लेथ जोशी (२०१८): हरपत चाललेला ठेहराव

'लेथ जोशी' पाहिला. त्याचे परीक्षण वगैरे करण्याचा इरादा नाही. एखादा दर्जेदार सिनेमा पाहिल्यावर त्यातल्या प्रतिमा दीर्घ काळपर्यंत मनात तुकड्यातुकड्याने चमकत राहाव्यात आणि त्या उगमापासून डोक्यात निरनिराळ्या दिशांना जाणारे दमदार, प्रवाही विचार उमटत राहावेत तसे काहीतरी झाले आहे. हे विस्कळीत विचार नोंदवून ठेवण्याचा हा प्रयत्न. 

सिनेमाच्या कथेबद्दल रसभंग न करता एका ओळीत सांगणे आवश्यक आहे. बदलत्या काळासोबत कामाच्या प्रवाहातून बाहेर फेकल्या गेलेल्या एका माणसाची,त्याच्या फेकल्या जाण्याची ही गोष्ट आहे. 

सगळ्यांत भारी काही असेल, तर सिनेमातला ठेहराव. संपूर्ण गोष्टीला अतिशय संथ अशी एक अंगभूत लय आहे. चित्रचौकटी त्यांच्या गतीने आपल्या डोळ्यासमोर शांतपणे उलगडत जातात. त्यांचे आपले स्वतःचे असे सौंदर्य आणि आशय आहेच. पण त्यांची ही धीमी लय सिनेमाला त्याची खास प्रकृती बहाल करून जाते. त्याच्या जोडीने पार्श्वसंगीत. दर चौकटीला, दर प्रसंगाला मागे काहीतरी टायटुंय वाजलेच पाहिजे असे नाही, हे पचवण्याची ताकद असलेले पार्श्वसंगीत या गोष्टीला मिळाले आहे. एरवी पायही न वाजवता शांतपणे घरभर फिरणार्‍या पण वस्तूंवर आपला काळजीपूर्वक हात फिरवणार्‍या व्यक्तीसारखे ते सिनेमाभर आहे. पण कळीच्या प्रसंगात ते आपले अस्तित्व असे काही जाणवून देते, की जीव थरारून जातो. चित्रचौकटींची प्रकृती आणि पार्श्वसंगीत या दोन्ही गोष्टींनी मिळून सिनेमाला दिलेला ठेहराव निव्वळ दुर्मीळ आणि नितांत देखणा आहे.

या ठेहरावामुळेच सिनेमा आपल्याला गोष्ट सांगता सांगता इतरही अनेक विचार करायला माया पुरवत राहतो. सिनेमातली गोष्ट लेथ जोशींची आहे खरी. पण ती फक्त त्यांची नाही. ती माझीही आहेच.

कोणत्याही माणसाला जगण्यासाठी निव्वळ अन्न-वस्त्र-निवारा आणि थोडी चैन पुरत नाही. त्याला आपल्या जगण्याला आब असलेला हवा असतो. आब असेल, तर आब-रू असते. लेथ जोशी हा यंत्रावर काम करणारा कुशल कारागीर. स्वतःला कलाकार मानणारा. पण तशी कला नसते कुठे? आपले काम मनापासून, जीव ओतून करणार्‍या सार्‍याच माणसांचे काम म्हणजे त्यांचे सर्जनच असते. ते त्यांच्या जगण्याला अर्थ पुरवत असते. हा अर्थ त्या माणसापासून हिरावून घेतला गेला, तर त्या माणसाने काय करावे? मग जगणे काय आणि मरणे काय, सगळे सारखेच. तुम्ही-आम्ही-सगळेच याच दिशेने चालणारे प्रवासी आहोत, हे लेथ जोशी ठायी ठायी सांगत राहतो.

बदलता काळ, सतत प्रगत होत जाणारे तंत्रज्ञान, मानवी हातांचे कालबाह्य होत चाललेले कौशल्य, यंत्र आणि माणसातले अनेकपदरी नाते आणि या सगळ्या बदलांचा क्षणोक्षणी राक्षसी होत जाणारा वेग... या सूत्रांची घट्ट वीण सिनेमाला वेढून आहे. तलम आणि खमंग पुरणपोळ्या करणारे हात, त्या हातांच्या दिमतीला आलेला नि हातांचे कष्ट वाचवणारा फूडप्रोसेसर. जगभरच्या पदार्थांच्या पाककृती टीव्हीवरून जाणून घेऊन काळासोबत राहिलेली व्यावसायिक सुगरण. जुनाट वाड्याच्या देखण्या गतखुणा मिरवणारी दरवाज्याची चौकट आणि त्यात येऊन ठाकलेली पिवळीधम्मक नॅनो. स्वामी समर्थांचा जप करणारे यंत्र आणि नरसिंहावर अभिषेक करणारा अ‍ॅपलचा लॅपटॉप. नाना प्रकारची, बघत राहावीशी वाटणारी, आपल्या आत्ममग्न कौशल्याचे सौंदर्य ल्यालेले एकाग्र-कसबी हात.... आणि चढत्या वेगाने त्यांचे जीवनाच्या प्रवाहाबाहेर फेकले जाणे... 

काही प्रकारची माणसे बदलत्या काळासोबत जुळवून घेत राहतात. काही प्रकारची माणसे आपल्या कामात जीव ओतून त्यातच आपले विश्व निर्माण करतात. यांतले काय चूक आणि काय बरोबर हे ठरवता येणे अशक्य आहे. म्हटले तर जगण्यासाठी पहिले कौशल्य आवश्यक आहे. म्हटले तर तेच जगणे अर्थपूर्ण करण्यासाठी दुसरे कौशल्य अनिवार्य आहे. अशा वेळी जगातल्या बदलांचा वेग आपल्याला भोवंडून टाकत असताना दुसर्‍या प्रकारचे कौशल्य असलेल्या माणसांनी नेमके करावे तरी काय?

निव्वळ अधिक उत्पादन करणे, अधिक उपभोग घेणे, अधिक सुखे ओरबाडणे, अधिक अधिक अधिक.... हे हव्यास आपल्याला सुखे देतील. पण आनंद आणि समाधान आणि शांतता देतील का? आणि भलेही - या सगळ्या गोष्टी म्हणजे निव्वळ चोचले मानले, तरी पृथ्वी आपल्या या हव्यासांना कुठवर पुरी पडेल?

कुठवर जाऊन थांबणार आहे हे? 

माणसापाशी असलेला सर्जनाचा ठेहराव आणि पर्यायाने त्याच्या जगण्यातला आब हिरावून घेणारी ही तथाकथित अपरिहार्य अशी जगण्याची व्यवस्था पाहताना आपले तिच्यातले प्यादेपण दिसायचे राहत नाही आणि मग भयानक उदास-विषण्ण-हताश व्हायला होते.
लेथ जोशीचे काम करणारा नट आपल्या मिताक्षरी वावराने, दुखर्‍या डोळ्यांनी, त्या पात्राच्या बाह्यावताराला साजेशा नसलेल्या आणि त्यामुळे चकित करणार्‍या भिजल्या स्वराने आपल्याला स्पर्श करून जातो. आपल्या कामाचे जाणकाराकडून कौतुक झाल्यावर तो ज्या डौलात सिगारेट शिलगावतो, ते पाहताना आपण मनापासून सैलावतो-हुशारतो-फुशारतो. सिनेमा संपता संपता लक्ष्यात येते, हा नट संपूर्ण सिनेमात एकदाच हलकेसे हसतो. लेथ मशीनवरच्या त्याच्या प्रभुत्वामुळे त्याला ‘लेथ जोशी’ या संबोधनासह नकळत दाद मिळते, तेव्हा. तेव्हा आपले डोळे भरून येतात...

लेथ जोशी (२०१८) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

लेथ जोशी (२०१८)
  • Official Sites:

    imdb
  • दिग्दर्शक: मंगेश जोशी
  • कलाकार: अश्विनी गिरी, ओम भुतकर, चित्तरंजन गिरी
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: मराठी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१८
  • निर्माता देश: भारत