डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी (२०१५): भारताच्या आपल्या गुप्तहेराची आश्वासक सुरूवात!

'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' बघायचाच हे मी ट्रेलर आल्यापासून ठरवलं होते. त्याचं एकमेव कारण होते 'दिबाकर बॅनर्जी'. 'खोसला का घोसला'सोबत पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कार नि माझ्यासारख्या अनेक प्रेक्षकांची वाहवा लुटत दणकेबाज सुरुवात करणार्‍या या दिग्दर्शकाने 'ओये लकी, लकी ओये'! काय किंवा 'बॉम्बे टॉकीज'मधील त्याचा चतकोर तुकडा काय, किंवा 'लव सेक्स और धोका' सारखी फारशी न चाललेली फिल्म काय, दरवेळी काहीतरी नवे सादर केलं आहे. जिथे ३-४ चित्रपटांनंतर भल्याभल्यांची एक ठराविक 'टेम्प्लेट' जाणवू लागते, तिथे दिबाकर मात्र कोणत्याही चौकटीत बांधून न घेता, नवनवे प्रयोग करताना दिसतो. काही वठतात, काही फसतात. 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी'च्या रूपात केलेला हा प्रयोग अनेक कारणांनी अपेक्षेहून चांगला वठला आहे.

मुळात 'ब्योमकेश' हे असे एक अतिशय गाजलेले पात्र. त्यावर भारतातच 'रजत कपूर' सारख्या कसलेल्या अभिनेत्याला घेऊन 'बासु चटर्जीं'सारख्या दिग्दर्शकाने सिरीजच्या रूपात एक चांगले व अतिशय गाजलेले काम करून ठेवलेले आहे. या पुस्तकाची भाषांतरेही भारतात अनेक भाषांत झालेली आहेत. या कथांची व पात्राची मोहिनीच अशी की, सत्यजित रेंपासून ८ इतर दिग्दर्शकांनी आपापल्या नजरेतून त्यावर चित्रपट बनवलेले आहेतच. मूळ पात्रांच्या पुस्तकांतील व सिरीजमधील लकबींव्यतिरिक्त, या कथांचे रेडियो अभिवाचन, दूरदर्शनवरील सिरीजचे काही प्रयोग इतके सगळे काम आधीच झालेले असल्यामुळे 'ब्योमकेश' एक व्यक्ती, एक पात्र म्हणून प्रेक्षकांना नवीन नाहीच. उलट प्रेक्षकांकडे ब्योमकेशची अशी एक ठाम प्रतिमा आहे. शिवाय मूळ कथा लेखनाचा काळ १९३२ ते १९७० इतका मोठा, नि त्यामुळे लेखकासोबतच ब्योमकेशही 'मोठा' होत जातो, बदलत जातो. या सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीत, दिबाकर बॅनर्जी यावर चित्रपट बनवताना प्रेक्षकांना नक्की काय वेगळं देणार? याची मला प्रचंड उत्सुकता होती. आणि 'पटकथा!' असं याचं एका शब्दात उत्तर देता येईल!

भारतात मुळात गाजलेल्या चित्रपटांचे रीमेक करण्याची थोर्थोर परंपरा आहे, मात्र धार्मिक पुस्तके वगळता एखाद्या अतिशय गाजलेल्या पुस्तकावर, पात्रावर किंवा कादंबरीवर हिंदीमध्ये जितके प्रयोग झालेत त्यातील जनसामान्यांत खूप गाजलेले म्हणावेत असे नाव पटकन आठवत नाही. याचे साधे नि स्वाभाविक कारण आहे 'पटकथालेखन' आणि नेमकी या चित्रपटात मला आवडली ती पटकथा! एखादी कथा घ्यावी, त्यातील मुख्य पात्राच्या तोंडी पल्लेदार संवाद द्यावेत, भव्य सेट्स, 'ढॅण्टॅढॅ' छाप कर्कश संगीत द्यावे, गुलाल/मातीखाली दडवलेले सुतळी बॉम्ब फुटताना विकट हसणार्‍या क्रूरकर्मा वगैरे लेबल लावून हिंडणार्‍या व्हिलनशी "तुम्हाला पर्दाफाश हो चुका है म्हणत" भिशुम भिशुम असे ध्वनी येणार्‍या मारामार्‍या दाखवून प्रेक्षकांना उत्तम थ्रिलर देण्याचा दावा करण्याचे दिवस केव्हाच मागे सरले असले तरी 'धूम'पटांपासून ते 'डॉन'पटांपर्यंतच्या थरारपटांच्या कथांमध्ये त्यांची जागा चकाचक कपडे, आंतरराष्ट्रीय लोकेशन्स, आधुनिक भाषा, 'भारी' वहाने, चटपटीत संकलन इत्यादींच्या सुधारित निर्मितीमूल्यांनी घेतली असली, तरीही पटकथांचे दारिद्र्य झाकायची सोय मात्र काही केल्या होत नव्हती. ब्योमकेशसारख्या (किंवा इतरही काही) चित्रपटांतून ही बाब पुढे येत असूनही बॉलीवूडमध्ये पटकथालेखनावर मेहनत घेणं कधी सुरू होणार आहे कोण जाणे! तर ते असो! हा चित्रपट ब्योमकेशच्या एका कथेवर आधारीत नाही तर 'सत्यवंशी' आणि 'पाथेर कांता'या दोन कथांवर आधारित एक स्वतंत्र पटकथा, स्वतः दिबाकर आणि 'ऊर्मी जुवेकर' यांनी लिहिली आहे.

अशा गुप्तहेरांच्या कथांमध्ये संवादापेक्षा प्रसंग आणि मुख्य म्हणजे रहस्य उलगडण्याचा वेग या दोन गोष्टींना महत्त्व असतं (हेच कारण असे प्रयोग भारतात फार न होण्याचे असेल काय? आपल्याकडे 'डायलॉगबाजी' हवीच अशी काहीशी धारणा!) गुप्तहेरकथांमध्ये प्रेक्षकही त्या गुप्तहेराच्या बरोबरीने त्या कथेवर विचार करत असतो, विविध शक्यता अजमावत असतो, अशावेळी फार बाळबोध कथानक किंवा शेवटी तर्करहित नवाच उलगडा देणारे कथानक लोकांच्या पचनी पडत नाही. रहस्यकथेमध्ये रहस्य काय आहे, याची उत्सुकता प्रेक्षकाला असली तरी त्याचा अंदाज फार आधी आलेलाही प्रेक्षकांना आवडत नाही आणि अगदी शेवटी आलेलाही नाही. ब्योमकेश बक्षीमध्ये हा नेमका वेग गवसला आहे. प्रेक्षक पूर्ण चित्रपट ब्योमकेशच्या नजरेतूनच बघतो. एखाद् दुसरा अपवाद सोडला तर प्रेक्षकाला ब्योमकेशपेक्षा अधिक तपशील माहीत नसतात की कमीही; त्यामुळेच प्रेक्षकही ब्योमकेशसोबत आपली नाळ नकळत जोडतो. अशावेळी ब्योमकेशच्या नजरेतून बघताना विचार करणारा प्रेक्षक जिथे अडकतो, नेमका तिथे ब्योमकेश चतुराईने वाट काढत जातो, नि प्रेक्षकांची दाद मिळत जाते. या अशा पटकथेमुळेच हे सगळं उलगडताना कोणत्याही तिर्‍हाइताच्या निवेदनाची नि निवेदकाची कुबडी घ्यावी लागत नाही.

या चित्रपटात दुसरे आव्हान ते तत्कालीन कलकत्ता दाखवण्याचे. साधारणतः सेट्स वापरून इतका जुना काळ दाखवण्याव्यतिरिक्त फारसा पर्याय राहत नाही कारण तत्कालीन इमारती, वाहने, शहरांमधील महत्त्वाच्या जागा इतके वर्षात बदललेल्या असतात. मात्र इथे जुन्या काळाचे बऱ्यापैकी चांगले चित्रण खुद्द कलकत्त्यात व मुंबईत मिळून केले आहे. इथे घेतलेली मेहनत दिसते मात्र तरी अजून नेमकेपणा म्हणावा तितका आलेला नाही. बग्गीला जोडलेल्या घोड्यांची आधुनिक झापडे, वस्त्यांमध्ये प्लास्टिकचे आधुनिक पद्धतीचे टांगलेले कंदील, मिलवरील नोटिशीवर टाईपरायटर ऐवजी प्रिंटरमधून काढल्यासारख्या अक्षरांच्या वळणाची नोटीस, तत्कालीन वृत्तपत्रे रंगीत नसतानाही काही रंगीत व आधुनिक फॉण्टमधील अक्षरे, किंवा मध्येच एखाद्या सीनमध्ये दिसणारे टेलिफोन निगमचे बॉक्सेस इत्यादी चुका असल्याने एकूणात "ठीकठाक' काळ उभा केला आहे असे म्हणावे लागते. वेषभूषा, केशभूषा आता डोळ्यांना सवयीची नसल्याने कदाचित 'असुंदर' दिसू शकेल या भितीने मध्यममार्गी पळवाट वापरलेली नाही हे मात्र स्तुत्यच. मात्र वेगवेगळ्या वर्गातील व्यक्तींचे पेहराव अचूक दाखवताना पार्श्वभूमीवर 'आऊट ऑफ फोकस' दिसणारे फेरीवाले, भाजीवाल्या बायका यांचे वेष मात्र अनेकदा मराठी पद्धतीचे दिसतात ही सुद्धा निसटलेली चूकच म्हणावी लागेल.

छायालेखन आणि ध्वनी या दोन्ही बाबीसुद्धा बॉलिवूडपटांपेक्षा वेगळ्या. मुळात चित्रपट इस्टमन कलर फिल्मसारखा किंचित राखी/इस्टमन रंगात न्हालेला आहे. त्यात बहुतांश प्रसंग हे रात्री घडत असल्याने अंधाराचे या चित्रपटावर साम्राज्य आहे. अशावेळी, 'प्रेक्षकांना समजणार नाही काय चाललंय' या भिती/समजापायी भगभगीत किंवा मारून मुटकून आणलेल्या उजेडात प्रसंग घडत नाहीत ही एक अतिशय चांगली गोष्ट. मात्र त्यामुळेच हा चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघणे योग्य असे मात्र मी म्हणेन. लहान पडद्यावर कदाचित काही प्रसंग नीट न समजण्याचा धोका आहे. चित्रपटात प्रकाशाचे खेळ, व त्याचा वापर मात्र काही प्रसंगांत कल्पक केला आहे. चित्रपट सुरू होतानाच एका अंधारातील व्यक्तीची मोठी सावली आणि नंतर तो समोर येताना तो मोठा व सावली लहान होत जाते असे काही प्रसंग छान घेतले आहेत. ध्वनींचा वापरही नेमका आहे. अगदी क्लायमॅक्ससारख्या महत्त्वाच्या प्रसंगातही, एका गोळीने मागच्या पडलेल्या भांड्याच्या आवाजातून नक्की काय झाले, हे डायलॉग्ज न बोलता केवळ चित्र व ध्वनीद्वारे एका बॉलीवूड चित्रपटात दाखवलेले बघून धन्य झालो.

या चित्रपटाची कथा वगैरे बहुतेक वृत्तपत्रांतून तुमच्यापर्यंत पोचेल त्यामुळे त्यावर लिहीत नाही मात्र मला कथेत आवडलेल्या काही गोष्टींपैकी मुख्य म्हणजे तत्कालीन आंतरराष्ट्रीय तसेच आंतरिक परिस्थितीची राखलेली जाण नि त्याच बरोबर भारतीय स्वातंत्र्ययुद्धाला 'होलीयर दॅन काउ' सारखी वागणूक न देणे! एकूणात राजकारण, अर्थकारण, समाजकारण आणि गुन्हेगारी यांचे एकमेकांतील तत्कालीन संबंध हळूहळू पण ठाम व ठाशीवपणे प्रेक्षकापुढे उलगडू लागतात. त्याचबरोबर, जपानसारख्या देशांच्या विरोधात भारतातील इंग्रजांसोबत भारतीय व्यक्ती लढायला उभ्या होत्या; तर दुसरीकडे "शत्रूचा शत्रू तो आपला मित्र" अशा कल्पना बाळगत जपानसारख्या -वाटेतील अनेक राष्ट्रातील जनतेवर अनन्यसाधारण अत्याचार करणार्‍या- शत्रूच्या शत्रूकडे बघणार्‍यांचाही एक गट होता. या चित्रपटात हे दोन्ही गट आपापली भूमिका घेत आपल्या समोर येतात नि बर्‍यापैकी वास्तववादी परिस्थिती दाखवतात असे म्हणावे लागेल.

अभिनयाबद्दल बोलायचं तर 'सुशांत सिंग राजपूत' पूर्ण चित्रपटात भरलेला आहे. त्याचे स्वतःचे गुण दोष कधी टाळत कधी सोबत घेत आतापेक्षा एक वेगळा आणि खरा वाटणारा व्योमकेश तो उभा करण्यात यशस्वी होतो. ब्योमकेश हा कुठला तरी तिर्‍हाईत गुप्तहेर न राहता, भारतातला तुमच्या आमच्यातला व स्वतःचे काही गुण दोष असलेली एक व्यक्ती म्हणून तो व्यवस्थित उभा करतो. त्याच्या जागी इतर कोणी असता तर ब्योमकेश वेगळा - कदाचित अधिक ताकदीने - उभा राहिला असता हे खरेच, पण इतरांशी थेट तुलना करता येऊ नये असा वेगळा तरुण व्योमकेश तो उभा करतो. समकालीन गुप्तहेर पटांमध्ये जागतिक पातळीवर पाहिले तर, हल्ली गाजणारी 'शेरलॉक' ही सिरीज किंवा 'जेम्स बॉण्ड'चा गुप्तहेराच्या रूपात प्रवेश घडवणारा 'कसीनो रोयाल' ही उदाहरणे या चित्रपटांशी तुलना करायला योग्य आहेत. 'शेरलॉक'प्रमाणे अनेक कथांचा संकर करून पटकथा लिहिणे असो किंवा 'कसीनो रोयाल'प्रमाणे गुप्तहेरांच्या सुरवातीच्या आयुष्यात काही भाबडेपणामुळे आणि भावनांमुळे झालेल्या चुका असोत; दोन्हीचा अंतर्भाव या चित्रपटात आहे. अनेक कारणांनी ब्योमकेश या दोन्ही चित्रपटांपेक्षा निश्चितच तोकडा आहेच. पण, असे असूनही 'शेरलॉक' काय किंवा 'जेम्स बॉण्ड' काय यांच्यासारखे एक गाजलेले भारतीय ढंगाचे पात्र उभी राहण्याची पहिली संधी (नि पुढील भाग काढायचा वाव) या चित्रपटाद्वारे निश्चितच तयार झाला आहे. भारताला आपला असा एक डिटेक्टिव्ह मिळेल की हा एका चित्रपटापुरता प्रयोग ठरेल हे काळ ठरवेल, पण सुरूवात चांगली झाली आहे.

थोडक्यात सांगायचे, तर एक जुन्या काळातील, वास्तवदर्शी पार्श्वभूमीवर लिहिलेली रोमांचक व बांधीव कथा विश्वसनीय पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्यात हा नवा 'डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी' बर्‍यापैकी यशस्वी ठरला आहे.

डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी! - चित्रपटाची /नाटकाची माहिती

डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी!
  • Official Sites:

    Wikipedia imdb
  • दिग्दर्शक: दिबाकर बॅनर्जी
  • कलाकार: सुशांत सिंग राजपुत
  • चित्रपटाचा वेळ: १४८ मिनिटे
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१५
  • निर्माता देश: भारत