क्लासमेट्स - नवे काही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न
मराठी चित्रपटांमध्ये कॉलेजपट किंवा नवतरुण वर्गाच्या विश्वावर आधारित चित्रपट हा प्रकार फारसा आलेला नाही. गेल्या काही वर्षात पौगंडावस्थेतील वर्गाला टार्गेट करायला, नाही म्हणायला 'टाईमपास'सारखा चित्रपट येऊन गेला; तर ‘दुनियादारी’चा दावा तो तरुणांचा चित्रपट असल्याचा होता (जरी त्यात बहुतांश प्रमुख कलाकार मध्यमवयीन असतील तरी - होय आमच्यासाठी मध्यमवय ३०-३५ ला चालू होते.) अतिशय भडक व मूळ संहितेची मोडतोड करून अधिकच कंटाळवाणा बनलेल्या ‘दुनियादारी’नंतर पुन्हा एक कॉलेजपट येतोय ही बातमी किती जणांना उत्साहवर्धक वाटली असेल मला प्रश्नच आहे. त्यातच क्लासमेट्सचे ट्रेलर आले ते "गेल्या दशकातील" स्टाइल असलेले कपडे घातलेल्या नि कॉलेजवयीन म्हणून मिरवणार्या अंकुश चौधरी व सई ताम्हणकरला 'तरुण विद्यार्थी' म्हणून सादर करत. तेव्हाच हा चित्रपट बघायचा नाही असे वाटू लागले होते. मात्र आदित्य सरपोतदार यांची 'नारबाची वाडी'च्यामुळे जमवलेली पूर्वपुण्याई लक्षात घेऊन, तसेच काही खरोखरच तरुण चेहरे पोस्टरवर दिसल्याने, आणिहा मल्ल्याळम ’क्लासमेट्स’ (२००६)चा अधिकृत रीमेक असल्याचे ऐकल्याने उत्सुकतेने भीतीवर मात केली आणि मनाची तयारी - खरेतर हिय्या - करून चित्रपट बघायला गेलो.
थोडक्यात सांगायचे तर अपेक्षाभंग झाला - पण सुखद. माझी अपेक्षा होती की चित्रपट अतिशय बटबटीत नि टुकार असेल पण फार्फार ग्रेट वगैरे नसला तरी एकूण भट्टी बरी जमलीये की!
चित्रपटाची कथा नवखी वगैरे नाही. खरेतर आधी म्हटल्याप्रमाणे २००६मध्ये गाजलेल्या मल्ल्याळम ’क्लासमेट्स’चा हा रीमेक आहे. त्यामुळे कथा किती चांगली अथवा वाईट आहे याचे मूल्यमापन करण्यात इथे फार वेळ घालवत नाही. कथासूत्र असे आहे की सत्या (अंकुश चौधरी) हा कॉलेजमधील सर्वात प्रसिद्ध विद्यार्थी शेवटच्या वर्षाला आहे. अफाट मित्रसंग्रह (म्हणजे तेच ते १०-१५च दिसतातो, बाकी अध्याहृत), बोलायला "भाई", प्रसंगी कठोर आणि वेळप्रसंगी मृदू हृदयाचा, पूरग्रस्तांसाठी निधी गोळा करणारा, मात्र स्वाभिमान अत्युच्च आणि प्यारा असलेला वगैरे टिपीकल ग्रे हीरो! अतिशय अपेक्षित प्रकारे त्याचे पात्र चित्रपटात उभे राहते. त्याचे पात्र बाहेरून कठोर कवच मात्र आतून मलई असणारा नारळ म्हणून एकदा(चे) उभे करून झाले की मग अपेक्षेनुसार एक "टॉम बॉय" मैत्रीण असणे, ही अप्पू (सई ताम्हनकर) त्याच्याच कंपूतील मुलगी त्याच्या मागे असणे वगैरे ओघाने आलेच. ति़चे "बेन" (स्त्रिलिंगी भाई हो!) स्टाईलने बोलणे, सत्याची सावली असणे वगैरे यथावकाश पार पडते. अर्थातच तिला सत्या आवडत असतो. मग त्यांच्याच वर्गात चार 'शिरेस' मुलींसोबत राहूनही नट्टापट्टा वगैरे करणारी, (म्हणे) सोज्ज्वळ, (म्हणे) सुसंस्कारित वगैरे अदिती नावाची मुलगी (सोनाली कुलकर्णी) हवीच. ती असतेच. नियमाप्रमाणे आधी ती सत्यावर राग धरून असते आणि नव्वदोत्तरी मारधाडपटातल्यासारख्या गुंडांच्या तडाख्यातून वाचल्यावर रीतसर ती सत्याच्या (व सत्या तिच्या) प्रेमात वगैरे पडतात. इथवर नेहमीच्या वळणाने जाणार्या चित्रपटातल्या कॉलेजात निवडणुका घोषित होतात आणि हे दोघे प्रेमवीर निवडणुकीत समोरासमोर ठाकतात. अख्खे कॉलेज दोन गटात दुभंगते. मग नक्की काय होते? निवडणूक कोण जिंकते? या प्रश्नांना हा चित्रपट रंजक मार्गाने सोडवतो. याच बरोबर अनिरुद्ध (सिद्धार्थ चांदेकर) हा गोग्गोड वगैरे फर्स्ट इयरचा मुलगा मात्र दोन्ही गटांना प्रिय असतो (खरेतर सिनेमाच्या नियमाप्रमाणे 'अनि' "अख्ख्या" कॉलेजचा लाडका म्हणायला हवा). या निवडणुकांच्या गदारोळात त्याचा मृत्यू होतो. पुढे २० वर्षांनी त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ कॉलेजात उभ्या राहिलेल्या संगीत विभागाच्या उद्घाटनाला सत्या आत्महत्येचा प्रयत्न करतो. तो का? हा सस्पेन्सही पूर्ण चित्रपटभर छान वापरलेला आहे आणि चित्रपटात त्याची झालेली उकलही समाधानकारक आहे.
आता हा चित्रपट रंजक आहे का, तर हो! याची मला जाणवलेली काही कारणे. एक म्हणजे चांगले संवादलेखन - चांगले यासाठी की कथा २० वर्षांपूर्वी घडतेय आणि त्याचे भान राखत लिहिलेले संवाद आहेत - हे मुख्य . आणि त्यातही तत्कालीन संज्ञा, मित्रामधील भंकस करण्याची भाषा, विषय हे सगळे छान उतरले आहे. वेशभूषासुद्धा ट्रेलरमध्ये काहीशी जुनी वाटत असली तरी मुळात कथाच त्या काळी घडतेय हे बघितल्यावर एकदम सुसंगत होऊन जाते. दुसरी गोष्ट आवडली ती म्हणजे काही लहान वाटणार्या गोष्टींकडे दिलेले लक्ष. याचे कौतुक वाटायचे कारण असे की हा चित्रपट पिरियड फिल्म म्हणावा असा नाही. त्यात १०-२० वर्षांपूर्वीचा काळ उभा करणे माझ्या मते अधिक आव्हानात्मक आहे. एकतर इतक्या कमी काळात अनेक गोष्टी बदललेल्या आहेत. त्यात तो काळ प्रेक्षकांना परिचितही आहे. अन् याचेच भान या चित्रपटात दिसले. उदा. कॅन्टिनमध्ये जुन्या ढंगाचे व रेग्युलेटरचे पंखे असणे, कोल्ड्रिंक्सचे रॅक व त्यातील कोल्ड्रिंकच्या बाटल्या जुन्या ढंगाच्या असणे, मेन्यु लिहायची पद्धत, गाड्यांची मॉडेल्स (विशेषतः अप्पू वापरते ती बाइक) इत्यादी अनेक गोष्टी सांगता येतील. मराठीमध्ये तपशिलांकडे असे लक्ष दिले जाणे नक्कीच स्वागतार्ह आहे!
याव्यतिरिक्त सिद्धार्थ चांदेकरला मिळालेल्या महत्त्वाच्या रोलमध्ये त्याने छान 'चमकून' घेतले आहे. अतिशय गोग्गोड भूमिका असूनही त्याने मात्र ती बरीच सहज पेश केली आहे ज्यामुळे तो गोग्गोडपणा अंगावर न येता खरा वाटू लागतो - आवडूही लागतो. अंकुश चौधरी एकतर जरा बारीक झाला आहे त्यामुळे तो पुन्हा योग्य शेपमध्ये आला आहे. तशा सुधारित आकारामुळे तसेच चांगल्या वेशभूषेमुळे ’दुनियादारी’त त्याचे कॉलेजवयीन असणे जेवढे खटकले होते तेवढे इथे खटकत नाही. सई ताम्हनकर अपेक्षेप्रमाणे आपली भूमिका 'नीट' करते. यात आणखी एक गोष्ट सुखावह आहे की तुलनेने कमी लांबी असलेल्या किंवा फारसे संवाद नसलेल्या भूमिकांसाठीसुद्धा अगदीच "एक्स्ट्रा" दिसणारे / बोलणारे कोणीतरी उचलण्यापेक्षा कॅमेरा, सभोवताल यांची जाण ठेवून संवादफेक / वावर करणार्या व्यक्तींचा समावेश असल्याने "अरे! यांना याहून बरा नाही का रे मिळाला कोणी?" अशी आर्त हाक द्यायचे प्रसंग फारसे येत नाहीत. शेवटचा सस्पेन्सही पटण्याजोगा असल्याने कैच्याकै शिव्या देत प्रेक्षक बाहेर पडत नाहीत.
अर्थातच, चित्रपटात या सगळ्या गोष्टी असल्या तरी त्याचा एकत्रित परिणाम मात्र मर्यादित होतो. त्यात माझ्या जुन्याच तक्रारी आळवणार आहे. एक म्हणजे संगीत. गाणी जाऊच द्या, पण प्रत्येक संवादाला, प्रसंगाला संगीत देणे म्हणजे किमान एखादे वाद्य तरी वाजत असलेच पाहिजे हा गोड समज कधी जाणार आहे कोण जाणे. काही प्रसंगी शांतता अधिक बोलकी असते वगैरे वाक्य फक्त वाचायपुरतीच नसतात. नुसते चालणे, बघणे, सुंदर दृश्य अनुभवणे, एकमेकांच्या डोळ्यांत गुंग होणे चालू झाले की - खरेतर काहीही व कोणतीही कृती सुरू झाली की लगेच - पाठीमागे काहीतरी व्हॉयलिनचा तुकडा, तबला, ट्रंपेट, गेला बाजार एखादी आलापी झालीच पाहिजे का? तसे नाही केले, तर कलाकार चालू, बोलू, रडू किंवा हसू शकत नाहीत असा काही समज आहे का? तीच गोष्ट ध्वनींबाबत! ध्वनी नावाचा प्रकार फक्त मोठे आवाज होतेवेळीच वापरायचे असतात, ध्वनीतून पडद्यावर न दिसणारेही काही समजू शकते वगैरे गोष्टींची शक्यतासुद्धा कोणी फारसे अजमावू पाहत नाहीत. घडणारी प्रत्येक गोष्ट दिसली नाही आणि त्यावर काहीतरी स्पष्ट शब्दांत बोलले गेले नाही (नि त्यात मागे काहीतरी वाद्य जोरात वाजले नाही) तर बिच्चार्या निर्बुद्ध वैग्रे प्रेक्षकांना काही काही म्हणून समजणार नाही, नि कर्कश्य संगीताशिवाय भावनाही पोचणार नाहीत असा गैरसमज याही चित्रपटात दिसतो.
अर्थात, एकीकडे मराठी कॉलेजपटांचा दुष्काळ. त्यात ’दुनियादारी’सारख्या भडक टुकारपटासारखा तेरावा महिना भोगलेला. मग मराठीत ’क्लासमेट्स’सारख्या चित्रपटांना बर्या क्लासमध्ये बसवायचा मोह होऊ लागतो. या निमित्ताने व्यावसायिक चित्रपटातही किंचित नवे देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न झालाय एवढे नोंदून थांबतो.
- धनंजय माने
क्लासमेट्स - चित्रपटाची /नाटकाची माहिती
