बालरंगमहोत्सव २०१८ - गोष्ट Simple पिल्लाची/ तु दोस्त माह्या: दोन दर्जेदार कलाकृती
बालनाट्य म्हटलं की हल्ली मला धडकीच भरते. डोरेमॉन, पोकेमॉन, छोटा भीम आदी 'ॲनिमेशन' सृष्टीतली पात्रं एखाद्-दुसऱ्या गोष्टीत शिरून स्टेजवर जे काही करतात ते माझ्यासारख्या प्रेक्षकांना शिसारी आणायला पुरेसे असते. अश्या नाटकांना बालनाट्य म्हण्यापेक्षा बालीश नाट्य म्हणणं योग्य ठरावे. यात प्रश्न या पात्रांचा नाही किंवा त्यांना नाटकात स्थान देऊ नये वगैरे काही मत अजिबात नाही. पण या नाटकांमध्ये कोणताही विचार, नाट्यकलेची अगदी प्राथमिक तत्त्वे, लेखन, दिग्दर्शन, प्रकाशयोजना या सगळ्याचाच आनंद असतो. या पार्श्वभूमीवर जेव्हा 'महाराष्ट्र कल्चरल सेंटर'ने जेव्हा बालनाट्याचा महोत्सव घोषित केला तेव्हा त्यातील नाटकांच्या नावाची नुसती यादी बघूनच हायसं वाटलं. यातील सगळी नाटकं मी बघितली नसली तरी काहींबद्दल ऐकलं होतं, तर काही वाचलेली होती. त्यामुळे मुख्य उत्सुकता सादरीकरणाची होती.
गेल्या दोन दिवसांत संध्याकाळी एकूण दोन नाटके सादर झाली आहेत. पहिले 'गोष्ट सिंपल पिल्लाची' आणि दुसरे 'तू दोस्त माह्या'. हे सुरुवातीलाच सांगणं महत्त्वाचं आहे की दोन्ही नाटकांचे सादरीकरण निव्वळ कमाल होते. दोन्ही नाटकांचे लेखन 'विभावरी देशपांडे' यांनी केले आहे आणि ते चोख आहे, याची पूर्वकल्पना होतीच. सादरीकरणाच्या वेळी नाटकाची संहिता समकालीन राहावी म्हणून काही लहान बदल (उदा. मराठी मालिकांची नावं नि टायटल साँग्ज) त्यात केलेले जाणवले पण ते बदल नुसते अचूक नव्हे तर गरजेचे होते कारण त्यामुळे नाटकाचा मुलांशी संवाद थेट होत गेला आणि मुलंही नाटकातील प्रसंगांशी अधिकाधिक रिलेट करत गेली. त्याशिवाय नाटकाच्या सुरूवातीला प्रमोद काळे यांनी मुलांशी ज्या प्रकारे संवाद साधला तो फारच रंजक आणि मुलांना स्थिर होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.
'गोष्ट सिंपल पिल्लाची' गोष्टीत सावरी आणि सिया हा दोघी आते-मामेबहिणी. सिया ही शहरात राहणारी, एका चांगल्या शाळेत शिकणारी, वर्णाने गोरी, शालेय शिक्षणात उत्तम मार्क कमावणारी, आपले मित्र राखून असलेली थोडक्यात एका ठराविक 'चाकोरीत' बांधली-वाढलेली (एक भावखाऊ) मुलगी. तिच्या घरी तिची आत्तेबहीण 'सावरी' राहायला येते. सावरी अगदीच वेगळ्या प्रकारच्या कुटुंबातून आहे. तिचे आईबाबा 'एन्व्हिरॉन्मेंट सायंटिस्ट' आहेत. घरी आई बाबाला नावाने हाक मारायची पद्धत असण्याइतकं वातावरण मोकळं आहे. वेगवेगळ्या जंगलांच्या अभ्यासानिमित्ताने आई-वडील-सावरी तिघांनाही खूप फिरावं लागतं. अर्थातच सावरी चाकोरीबद्ध शालेय अभ्यासक्रमात फार पुढे नसली तरी तिला अनेक गोष्टी माहिती आहेत. वर्णाने सावळी आहे, चष्मा लावणारी, दोन वेण्या घालणारी, कपड्यांकडे प्राथमिक गरजेहून अधिक लक्ष न देणारी आहे. अशा वेळी सुट्टीत कोणत्याश्या स्पर्धेसाठी मुलांची 'अग्ली डकलिंग' वर आधारीत नृत्यनाट्य बसवायचे ठरते. सावरी काळी म्हणून आधीच तिला हिणवणाऱ्या पोरांच्या हाती तिला काळ्या पिल्लाची भूमिका मिळाल्यावर तर आयते कोलीत मिळते. मग पुढे काय होते, ते नाटकातच बघण्यासारखे आहे. वर्णाचं वेगळेपण, उदारमतवाद, एकूणच विचारांचं, सौंदर्यदृष्टीचं वेगळेपण, टिव्हीवा मुलांच्या विश्वात असलेला सहभाग आणि त्याचा लहानग्यांच्या आयुष्यावर होत असलेला परिणाम हे सारेच या नाटकात बेमालूम येते.
'तू दोस्त माह्या' हे दुसरं नाटक आणखीनच वेगळ्या पठडीचं - कायच्या काय धमाल नाटक! मुलांना हवा असतो तो 'अद्भुत' रस तर यात आहेच, शिवाय तानाजी मालुसरे काय, एअर होस्टेस नि शेरलॉक होम्स काय, ट्रक ड्रायव्हर नि पोतराज काय.. अशी वेगवेगळी पात्रंही या गोष्टीत धमाल उडवून देतात. इथेही एक मुलगी बऱ्यापैकी चाकोरीबद्ध शहरी आयुष्य जगते आहे. आईवडील ऑफिसला गेले की, एकटी घरी राहताना तिच्या कल्पनेतील एक वेगळं विश्व उभं केलं आहे. एकदा तिचा रघू नावाचा एक चुलत भाऊ ' बिट्टीबोरी' नावच्या विदर्भातल्या गावाहून त्यांच्याकडे 'तात्पुरता' राहायला येतो. वऱ्हाडी भाषा बोलणारा हा आगंतुक मित्र आपल्या नायिकेच्या सत्य आणि कल्पनेच्या अश्या दोन्ही विश्वांत खळबळ उडवून देतो. पुढे रघूचं काय होतं हे नाटकातच बघायला हवं. हे नाटक त्रिकोणी कुटुंबांत मुलांना भेडसावणारा एकटेपणा, मुलांच्या कल्पनांचे विश्व, शहरी लोकांचा ग्रामीण भागाबद्दल असलेला दृष्टिकोन आणि काही प्रमाणात अव्हेर, भाषांमधील विविधता, प्रमाण भाषेचे स्तोम आदी अनेक मुद्द्यांवर अगदी नेमके भाष्य करते. मात्र हे भाष्य करताना कोणत्याही प्रकारचा प्रचारकी किंवा इसापनीती छाप 'तात्पर्य' देण्याचा आव आणत नाही की तसे संवादही यात येत नाहीत.
या दोन्ही नाटकात प्रत्येक अभिनेत्याचा अभिनय कमाल वठला आहे. पिल्लाच्या गोष्टीत क्षितिज दातेने वठवलेला लहान मुलगा निव्वळ थोर आहे. सिया व सावरीची भूमिकाही बऱ्यापैकी गुंतागुंतीची आहे मात्र दोन्ही भूमिकांना अभिनयाद्वारे नाटकात चांगला न्याय दिला आहे. तू दोस्त माह्या मधील हरेक कलाकार कितीतरी छान एनर्जी वापरत नाटकात फुल धुमाकूळ घालतात. राधिका इंगळे यांच्या दिग्दर्शनाच्या तर मी प्रेमात पडलो. शिवाय दोन्ही नाटकातील नेपथ्य, प्रकाशयोजना, वेषभूषा, संगीत, नाच सगळेच कायच्या काय जमून आले आहे. 'टरकीचा टाकून गियर रं बाप्पा..' हे गाणं तर पोरांमध्ये सुपर हिट झालं. शेवटी मुलं त्यावर नाचलीही. (नाटकाचा ट्रेलर न मिळाल्याने या नाचाचा व्हिडियो ट्रेलरच्या जागी टाकला आहे. (माझी मुलगी घरी येऊन आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरही हेच गुणगुणतेय)
अश्या प्रकारच्या नाटकांचे प्रयोग अधिकाधिक होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्यासारख्या प्रेक्षकांनी अश्या प्रयोगांना भरभरून प्रतिसाद देण्याची गरज आहे. सोबत उर्वरित नाटकांची यादी जोडली आहेच, तेव्हा अश्या दर्जेदार कलाकृतींना नुसते प्रोत्साहन मिळावे म्हणून नाही, तर आपल्या अपत्याला उत्तम नाटकांचा आस्वाद घेता यावा - एक चांगल्या कलाकृतीचा अनुभव मिळावा - म्हणून तरी या नाटकांना त्यांना घेऊन जाच अशी आग्रहाची शिफारस!
(चित्रस्रोतः फेसबुक, हर्षद राजपाठक)
'गोष्ट Simple पिल्लाची' आणि 'तू दोस्त माह्या' - चित्रपटाची /नाटकाची माहिती
