प्रसंगांचा समुच्चय आहे. गंमत म्हणजे हे प्रसंग वरवर पूर्णत: वेगळे भासतात, पण ते एकाच दिशेने निर्देश करत असतात. वेगवेगळी पात्रे, वेगवेगळ्या स्तराच्या, व्यवसायांच्या, क्षमतेच्या, पार्श्वभूमीच्या अवकाशातून आलेली. मात्र जाताहेत एकाच दिशेने. एकाच वेगात. अख्खा समाज एखाद्या रेसमध्ये असल्यासारखा धावतोय. चित्रपटाचा पूर्वार्ध केवळ ही पात्रंच नाहीत तर त्यांच्या आयुष्याला आलेला भन्नाट वेग, एकूणच शहरी जीवनाचा पोत, माणसा माणसात उतलेली औपचारिकता, वेगात धावत राहण्याचा आवेगात माणसांच्या सवयींमध्ये, जाणिवांमध्ये, विचारांमध्ये, कृतींमध्ये आणि मुख्यत: नैतिकतेमध्ये झालेले बदल नेमकेपणाने टिपण्यात खर्च होतो. "प्रगती" या गोंडस नामधारेत वाहत जायचा आटापिटा करणारे एकाच समाजातील वेगवेगळे घटक आपल्या समोरून वाहत जाताना दिसतात. काही आपखुषीने, काही नकळत, काही त्रासाने, काही अलिप्तपणे तर काही सोशिकतेने! चित्रपटाच्या उत्तरार्धात एका खोळंब्याने या सगळ्याच वेगकर्‍यांना खोळंबावे लागते, काही तास एकाच जागी थांबावे लागते. आणि तो गतीचा, वेगाचा अभाव ते औट घटकेचे स्थैर्यसुद्धा अनेकांच्या वेगवेगळ्या आयामांवर कसा परिणाम करते? आयुष्याच्या भरधाव वेगाला हे जुलमाचे का होईना, लागलेले स्तब्धतेचे ब्रेक नक्की काय करतात? पृथ्वीच्या वेगाला लागलेल्या ब्रेकमुळे होणार्‍या परिणामा प्रमाणे ते बाहेर फेकले जातात की अधिकचा वेग कमी केल्याने त्यांच्या अवकाशात काही पॉझिटिव्ह बदल होतात हे पाहणे नक्कीच वेगळा अनुभव आहे.

वेगासोबतच हा चित्रपट आणखी एक महत्त्वाचे काम करतो ते म्हणजे सध्याच्या समाजाचे यथार्थदर्शन! किंवा नावातच म्हटले आहे ती "सेल्फी"! चित्रपटातील काही प्रसंग तर अंगावर शहारा आणणारे आहेत. अगदी सुरुवातीला चाळीतून बाहेर येणारा एक मुलगा दाखवला आहे. तो जसजसा बाहेर पडू लागतो त्याच्या पार्श्वभूमीला असणारे टोलेजंग टॉवरचे जाळे, इमारत बांधणीवच्या रुक्ष ध्वनींची जोड एकाही संवादाशिवाय बरेच काही बोलून जातात. नवर्‍याचे बायकोला गृहीत धरणेही आपल्या समाजात अगदीच कॉमन आहे. याही चित्रपटांत तशी तीन जोडपी आपल्याला दिसतात (सुनील बर्वेच्या वाहनातले एक तर दुसरे गिरीश कुलकर्णीच्या वाहनात आलेले रेणुका शहाणे-विद्याधर गोखले यांचे, तर तिसरे घर शिफ्टिंग करत असलेल्या माणसाचे) यातील सर्वच स्त्रियांनी हे असे असणे स्विकारलेले आहे पण त्यांच्या वयामुळे असेल किंवा जाणिवांच्या प्रगल्भतेमुळे असेल किंवा परिस्थितीमुळे असेल त्यांचा त्या परिस्थितीला दिलेला प्रतिसाद मात्र पूर्णतः वेगळा आहे. आणि अश्या प्रकारचे समाजाचे विविधरंगी दर्शन आपल्याला या पात्रांतून अचूकतेने घडते. 

या वेगात वाहणारा प्रत्येकजण त्या वेगाच्या आहारी गेलाय का? जाऊ इच्छितोय का? तर तसेही या चित्रपटात दाखवलले नाही. बहुतांश चित्रपटात शांत बसलेली व गरज लागताच गोळ्या पुढे करणारी मुलगी असो, किंवा बायकोकडून दरवेळी जबरदस्तीने पुन्हा प्रवासात ओढला जाणारा व तिथे बांधून पडलेला नवरा असो किंवा त्या प्रवाहाचा सहज भाग असलेले नि अध्यात्मापासून ते आदीभौतिकापर्यंत कशावरही शिळोप्याच्या गप्पा मारणारे असे वेगाला निर्ढावलेले काही प्रवासी असोत किंवा काही भीषण घटनांमुळे या सगळ्याच्या पलीकडे जाऊन वेड लागलेली पक्षीधारी व्यक्ती असो आपल्याला या अशाही घटकांचे दर्शन होते. या घटकांवर वेगवेगळ्या कारणाने जसा वेग फार परिणाम करत नाही तसंच वेगाचा अभावही त्यांच्यात काहीही आमूलाग्र बदल घडवत नाहीत.

मग या चित्रपटात सगळेच जमून आलेय का? तर तसेही वाटत नाही. काही चांगल्या कलाकारांचा कमी पडलेला अभिनय ही मला जाणवलेला मोठी त्रुटी. गिरीश कुलकर्णी  हा एनाराय दाखवला आहे. त्याने अभिनयावर कितीतरी अधिक मेहनत घ्यायला हवी होती असे वाटले. त्याचे पोशाख, त्याचे वागणे, मराठी शब्द शोधायला त्याला होणारा त्रास वगैरे सगळे सहीसही उतरले आहे. पण एकुणाच त्याची देहबोली, आणि मुख्यतः त्याचे इंग्रजी अगदीच "भारतीय/देसी" वाटते. वर्षानुवर्षे देशाबाहेर राहिलेल्यांचे विचार नैतिकता किंवा पोशाख वा शब्दसंपदा यांतच फक्त फरक पडत नाही तर त्यांच्या भाषेचा लहेजा, पोत, यांच्याबरोबरच त्यांची देहबोली, लकवी, सवयी   सामान्य एतद्देशीयांपेक्षा वेगळ्या होत जातात. इथे गिरीश कुलकर्णी चांगलाच तोकडा पडतो. दुसरे असे की त्याची भूमिका ही अगदीच "कस्टम" वाटते. खास स्वतःसाठी कातरून घेतलेली. इतर प्रवासी जसे त्या त्या प्रकारच्या व्यक्तींचे प्रतिनिधित्व करतात तसे गिरीश एनाराय मंडळींचे प्रतिनिधित्व न करता एक विवक्षित व्यक्ती इतकाच उरतो. त्याच प्रमाणे मुक्ता बर्वेचाही अभिनय निराश करतो. तमासगिरणींची भाषा तिने आपलीशी केली आहे पण कायिक अभिनय किंवा देहबोली बरीच आखडलेली आहे. संवादफेकही "मुक्ता"ची आहे त्या तमासगिरणीची नाही. तिच्या सोबत तिच्या सोबतीणीची भूमिका करायला खरी तमाशा कलाकार असताना तर तिचे हे उणेपण चांगलेच नजरेत भरते. (तिच्या सोबतीणीचे - अक्काचे - काम करणार्‍या कलाकाराने मात्र भूमिकेला चार चाँद लावले आहेत).

चित्रपटातली दुसरी त्रुटी म्हणजे काही प्रसंगांत असणारी अतिरिक्त काव्यात्मकता. एक मोठे गाठोडे घेऊन जाणार्‍याच्या गाठोड्यात काय असेल याचा अंदाज आधीच आलेला असतो शेवटी त्या गाठोड्यातलं तथाकथित गुपित उलगडतं तेव्हा तर "बघा बघा आता मी कसे प्रतीक वापरणार आहे, बघा बघा" असा डोळ्यात बोट घालून तो प्रसंग भडक करण्याची काही गरज नव्हती, हे कितीतरी सटल करता आले असते. (यात चित्रपटात काही कारणाने वेग सुटल्याने मुल हरवण्याची - त्या वेगासोबत पुढे निघून गेल्याची - किंमत भोगाव्या लागणार्‍या कथेतले सुंदर 'साटल्य' एकीकडे तर दुसरीकडे हा भडक प्रसंग) शेवटी धुक्यात दिसणार्‍या प्रतिमा बघून तर दवणीयतेचा कळस साधला गेला. शेवटाचा रेणुका आणि गिरीश मधील संवादही ओठांना चिकटा येईल इतके गोग्गोड! भा.रा.तांब्यांच्या कवितेचा वापरही ठरवून "लै भारी" काही केल्यासारखा- नेमका, छान पण प्रक्षिप्त भासेल इतक्या वेगळ्या पोताचा.

अर्थात ध्वनी, प्रकाशलेखन, संगीत, अमराठी कलावंताचा प्रभावी वावर नी वापर, खोळंबलेल्या ट्रॅफिकचे अफलातून चित्रीकरण, वेगाची पात्रांना झालेली सवय नी प्रसंगी धुंदी वगैरे सगळ्या फ्रंट्सवर अफलातून काम केलेले आहे. पटकथेवरही बरेच काम झाल्याचे ठिकठिकाणी जाणवते. त्यामुळे हे जे काही आक्षेप आहेत ते चित्रपटाला बाद ठरवण्यासाठी नसून एकूणच चित्रपटाने उंचावलेल्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर आलेले आहेत. या "नीयर पर्फेक्ट" चित्रपटाला माझ्यालेखी पर्फेक्ट होण्यासाठी हे घटक अगदी किंचित कमी-जास्त पडले इतकेच. मात्र त्याने पदार्थाच्या चव, रस, गंध यावर नाही तर केवळ पोतावर परिणाम झाला आहे.

तेव्हा शेवटी इतकेच म्हणेन की, काही माध्यमांत यावर आलेली परीक्षकांची मर्यादा उघड करणारी काही परीक्षणे आणि थिएटर मधील प्रेक्षकांचा प्रतिसाद बघता हा चित्रपट तिकीट-बारीवर फारसा चालणार नाही असे वाटते. तेव्हा याचे खेळ उतरायच्या आत खास सिनेमागृहात जाऊन हा "शहाणा" व भवतालाचे भान राखून केलेला चित्रपट नक्कीच बघा!

हाय वे - एक सेल्फी आरपार - चित्रपटाची /नाटकाची माहिती

हाय वे - एक सेल्फी आरपार
  • Official Sites:

  • दिग्दर्शक: उमेश कुलकर्णी
  • कलाकार: गिरीश कुलकर्णी, मुक्ता बर्वे, रेणुका शहाणे, सुनील बर्वे
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: मराठी, हिंदी, इंग्रजी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१५
  • निर्माता देश: भारत