मुक्काबाज (२०१८): एकच खणखणीत बुक्का!

'मुक्काबाज' या सिनेमाबद्दल असं शांतपणे, क्रमवार काहीच लिहिणं मला जमणार नाही. वेगवेगळ्या प्रकारचं बरंच काही एकाच वेळी डोक्यात जन्माला घालून हा सिनेमा संपलेला आहे. त्यामुळे तूर्तास डोक्यात जे काही येतंय ते मी तसंच्या तसं उतरवणार आहे. तुम्हाला त्यातून काही मिळेल का माहीत नाही पण बघा कसं जमतंय ते.

--००--

बॉलीवूडने परिसर नि पात्रं उभारणी कुणाकडून शिकावी तर 'अनुराग कश्यप'कडून! काय खणखणीत पात्रं उभी करतो तो. या सिनेमाचा हीरो 'श्रवण सिंग' (विनीत कुमार सिंग) किंवा त्याची जोडीदार 'सुनैना मिश्रा' (झोया हुसेन) किंवा व्हिलन 'भगवान दास मिश्रा' (जिमी शेरगिल) ही पात्रं तर मुख्य आहेत. त्यमुळे त्यांची उभारणी चोख होणं साधारणत: अपेक्षितच असतं. पण सुनैनाचे आई-वडील, श्रवणचे आई-वडील, मिश्रा कुटुंबीयांची अंतर्गत मांडणी, श्रवणचा मित्र गोपाल, श्रवणची धाकटी बहीण, संजय कुमार (रवी किशन) नावाचा कोच ही पात्रं स्वतंत्रपणे विचार करायला लावणारी होतात आणि ती ज्या त्या ठिकाणी इतकी बेमालूम बसवली आहेत की त्यांच्या 'असण्या'बद्दल कुणाला शंकाच राहू नये.

--००--

सिनेमा भयंकर समकालीन आहे. आज आत्ता घडणारा - घडत असलेला आहे. प्रत्यक्ष आयुष्यात आपण ड्रामा, ॲक्शन, विनोद, सामाजिक, राजकीय, आर्थिक, भौगोलिक, ऐतिहासिक, 'ओळख', 'प्रतिमा' या व अशा अनेक बाबी सोबत घेऊनच जगत असतो. मात्र आपले सिनेमे यातील एखाद-दोन बाबींबर लक्ष देतात आणि मग अशा फिल्म 'स्पोर्ट ड्रामा' किंवा 'ॲक्शन ड्रामा' बनून राहतात. हा सिनेमा मात्र असा वर्गीकृत करता येणार नाही. जितका तो 'रॉकी'सारखा 'अस्सल' हाणामारीने भरलेला आहे, तितकाच तो 'राजकीय' घडामोडींनी व्यापलेला आहे. जितका तो जातीपातींच्या 'सामाजिक' वास्तवाला भिडतो, तितकाच तो भारतीय कुटुंबव्यवस्थेच्या अंतर्गत विरोधाभासांवर चोख प्रहार करतो. जितका तो 'शिवराळ' संवाद थेट म्हणू धजतो, तितकाच तो लोभस शृंगारही रंगवतो. जितका तो कोणत्याही खेळासाठीची मेहनत उभी करतो, तितकंच त्यामागचं राजकारण कोणताही अभिनिवेश न आणता दाखवतो. एकूणच वास्तववादी परिसर उभा करून त्या परिसराशी एकरूप झालेली पात्र-उभारणी पाहताना पात्रं किंवा त्यांचा भवताल एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत आणि यातच हा सिनेमा जिंकतो. 

--००--

म्हटलं तर दोन्ही सिनेमांच्या कथा वेगळ्या आहेत. म्हटलं तर दोन्ही सिनेमांची हाताळणीही वेगळी आहे. त्या त्या दिग्दर्शकाची पुरेपूर नि वेगवेगळी छाप दोन्ही सिनेमांत आहे. पण या दोन्ही सिनेमांत साम्यस्थळेही इतकी आहेत की 'मुक्काबाज' पाहताना 'सैराट'ची आठवण अनेकदा यावी. सुरवातीला नायक-नायिकेने एकमेकांना 'इम्प्रेस' करणं, नायिकेने भर बाजारात नायकाला टक लावून बघणं , 'जात' हा अनेक समीकरणांतील महत्त्वाचा घटक असणं, नायक-नायिका 'दुनिया बदल डालेंगे' वगैरे भाषणं न करता निव्वळ 'स्व' साधण्यासाठी परंपरा, मान्यता, लिंगभाव इत्यादी अनेक घटकांशी सतत लढत असणं, शेवटी भयंकर झगडूनही 'दुनिये'ला लगेच ढिम्म फरक पडत नाहीये अशीच जाणीव होत रहाणं - असे अनेक दुवे क्षणोक्षणी जाणवत राहतात. दोन्ही दिग्दर्शक, सिनेमाची पटकथा, त्यांची पद्धत, विषय, संदेश वगैरे सगळं वेगळं आहे. पण तरी...

--००--

हा सिनेमा 'दिसायला'ही अस्सल आहे. बनारसचं उंचावरून टिपलेलं पहिलं दर्शन मी आजवर बघितलेल्या बनारसच्या सर्वोत्तम प्रतिमांपैकी एक ठरावं. गाव-शिवार, तिथला प्लास्टिक माजलेला कचरा, भटकी कुत्री, गुरं, उघड्यावर शौचाला बसणारे लोक, आकडे टाकून मिळवली जाणारी वीज, सरकारी हाफीसं, गोदामं, कच्चे रस्ते, पात्रांचे वेष, भाषा, अन्नं, प्रकाश, ध्वनी सगळंच अस्स्ल! हे सारं कुठलाही आडपडदा न ठेवता आपल्यापर्यंत पोचतं आणि एकूणच सिनेमाच्या 'वास्तववादी' असण्याला ते पोषकच ठरतं.

--००--

या सिनेमात ढीगभर 'मेसेजेस', नायिकेच्या हातवाऱ्यांचा अर्थ स्क्रीनवर अक्षरात दिसतो आणि ती अक्षरेही तळाशी न येता पात्राच्या शेजारीच येतात त्यामुळे सिनेमा 'बघताना' अजिबातच डाचत नाहीत - उलट घटनेचा भाग होतात. बीबीसीच्या 'शेरलॉक'मध्ये या प्रकारची हाताळणी आहे नि अशी दिग्दर्शकाची नवीन स्वीकारण्याची तयारी बघितलं की कश्यप अजुनच आवडू लागतो. (एकीकडे स्वतःला अनावश्यक वाटणारे 'स्मोकिंग किल्स' पडद्यावर दिसायला ना असणारा अनुराग, (मुद्दामच?) एकही स्मोकिंग सीन न दाखवता उलट ढिगभर 'आवश्यक' वाटणारे शब्द दाखवत; आपल्या भुमिकेबद्दल एक सटल भाष्य या सिनेमात करून जातोच्चे असंही वाटतं)

--००--

बाकी या सिनेमातली गाणी, यातला अभिनय, यात केलेली राजकीय वक्तव्ये, याबद्दल आधीच ढीगभर बोललं गेलंय. आणि तसंही त्याबद्दल लिहिण्यापेक्षा तो अनुभवण्याचा भाग आहे. तेव्हा आणखी परीक्षणं वाचत बसू नका. जा आणि सिनेमा मोठ्या पडद्यावरच(च) बघून या!

 

मुक्काबाज (२०१८) - चित्रपटाची /नाटकाची माहिती

मुक्काबाज (२०१८)
  • Official Sites:

    Wikipedia imdb rtOm
  • दिग्दर्शक: अनुराग कश्यप
  • कलाकार: जिमी शेरगिल, झोया हुसेन, रवी किशन, विनीत कुमार सिंग
  • चित्रपटाचा वेळ: -
  • भाषा: हिंदी
  • बॉक्स ऑफिसचे आकडे: -
  • प्रदर्शन वर्ष: २०१८
  • निर्माता देश: भारत